शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (15:42 IST)

कोव्हिशिल्ड लस घेतल्यानंतर 26 लोकांच्या शरीरात रक्ताची गाठ, प्रमाण अत्यंत कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत

मयांक भागवत
कोव्हिडविरोधी लस घेतल्यानंतर 26 लोकांच्या शरीरात रक्ताची गाठ तयार झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेन्काची भारतात 'कोव्हिशिल्ड' म्हणून ओळखली जाणारी लस घेतलेल्यांमध्ये रक्ताची गाठ झाल्याचं दिसून आलं.
 
लशीच्या साईड इफेक्टचा अभ्यास करण्यासाठी केंद्राने एक समिती गठित केली आहे. या समितीने आरोग्य मंत्रालयाला आपला रिपोर्ट सूपुर्द केलाय. लशीचे गंभीर आणि अत्यंत गंभीर दुष्प:रिणाम दिसून आलेल्या 498 प्रकरणांचा या समितीने तपास केला.
 
कोव्हॅक्सीन लस घेतलेल्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होण्याचा प्रकार आढळून आला नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीये.
कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर 20 दिवस लक्षणांवर नजर ठेवा, अशी सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
 
AEFI समितीचा रिपोर्ट
तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर ताप येणं, अंगदुखी यासारखे साईड इफेक्ट होतात. हे साईड इफेक्ट फार गंभीर नसतात.
 
पण, Adverse Event Following Immunization समितीच्या अभ्यासात लस घेतलेल्यांमध्ये काही दुर्मिळ परिणाम झाल्याचं दिसून आलं.
 
भारतात लसीकरणानंतर रक्तस्राव किंवा रक्ताची गाठ तयार होण्याचं प्रमाण अत्यंत कमी
लसीकरण सुरू झाल्यानंतर को-विन अॅपवर 23,000 साईड इफेक्टच्या प्रकरणांची नोंद
देशातील 684 जिल्ह्यातून साईड इफेक्टच्या घटनांची माहिती मिळाली
3 एप्रिलला लशीचे 7 कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले. यातील फक्त 700 प्रकरणात गंभीर साईड इफेक्ट झाल्याचं दिसून आलं
लशीच्या साईड इफेक्टची चौकशी करणाऱ्या समितीच्या माहितीनुसार, 10 लाखांमध्ये 0.61 लोकांना याचा त्रास झाला.
केंद्रीय समितीने दिलेल्या रिपोर्टनुसार, कोव्हिशिल्ड लस घेतल्यामुळे शरीरात रक्ताची गाठ तयार होण्याची शक्यता अत्यंत कमी प्रमाणात असली तरी नाकारता येत नाही.
 
केंद्रीय आरोग्यमंत्रालय जाहीर करणार मार्गदर्शक सूचना
लस घेतल्यानंतर आरोग्य कर्मचारी आणि लस घेणाऱ्यांनी 20 दिवस सतर्क रहावं. शरीरात होणारे बदल आणि लक्षणांवर नजर ठेवावी अशी सूचना आरोग्यमंत्रालयाने केली आहे.
 
आरोग्यमंत्रालयाने या लक्षणांवर नजर ठेवण्यास सांगितलं आहे-
 
श्वास घेण्यास अडथळा
छातीत दुखणं
हात किंवा पोटरी दुखणं किंवा सूज येणं
लस घेतलेल्या ठिकाणापासून दूर शरीरावर लाल रंगाचे पुरळ किंवा ठिपके दिसणं
पोटदुखी आणि उलटीसारखं होणं
फीट येण्याची तक्रार नसताना अचानक फीट येणं
खूप जास्त डोकेदुखी
डोळयांनी कमी दिसू लागणं किंवा अंधूक दिसणं
लस घेतल्यानंतर लक्षणं दिसून आल्यास, तात्काळ लसीकरण केंद्रावर जाऊन डॉक्टरांना भेटण्याची सूचना आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
 
थ्रॉम्बोएबॉयलिक (Thromboembolic) म्हणजे काय?
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, शरीरातील रक्तवाहिन्यात रक्ताची गाठ तयार होते. ही गाठ काहीवेळा आपलं ठिकाण बदलून रक्तासोबत वाहत जाऊन दुसऱ्या रक्तवाहिनीत जाऊन अडकते.
कोरोनारुग्ण आणि कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात रक्ताची गाठ कुठे तयार होऊ शकते, याबाबत काही दिवसांपूर्वी बीबीसीने सर गंगाराम रुग्णालयाचे व्हॅस्कुलरतज्ज्ञ डॉ. अंबरिश सात्विक यांच्याशी चर्चा केली होती.
 
"शरीरात दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक हृदयाकडून शरीराच्या इतर अवयवांकडे रक्त नेते. दुसरी रक्त हृदयाकडे घेऊन येते. या दोन्ही रक्तवाहिन्यात गाठी तयार होऊ शकतात," अशी माहिती डॉ. अंबरिश यांनी दिली होती.
 
