बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (19:33 IST)

कोरोना औषध 2-DG: DRDO ने तयार केलेलं कोरोनाविरोधी औषध 2-DG काय आहे?

मयांक भागवत
DRDO 2-DG या कोरोनाविरोधी औषधाच्या वापरासाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, DRDO ने 2-DG हे कोरोनाविरोधी औषध विकसित केलं होतं. कोरोनासंसर्गावर हे औषध प्रभावी असून, कोव्हिड-19ग्रस्त रुग्णांची ऑक्सिजनची गरज 40 टक्क्यांनी कमी करतं, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती.
 
मात्र, कोव्हिड-19 च्या रुग्णांना हे औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननुसारच दिलं जावं, असं DRDOनं प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने दिलेल्या मान्यतेनुसार 2-DG च्या वापरासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करत असल्याचं DRDOनं म्हटलं आहे.
DRDOनं प्रसिद्ध केलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत-
 
2-DG औषधाच्या वापराला आपत्कालीन परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या कोव्हिड रुग्णांवर पूरक उपचारपद्धती म्हणून मान्यता मिळाली आहे.
मध्यम ते गंभीर स्वरुपाच्या कोव्हिड रुग्णांमध्ये डॉक्टरांनी शक्य तितक्या लवकर 2- DG औषध प्रिस्क्राइब केलेलं योग्य ठरू शकतं.
अनियंत्रित मधुमेह, कार्डिआक समस्या, हिपॅटायटिस तसंच मूत्रवाहिनीचा संसर्ग असलेल्या रुग्णांवर 2- DG औषधाच्या परिणामाचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे या रुग्णांना हे औषध वापरू नये.
गर्भवती आणि स्तनदा मातांना तसंच 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या रुग्णांना 2- DG औषध देऊ नये.
2-DG असं या औषधाचं नाव आहे. DRDO च्या इंन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लिअर मेडिसीन एंड अलाईड सायन्सेसने तयार केलेलं हे औषध पूर्णत: भारतीय बनावटीचं आहे.
केंद्राच्या माहितीनुसार, या औषधाच्या वापराने कोरोनासंक्रमित रुग्णांचा संसर्गातून बरं (रिकव्हर) होण्याचा कालावधी अडीच दिवसांनी कमी झाल्याचं आढळून आलं आहे.
 
सोमवारी (17 मे) या औषधाचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. औषध महानियंत्रकांनी 1 मे ला, कोरोनासंसर्गावर उपचारासाठी या औषधास आपात्कालीन वापरास मंजुरी दिली होती.
 
काय आहे 2-DG औषध?
या औषधाचं वैद्यकीय भाषेतील नाव आहे 2-deoxy-D-glucose (2 डीऑक्सी-डी-ग्लुकोज). तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, कोव्हिडविरोधातील लढाईत या औषधाकडे एक प्रमुख शस्त्र म्हणून पाहिलं गेलं पाहिजे.
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे या औषधाची माहिती देतात.
 
ते सांगतात, "2-deoxy-D-glucose कृत्रिमरित्या बनवण्यात आलेला ग्लुकोजचा (साखऱ) एक प्रकार आहे. एक मॉलिक्युल (रेणू) आहे." पावडर स्वरूपात उपलब्ध असलेलं औषध कोरोनारुग्णांना पाण्यात मिसळून देण्यात येणार आहे.
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनाचा विषाणू शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करतो आणि त्याठिकाणी असलेल्या पोषक वातावरणात वाढू लागतो.
 
मुंबईच्या गाडगे डायबिटीस सेंटरचे संचालक डॉ. प्रदीप गाडगे सांगतात, "व्हायरसला वाढण्यासाठी ग्लुकोजची गरज लागते. पण, हे ग्लुकोज नाही. याची रचना फक्त ग्लुकोजसारखी आहे. हे काम मात्र ग्लुकोजसारखं करणार नाही."
 
डॉक्टर याला 'सूडो ग्लुकोज' असं म्हणतात. तज्ज्ञ सांगतात, विषाणूला जर अन्न मिळालं नाही, तर, त्याचा प्रसार आणि वाढ होणार नाही. याविचाराने शास्त्रज्ञांनी या औषधावर संशोधन सुरू केलं.
 
डॉ. भोंडवे पुढे म्हणतात, "विषाणूला वाढण्यासाठी लागणारी उर्जा पेशीत उपलब्ध ग्लुकोजमधून मिळते. या औषधाच्या वापराने ग्लुकोजसोबत हा कृत्रिम प्रकारही शरीरात उपस्थित असेल. ग्लुकोज ऐवजी कोरोनाव्हायरस हा कृत्रिम प्रकार घेईल. ज्यामुळे त्याला वाढण्यासाठी उर्जा मिळणार नाही."
 
2-DG औषधाचे फायदे काय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कोरोनासंसर्गावर उपचारासाठी तयार करण्यात आलेलं हे पहिलं औषध आहे. या औषधामुळे कोव्हिड रुग्णाच्या शरीरात विषाणूचा होणारा गुणाकार आणि वाढ रोकण्यास मदत मिळेल.
 
