लॉकडाऊन काळात २३,९२५ व्यक्तींना अटक, ६ कोटी ७८ लाखांचा दंड
राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ८ जूनपर्यंत कलम १८८ अंतर्गत १,२४,१०३ गुन्ह्यांमध्ये २३,९२५ व्यक्तींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यांसाठी ६ कोटी ७८ लाख ८१ हजार १९१ रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३३२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन ८४,५१७ वाहने जप्त करण्यात आले. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या २६३ घटना घडल्या. त्यात ८४६ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
पोलीस विभागाच्या हेल्पलाइन क्रमांक १०० वर,या काळात १,००,९५८ दूरध्वनी आले. त्या सर्वांची दखल घेण्यात येऊन संबंधितांना दिलासा देण्यात आला.
आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ६६ हजार ६६९ पासेस पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख ९१ हजार४९६ व्यक्तींना कॉरंटाईन करण्यात आले आहे.
ज्यांच्या हातावर कॉरंटाईन असा शिक्का असलेल्या ७२२ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण ५,९१,४९६ व्यक्ती कॉरंटाईन करण्यात आले आहे.
पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मुंबईतील २० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण २१, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे १, ठाणे ग्रामीण २, जळगाव ग्रामीण १ अशा ३४ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याकरिता नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या २०२ पोलीस अधिकारी व १२८६ पोलीस कोरोना बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रिलिफ कॅम्प
राज्यात सध्या एकूण २८६ रिलिफ कॅम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास १३,१८८ लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.