शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (16:25 IST)

काय म्हणता, कोरोना लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर

करोना व्हायरसविरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चने करोना व्हायरस अ‍ॅंटीबॉडी किंवा पॅसिव्ह लस विकसित करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जेरुसलेम पोस्टने हे वृत्त दिले आहे. करोना विरोधात लस निर्मितीमध्ये इस्रायल महत्वाच्या टप्प्यावर पोहोचल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. 
 
अँटीबॉडी व्हायरसवर हल्ला करुन व्हायरसला शरीरामध्येच संपवून टाकतात अशी माहिती संशोधकांच्या टीमने इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांना दिली. इन्स्टिट्यूट आता अ‍ॅंटीबॉडीसाठी पेटंट मिळवण्याबरोबरच व्यावसायिक निर्मितीसाठी काँन्ट्रॅक्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. 
 
‘बायोलॉजिकल इन्स्टिट्यूट स्टाफने महत्वपूर्ण यश मिळवले असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे’ असे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट म्हणाले. ‘ज्युंची कल्पकता आणि हुशारीमुळे हे साध्य झाले’ असे बेन्नेट म्हणाले. 
 
अ‍ॅंटीबॉडी आधारीत लसीच्या उंदरावर चाचण्या सुरु केल्याची माहिती मागच्या महिन्यात IIBR ने दिली होती. ही इन्स्टिट्यूट करोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांचे प्लाझ्मांचे सुद्धा कलेक्शन करत आहे. 
 
मिगव्हॅक्स ही इस्रायलमधली संशोधकांची दुसरी टीम सुद्धा करोना व्हायरसविरोधात लस बनवण्याचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्याजवळ पोहोचली आहे. इस्रायलने आतापर्यंत चार लाख ४ हजार नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या आहेत. त्यात १६,२४६ नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. करोनामुळे इस्रायलमध्ये आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.