1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (15:42 IST)

अदर पूनावाला यांनी 'कोविशील्ड' लस टोचून घेतली

Other Poonawala
जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून असलेल्या पुणे येथील 'सिरम' इन्स्टिट्यूट निर्मित 'कोविशिल्ड' या कोरोना प्रतिबंधक लसचे देशात आजपासून लसीकरण सुरु झाले. याचवेळी लस सुरक्षित असल्याचा महत्वपूर्ण संदेश देत संदेश देत सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक अदर पूनावाला यांनी स्वतः 'कोविशील्ड' लस टोचून घेतली आहे. ही माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ सादर करत दिली आहे.
 
कोरोनावरील लस कधी येणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अँस्ट्रॉझेनिका कंपनीने विकसित केलेल्या कोव्हीशिल्ड लसीचे उत्पादन झाले. तीन टप्प्यामध्ये मानवी चाचण्या पार पडल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. त्यानंतर कोव्हीशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळाली. लसीकरणाला शनिवारी सुरुवात झाल्यानंतर पुनावाला यांनीही स्वतः लस टोचून घेतली. लस सुरक्षित असल्याचा संदेश त्यांनी या कृतीतून देशाला दिला आहे.
 
लसीकरण मोहीमेबद्दल मी संपूर्ण देशाचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी यशस्वी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागे अनेकांचे परिश्रम आहेत. या यशाचा मला अभिमान वाटतो. लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे, हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लसीकरण करून घेत आहे, अशा आशयाचे ट्विट अदर पुनावाला यांनी केले आहे.