रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 29 एप्रिल 2021 (18:03 IST)

'सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात येईल तिसरी लाट' - डॉ. शशांक जोशी

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वजण त्रस्त आहेत. ही लाट ओसरण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. असं असतानाच कोरोनाची तिसरी लाट देखील धडकणार आहे असं तज्ज्ञांचं मत आहे पण ही लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल असं देखील ते सांगतात.
 
"सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात कोव्हिड-19 संसर्गाची तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल," महाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी हा इशारा दिला आहे.
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्ययंत्रणा कोलमडून गेली. त्यातच, तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिलाय.
 
कोव्हिड-19 ने देशभरात हा:हाकार माजवलाय. ही लाट नाही, त्सुनामी आहे. या शब्दात डॉक्टर परिस्थितीचं वर्णन करतायत. देशात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनासंसर्गाने विक्राळ रूप धारण केलंय.
 
तज्ज्ञांच्या मते, सद्य स्थितीत आपण दुसऱ्या लाटेच्या मध्यभागी आहोत. ही लाट संपूर्ण ओसलायला अजून महिनाभर जाईल.
 
बीबीसी मराठीच्या वेबिनारमध्ये इंडियन कॉलेज ऑफ फिजिशिअन्सचे अधिष्ठाता आणि टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी कोरोनासंसर्गाची तिसरी लाट, लसीकरण अशा विविध विषयांवर आपली मतं मांडली.
 
कोरोना संसर्गाची तिसरी लाट कधी येईल?
 
संसर्गाच्या लाटा (वेव्ह) येत असतात. कोरोना संसर्गाच्या चार ते पाच लाटा येतील. अमेरिकेतील मिशिगन आणि फ्रान्समध्येही संसर्गाची चौथी लाट आलीये. त्यामुळे, तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आणि तीव्रता कशी कमी करता येईल. याकडे लक्ष दिलं पाहिजे.
 
कोरोना संसर्गाची चेन-ब्रेक करण्यासाठी आपण निर्बंध घातले. यावेळी अनलॉक योग्य पद्धतीने केलं नाही. लोकांनी मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही. गलथानपणा केला तर, सप्टेंबरमध्ये तिसरी लाट 100 टक्के येणार.
 
तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल का जास्त?
 
तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती गंभीर असेल हे पाहावं लागेल. याचं कारण, व्हायरस म्युटेट (बदलत) होत राहणार. महाराष्ट्रात डबल म्युटंट, तर बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट आढळून आलाय.
 
ही लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त गंभीर असण्याची शक्यता आहे. पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल असा अंदाज आहे.
 
तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे.
 
राज्यात मोठ्या संख्येने लोकांचं लसीकरण झालं तर, या लाटेचा प्रभाव कमी होईल?
 
सप्टेंबरपर्यंत आपण 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण करू शकणार नाही. त्यामुळे, आपली प्राथमिकता 60 ते 90 वर्षं वयोगटातील 80 टक्के लोकांचं लसीकरण असली पाहिजे.
 
सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत जेवढ्या लोकाचं लसीकरण होईल. त्यावरून, तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे समजू शकेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल.
 
हर्ड इम्युनिटी निर्माण होण्यासाठी 80 टक्के लोकांचं लसीकरण करावं लागेल. हे अशक्य आहे.
 
तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचे मृत्यू रोखणं. रुग्णांना ऑक्सिजन, व्हॅन्टिलेटरची गरज भासली नाही. तर, आपण तिसरी लाट थोपवू शकलो असं म्हणता येईल.
 
लसीकरण पूर्ण करण्यासाठी किती वर्षं लागतील?
 
लसीकरण पूर्ण होण्यासाठी वर्ष लागेल. 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष लागेल. सद्यस्थितीत लशींची मागणी आणि पुरवठा यात तफावत आहे.
 
पण, सरकारने घोषणा केलीये?
 
