राज्यात 7 हजार 151 रुग्ण अॅक्टिव्ह
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काहींसा चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यातच राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे. राज्यात रविवारी पुण्यातील एक आणि पिंपरी चिंचवडमधील सहा रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. दरम्यान रविवारी राज्यात 707 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 86 हजार 782 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के इतके झाले आहे.
राज्यात आज 07 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के असून हा दर मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे. सध्या राज्यात 7 हजार 151 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 60 लाख 78 हजार 616 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 38 हजार 778 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या राज्यात 78 हजार 858 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत. तर 916 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.