शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 18 मे 2020 (06:37 IST)

देशात तसेच राज्यात 31 मे पर्यंत संचारबंदी कायम

देशभात लॉकडाऊनमध्ये ३१ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातही कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आज संपणारा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. साथ रोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत. यामुळे राज्यात उद्यापासून टाळेबंदीचा चौथा टप्पा सुरू होईल. सध्यातरी लॉकडाऊन ३ मध्ये दिलेली शिथिलता कायम राहणार आहे.
 
चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी ७ ते संध्याकाळी ५ तर अन्य दुकानं सकाळी १० ते संध्याकाळी ५ या यावेळेत सुरु राहतील. चंद्रपूर शहरात १३ मे रोजी एका महिलेला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आढळून आलं होतं. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणात असूनही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. 
 
नांदेड जिल्ह्यातली प्रतिबंधित क्षेत्र वगळता उपनिबंधक कार्यालय, प्रादेशिक, तसंच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कार्यालयं काही अटींवर उद्यापासून सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे.   
 
यानुसार उपनिबंधक कार्यालयात पाच कर्मचारी, तर प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परीवहन अधिकाऱ्यांचं कार्यालय 10 टक्के कर्मचाऱ्यांसह चालू राहील. कार्यालयात मास्क, सॅनिटायझरचा वापर तसंच सुरक्षित सामाजिक अंतर राखणं आवश्यक राहील.