दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णवाढ
भारतात रविवारी १९ हजार ७०० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दुसऱ्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. याआधी शनिवारी सर्वाधिक २० हजार ०६० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. महत्त्वाचं म्हणजे, फक्त गेल्या सहा दिवसांत एक लाख १० हजार रुग्णांची नोद झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या पाच लाख २८ हजार ८५९ वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सलग पाचव्या दिवशी १५ हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली. १ जूनपासून ३ लाख ३८ हजार ३२४ रुग्णांची भर पडली आहे. आतापर्यंत ३ लाख ९ हजार ७१२ रुग्ण बरे झाले असून, २ लाख ३ हजार ५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५८.५६ टक्के आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि तेलंगणनंतर एका दिवसात एका हजाराहून जास्त रुग्णांची नोंद होणारं कर्नाटक चौथं राज्य ठरलं आहे. देशात एकूण करोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या १६ हजार ९५ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ४१० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या देशातील १०३६ वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये प्रतिदिन २ लाखांपेक्षा जास्त चाचण्या होत असून गेल्या चोवीस तासांमध्ये २.३ लाख चाचण्या करण्यात आल्या. एकूण ८२ लाख २७ हजार ८०२ चाचण्या झाल्या आहेत. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे.