राज्यात २ हजार८४० रुग्णांची कोरोनावर मात; ३९ मृत्यू!
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने, सरकारकडून सर्व निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने, लोक सणवाराचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. मात्र असे असताना सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. सध्या कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या आटोक्यात आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनातून बरे होणारे रुग्ण अधिक आहेत. मंगळवारी राज्यात दिवसभरात २ हजार ८४० रूग्ण करोनामधून बरे झाले असून, २ हजार ४०१ नवीन रूग्ण आढळले आहेत. तर, ३९ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३,८८,८९९ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.३२ टक्के एवढे झाले आहे.
आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,६४,९१५ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३९२७२ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,९४,६९,०५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,६४,९१५ (११.०४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४०,०५२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,३३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात एकूण ३३,१५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.