देशात कोरोना बाधितांचा आकडा २० लाखावर, मृतांची संख्याही ४० हजार
मागील दहा दिवसांपासून देशात ४५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरासरीनं दिवसाला रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा २० लाखांच्या काठावर जाऊन पोहोचला असून, मृतांची संख्याही ४० हजार झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानं मागील २४ तासातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ५२ हजार ५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर ८५७ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५५ इतकी झाली आहे. यापैकी ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर १२ लाख ८२ हजार २१६ रुग्ण बरं होऊन घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत ३९ हजार ७९५ रुग्ण मरण पावले आहेत.
देशात ५० हजारांपेक्षा रुग्ण आढळून आलेला बुधवार हा सलग सातवा दिवस आहे. महाराष्ट्र, नवी दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये देशातील राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत आहे.