क्लिनिकल ट्रायलमध्ये या औषधाचे कोणते फायदे दिसून आले. याबाबत DRDO चे शास्त्रज्ञ डॉ. सुधीर चंदना सांगतात,
 
या औषधामुळे कोरोनारुग्ण दोन ते तीन दिवस लवकर बरा होतो
औषध दिल्यानंतर तिसऱ्या दिवशीच 42 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागली नाही
रुग्णांची ऑक्सिजनवर अवलंबून रहाण्याची गरज कमी झाली
DRDO च्या माहितीनुसार,
 
हे रेणू कोरोना व्हायरसने संक्रमित पेशींमध्ये जमा होतात. व्हायरल संश्लेषण आणि उर्जा उत्पादन थांबवतात
ज्यामुळे व्हायरसची वाढ आणि प्रसार रोखण्यास मदत होते
विषाणूंनी संक्रमित पेशींमध्ये त्याचे निवडक संग्रह हे औषध उत्कृष्ट बनवते
65 वर्षावरील कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकांवर करण्यात आलेल्या चाचणीतही रुग्णांची ऑक्सिजनची गरज कमी झाल्याचं दिसून आलंय.
 
डॉ अविनाश भोंडवे सांगतात, "विषाणूला वाढण्यासाठी उर्जा मिळाली नाही. तर तो नष्ट होतो."
 
"क्लिनिकल ट्रायलमध्ये औषध दिल्यापासून तिसऱ्या दिवशी रुग्णांची तब्येत सुधारल्याचं दिसून आलं. रुग्णांच्या RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्या. रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता या औषधाने वाढते," असं डॉ. भोंडवे म्हणतात.
 
DRDO ने तयार केलेल्या 2-DG औषधाचं लोकार्पण करताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, "कोरोनाविरोधी लढाईत हे औषध एक गेम चेंजर ठरू शकतं. या औषधामुळे रुग्णांची ऑक्सिजनची गज कमी होते."
 
कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. यामुळे देशात ऑक्सिजन संकट गडद झालं. दिल्लीत रुग्ण ऑक्सिजनच्या एका थेंबासाठी व्याकूळ झाले होते. तर, महाराष्ट्र, उत्तरप्रदेशसारख्या राज्यातही ऑक्सिजनची टंचाई जाणवू लागली होती.
 
सर्व कोव्हिड रुग्णांना हे औषध मिळेल?
 
संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, "मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोरोनासंसर्ग असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे. हा एक जनेरिक रेणू आणि ग्लुकोजसारखाच पर्याय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात याचं उत्पादन करणं शक्य आहे.
कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या इतर औषधांसारखंच हे एक आपात्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आलेलं औषध आहे.
 
अपोलो रुग्णालयातील डॉ. विनी कंतरू या औषध चाचणीच्या प्रमुख होत्या. बीबीसीशी बोलताना त्या म्हणतात, "ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं ते लवकर बरे होऊन घरी गेले. याचे परिणाम चांगले आहेत. पहिल्या आठवड्यात व्हायरसला आपण मारू शकलो तर, या औषधाचा नक्कीच फायदा होईल."
 
औषधाच्या प्रभावाबद्दल तज्ज्ञांना साशंकता
मात्र मधुमेहावर उपचार करणारे तज्ज्ञ हे औषध खरंच किती प्रभावी याबाबत साशंक आहेत.
 
डॉ. प्रदीप गाडगे म्हणतात, "हे औषध कोरोनावर उपचारात किती उपयोगी ठरेल याबाबत संशय आहे. या औषधाबाबत मोठ्या प्रमाणात क्लिनिकल डेटा समोर आलेला नाही."
"मधुमेह आणि हृदयरोग असलेल्या कोरोनारुग्णांवर याची चाचणी करण्यात आलेली नाही. खरंतर, या रुग्णांवर औषधाचा अभ्यास होणं गरजेचं होतं. त्यामुळे, मधुमेहींवर याचा अधिक अभ्यास होण्याची गरज आहे."
 
कसं तयार झालं औषध?
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) माहितीनुसार, क्लिनिकल ट्रायलमध्ये 2-DG औषधाची चाचणी दुसऱ्या टप्प्यात 110, तर तिसऱ्या टप्प्यात 220 कोरोनारुग्णांवर करण्यात आली होती.
 
कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत एप्रिल 2020 मध्ये DRDO च्या संशोधकांनी या औषधावर काम सुरू केलं. प्रयोगशाळेत हे औषध कोरोनाव्हायरसवर प्रभावी असल्याचं दिसून आलं.
 
त्यानंतर मे 2020 मध्ये औषध महानियंत्रकांनी 2-DG च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजूरी दिली. दुसऱ्या टप्प्यातील चाचणी 6 रुग्णालयांमध्ये करण्यात आली होती.
 
तर, नोव्हेंबर 2020 मध्ये या औषधाची तिसरी चाचणी दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिमबंगाल, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूतील 27 रुग्णालयांमध्ये करण्यात आली.