1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 जुलै 2020 (09:15 IST)

मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट : मुख्यमंत्री

corona virus
वैद्यकीय उपचार अधिक परिणामकारक होण्यासाठी राज्यातील सर्व टास्क फोर्सच्या डॉक्टरांची एकत्रित बैठक
 
कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणेकरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दरदेखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत.  
 
मुख्यमंत्री म्हणाले, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उपचारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसूत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहेत. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले  असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
 
टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी यावेळी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तात्काळ आम्हाला संपर्क करा.डॉ राहुल पंडित म्हणाले,  ही विशेष औषधे महत्त्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे  खूप महत्त्वाचे  आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक आहे.