घोषणा करून काहीच फायदा नाही. वस्तूस्थिती पहायला हवी. राज्यात फास्टट्रॅक मोडमध्ये 24 तास लसीकरण मोहीम घेतली. तरी लसीकरण पूर्ण होण्यासाठी 2021 चा शेवट उजाडेल.
 
कोव्हिडविरोधी लस दरवर्षी घ्यावी लागेल?
 
कोव्हिडविरोधी लस दरवर्षी घ्यावी लागेल. लस घेतल्यानंतर संसर्गापासून किती सुरक्षा मिळते, यावर मतमतांतरं आहेत. काही डॉक्टर म्हणतात, विषाणू रोगप्रतिकारशक्तीला चकवतोय. लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही संसर्ग होतोय. यात आजारचं स्वरूप गंभीर देखील होतं.
 
त्यामुळे, लशीचा तिसरा-चौथा डोस लागणार आहे. आपण स्वत:ची काळजी घेतली नाही. मास्क घातला नाही तर त्रास होणार.
 
राज्यातील दुसरी लाट कधी ओसरण्याची शक्यता आहे?
 
राज्यात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट झपाट्याने आली. संसर्ग इतक्या झपाट्याने पसरेल याचा अंदाज नव्हता.
 
व्हायरसचा नवीन स्ट्रेन तीव्रतेने संसर्ग करणारा आहे. व्हायरसने मूळ रूप बदललं का हे शोधण्यासाठी जिनोम सर्व्हेलन्स वाढवावा लागेल. आपण फार कमी जिनोम सिक्वेंन्सिंग करतोय. कुठला स्ट्रेन पसरतोय याचा अभ्यास करावा लागेल.
 
राज्यातून दुसरी लाट मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरूवातीला ओसरण्यास सुरू होईल. मुंबईत लाट थोडी कमी झाली असेल. पण, लाट ओसरणं लोकांवर अवलंबून आहे. लोकांनी मास्क घालायला पाहिजे.
 
निर्बंध, लॉकडाऊनचा फायदा होईल?
 
गेल्या आठवड्यात मुंबईत परिस्थिती सुधारताना दिसत होती. आता पुन्हा 5 हजार रुग्ण आढळून आले. राज्यात कडक निर्बंध लाऊनही रुग्ण सापडतायत.
 
रॅमडेसिवीर, प्लाझ्मा यांचा खरंच फायदा होतो?
 
प्लाझ्मा वापरल्याने म्युटंट ब्रीड होतात. पण, अजूनही प्लाझ्मा वापरला जातो. जगभरातील सर्व संशोधनात प्लाझ्माचा मध्यम आणि तीव्र आजारात फायदा होत नाही असं स्पष्ट झालंय. भारतात याच्या दोन चाचण्या झाल्या. तरी आपण प्लाझ्माच्या मागे लागतोय.
 
रॅमडेसिवीरने जीव वाचत नाही. तरी लोक यामागे धावतात. या औषधाने फक्त रुग्णालयातील काळ कमी होतो. यावर आता निर्बंध आणावे लागतील. व्हायरसमध्ये जास्त म्युटेशन झालं. तर नंतर खूप त्रास होईल.
 
ज्या गोष्टींचा पुरावा नाही त्यामागे लोक धावताना दिसून येत आहेत.
 
सरकारने परिस्थिती योग्य हाताळली नाही?
 
राज्य किंवा केंद्रावर बोट दाखवण्यात अर्थ नाही. हा व्हायरस फक्त दीड वर्ष जुना आहे.
 
आरोग्य सुविधांवर राज्यात सकल उत्पन्नाचा फक्त दीड टक्का खर्च होतो. आरोग्यावर चार टक्के खर्च झाला पाहिजे. जगभरातील देश आरोग्य सुविधांवर चार टक्के खर्च करतायत.
 
आपल्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडतोय. ऑक्सिजन, औषध, सर्वांवर ताण येतोय. आरोग्य सुविधा एका रात्रीत तयार होत नाहीत. यासाठी रणनिती आखावी लागेल.