शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (21:44 IST)

कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी दोन दिवसात अधिकाऱ्यांच्या शंभर गावांना भेटी

नागपूर, : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट, व म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन दिवसात अधिकाऱ्यांनी शंभराहून अधिक गावे पिंजून काढली. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मोहिमेचा नियमित आढावा घेत असून ग्रामीण भागाला कोरोनाच्या सावटातून दूर काढण्यासाठी या मोहिमेतून गावागावाचा कृती आराखडा तयार केला जात आहे.
 
पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील दौऱ्याचा एकीकडे धडाका लावला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात त्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक उपकेंद्र यांना भेटी देणे सुरू केले आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये प्रचार प्रसिद्धी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात तेरा तालुक्यांमध्ये ५२ अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनातील गाव पातळीवरील कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, संबंधित गावाचे सरपंच पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी कोणती उपाययोजना करायची, गावामध्ये कसा कृती आराखडा तयार करायचा याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. सर्व अधिकाऱ्यांना यासंदर्भात कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित करण्यात आले असून  जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या व्हिडिओद्वारे गावागावात मार्गदर्शन केले जात आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये ५९ गावे पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना पासून अलिप्त राहिली आहे. या गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवणे, नियमित तपासण्या, लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद, कोरोना प्रोटोकॉल काटेकोर पाळणे व बाहेरील येणाऱ्या व्यक्तीची तपासणी करून त्यांना प्रवेश देणे, उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्या उपाययोजना आता प्रत्येक गावात करण्याच्या सूचनादेखील या बैठकांमधून दिल्या जात आहे.
प्रत्येक गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच या सार्वजनिक उपक्रमात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमधील लसीकरणाचे भय व गैरसमज काढण्याचे काम देखील केले जात आहे. जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी  प्रत्येक टीमकडून येणाऱ्या प्रतिसादावरून प्रत्येक गावच्या कोरोनाविरुद्ध लढायच्या आराखड्याची तयारी करत आहे.
 
आत्तापर्यंत देवळी, तारखेडा, चिंचोळी, पिंपळगाव मोगरा, अंबाडा, मानेगाव, पाटणसावंगी, वाकी, पुलर,आजनगाव,मेंढेपठार, मेटपांजरा, धापेवाडा, सावरगाव, मोहोगाव,सावंगी व्यवहारे, कोराडी, कामठी, अरोली, गोधनी, वाघोडा, कातेवाडा, बोखारा, बोरगाव,आदासा,सोनपूर, डोंगरगाव, लिंगा पार्डी,गोतमारे, ढवळापुर, गंगालडोह,लोणारा, चाकडोह, करांडला, कुही, पचखेडी,धानोली, गुमगाव,वाघधरा, वादोडा, पार्सद, तडाका, कोराडी, पिंडकेपार,बाबुलखेडा, लोनखैरी,बुधला, पथराई, दाहोद, लोहगड, सावरगाव, नागतरोली अड्याळ तास,भांडेवडी, बर्डेपार, अरोली, खापरी, घुमटी, कोहळा,मालेगाव,खडकी, महादुला, सातगाव, यासह शंभरावर गावांमध्ये हे अभियान राबविले जात आहे अशाप्रकारे प्रबोधनाचे व जनजागृतीचे अभियान राबविले जात असल्यामुळे आरोग्य यंत्रणेला गती प्राप्त होत आहे याशिवाय सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांचा यामध्ये गावपातळीवर समावेश करण्यात येत आहे. गाव पातळीवरील शंभर टक्के लसीकरण हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.