भारतात किती लोकांना देण्यात आली 'कोव्हिशिल्ड' लस?
भारतात आत्तापर्यंत कोव्हिडविरोधी लशीचे 18 कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. त्यातील 13 कोटींपेक्षा जास्त डोसेस 'कोव्हिशिल्ड' लशीचे असल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारने 21 एप्रिलला दिलेल्या माहितीनुसार कोव्हॅक्सीन लस घेतल्यानंतर होणाऱ्या कोरोनासंसर्गाचं प्रमाण फक्त 0.04 टक्के आढळून आलंय, तर कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर 5014 लोकांना कोरोनासंसर्ग झाला. एकूण डोसच्या फक्त 0.03 टक्के लोकांना लशीनंतर कोरोनासंसर्ग झाला. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, भारतात उपलब्ध असलेल्या दोन्ही लशी कोरोना संसर्गावर प्रतिबंध आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी आहेत.
 
केंद्र सरकारच्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड लशीमुळे कोरोनासंसर्गावर प्रतिबंध येण्यास मदत होते. त्यासोबत संसर्ग झाल्यास मृत्यूदर कमी होतो. तज्ज्ञ सांगतात, लस घेतल्यानंतर रक्ताची गाठ तयार होणं खूप दुर्मिळ घटना आहे.
 
यूकेतील परिस्थिती काय?
यूकेच्या वैद्यकीय विभागाच्या माहितीनुसार, लस घेतल्यानंतर रक्ताची गाठ तयार होण्याच्या 79 केसेस 26 एप्रिलपर्यंत आढळून आल्या होत्या. यातील 19 लोकांचा मृत्यू झाला. यूकेमध्ये आतापर्यंत 20 दशलक्षांपेक्षा जास्त लोकांना ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेन्काची लस देण्यात आली आहे.
 
यूकेमध्ये बहुतांशी प्रकरणात लस घेतल्यानंतर चार दिवस ते काही आठवड्यानंतर रक्ताची गाठ तयार झाल्याचं आढळून आलं. वैद्यकीय तज्ज्ञांनी डॉक्टरांनी याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे.
 
यूरोपातील देशांमधील परिस्थिती काय?
मार्च महिन्यात युरोपमधील काही देशांनी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्काची लस घेतल्यानंतर, शरीरात रक्ताची गाठ झाल्याचं दिसून आल्याचा, सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने भारतात लोकांना होणाऱ्या साईड इफेक्टची चौकशी सुरू केली.
 
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, लसीचे दुष्परिणाम भारतात सर्वात कमी दिसून आले आहेत.
 
यूकेमध्ये 10 लाखांमागे चार तर जर्मनीमध्ये 10 लाख डोस मागे 10 साईड इफेक्ट झाल्याचं आढळून आलं
 
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, युरोपच्या तुलनेत दक्षिण आशिया आणि दक्षिण-पूर्व आशियात रहाणाऱ्या लोकांमध्ये साईड इफेक्ट होण्याचं प्रमाण 70 टक्के कमी आहे.
 
ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेन्काच्या लशीमुळे शरीरात रक्ताची गाठ तयार होत असल्याच्या भीतीमुळे जर्मनी, फ्रांन्स, कॅनडा आणि नेदरलॅंडने लसीकरण मोहीम थांबवली होती. युरोपात 50 लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. 30 प्रकरणांमध्ये रक्त गोठल्याची तक्रार समोर आली आहे.
 
लस कशी काम करते?
अॅस्ट्राझेन्काची लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने बनललेली आहे. ही लस सामान्य सर्दी-पडशाच्या एका कमकुमत व्हायरसपासून तयार केली आहे. हा व्हायरस चिंपांझी माकडांमधून घेतला आहे. हा व्हायरस कोरोना व्हायरससारखा दिसावा म्हणून त्यात बदल केले आहेत. पण या व्हायसरमुळे कोणी आजारी पडू शकत नाही.
 
लशीद्वारे हा व्हायरस शरीरात गेल्यानंतर तो खऱ्या कोरोना व्हायरसशी कसं लढायचं हे आपल्या प्रतिकारशक्तीला शिकवतो.
 
लसीकरणाचे साईड इफेक्ट तपासणा-या समितीच्या रिपोर्टबाबत बोलताना महाराष्टृाच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॅा शशांक जोशी म्हणाले, "या लशींना आपात्कालीन परिस्थितीत वापराची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे याचा परिणाम काय होतो यासाठी फार्मको व्हिजलन्स स्टडी अत्यंत महत्त्वाचा आहे."
 
"या लशीमुळे होणारा धोका अत्यंत कमी आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेवर याचा परिणाम होता कामा नये. लसीकरण लोकांसाठी सुरू राहिलं पाहिजे.
 
लसीकरणानंतर संसर्गाचा धोका कमी
केंद्र कोव्हॅक्सीन लस घेतल्यानंतर होणाऱ्या कोरोनासंसर्गाचं प्रमाण फक्त 0.04 टक्के आढळून आलंय.
 
तर, कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर 5014 लोकांना कोरोनासंसर्ग झाला. एकूण डोसच्या फक्त 0.03 टक्के लोकांना लशीनंतर कोरोनासंसर्ग झाला.
 
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, भारतात उपलब्ध असलेल्या दोन्ही व्हॅक्सीन कोरोना संसर्गावर प्रतिबंध आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी आहेत