बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 6 जून 2020 (16:23 IST)

लक्षणे नसलेल्या, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही

कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेने शनिवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले.  
 
मात्र, दुसऱ्या बाजूला गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून याच गतीने नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे.
 
महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेले राज्य आहे. मुंबई हा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी कोरोनाचे २४३६ नवे रुग्ण आढळून आले. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्याही २५ हजार ७६८ वर पोहचली असून मृतांचा आकडा १५०० वर गेला आहे. राज्यात आतापर्यंत २८४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.