राज्यात ११ हजार ८७७ नवे बाधित; ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढले!
९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे
आठवडाभरापूर्वी दिवसाला सातशे ते आठशे नव्या कोरोनाबाधितांची संख्या समोर येत होती. मात्र आठवडाभरात हा आकडा ११ हजारांच्यया पार गेला आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर बघावयास मिळण्याची शक्यता आहे. आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे तब्बल ११ हजार ८७७ नवे बाधित आढळून आले आहेत. तर ५० ओमायक्रॉन रुग्णांचीही त्यात भर पडली आहे. याशिवाय ९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागल्याने, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत असल्याने, कोरोनाचे संकट आणखीच बिकट होताना दिसत आहेत.
राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या ५१० वर पोहचली आहे. सध्या राज्यातील ॲक्टीव्ह करोनाबाधित रूग्णांची संख्या ४२,०२४ आहे. याशिवाय राज्यात आज २ हजार ६९ रूग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाल आहे. आजपर्यंत राज्यात ६५,१२,६१० रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२१ टक्के आहे.
राज्यात आजपर्यंत आढळून आलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या ६६, ९९,८६८ झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात १४१५४२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर २.११ टक्के आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत प्रयोगशाळेत तपासणी झालेल्या ६,९२,५९,६१८ नमुन्यांपैकी आजपर्यंत ६६,९९,८६८ नमूने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २,४३,२५० जण गृह विलगिकरणात आहेत, तर १ हजार ९१ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.
मुंबईत मागील २४ तासात ८ हजार ६३ करोनाबाधित आढळले, तर ५७८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला. याचबरोबर मुंबईतील एकूण करोनाबाधितांची संख्या ७,५०,७३६ झाली आहे. रूग्ण बरे होण्याचे एकूण प्रमाण ९४ टक्के आङे. तर, अॅक्टिव्ह केसेसची संख्या २९८१९ आहे.