शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:19 IST)

चौथ्या लाटेची भीती? दिल्लीत फेस मास्क अनिवार्य, जाणून घ्या - कोणत्या राज्यात कोणते नियम लागू

covid second wave
कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने दिल्लीत पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय एखादी व्यक्ती पकडली गेल्यास त्याला 500 रुपये दंड भरावा लागेल. दिल्ली, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे चौथी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिल्लीशिवाय यूपी, हरियाणा आणि चंदीगडमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर येत्या काळात निर्बंध वाढण्याची भीती आहे. चला जाणून घेऊया, कोरोनामुळे कोणत्या राज्यात निर्बंध लादले आहेत?
 
उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध परत आले
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारीच घोषणा केली होती की आता राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये मास्क लावणे अनिवार्य असेल. राजधानी लखनऊसह 7 जिल्ह्यांमध्ये मास्क लावणे अनिवार्य असेल असा आदेश सरकारने जारी केला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे त्यात मेरठ, गाझियाबाद, हापूर, बुलंदशहर, बागपत, गौतम बुद्ध नगर यांचा समावेश आहे. यासोबतच ज्या लोकांची अद्याप लसीकरण झालेली नाही, त्यांची माहिती घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते म्हणाले की, सर्वांचे लसीकरण करणे आवश्यक आहे जेणेकरून विषाणूवर नियंत्रण ठेवता येईल.
 
हरियाणा सरकारनेही कडक घोषणा केली
हरियाणा सरकारनेही कोरोनाची प्रकरणे वाढल्याने निर्बंध लादले आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी NCR अंतर्गत येणाऱ्या राज्यातील 4 जिल्ह्यांमध्ये मास्क घालणे अनिवार्य केले आहे. या जिल्ह्यांमध्ये गुरुग्राम, फरिदाबाद, सोनीपत आणि झज्जर यांचा समावेश आहे. गुरुग्राममधील शाळांमध्येही कोरोनाची प्रकरणे आढळून आली आहेत, परंतु अद्यापपर्यंत संस्थांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
चंदीगड प्रशासनानेही सर्वसामान्यांना सल्ला दिला आहे
चंदीगड प्रशासनाने लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. सार्वजनिक ठिकाणे, वाहने, सिनेमा हॉल आणि शॉपिंग मॉल्समध्ये नियमांचे पालन करण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. याशिवाय, इनडोअर गॅदरिंग आणि शाळांमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.