तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं, ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी
महाराष्ट्राला वेळेत पुरवठा न झाल्यास तीन दिवसांमध्ये लसीकरण बंद पडण्याची भीती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली असून या बैठकीत टोपे यांनी वॅक्सीनेशन, ऑक्सिजन तसंच रेमडेसिवीरच्या वापरासंबंधी काही महत्वाच्या सूचना केल्या.
मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती देत म्हटले की प्रकाश जावडेकर यांनी तीन लाख लसीकरण करत असताना सहा लाख करण्यास सांगितलं. यासाठी केंद्र सरकारकडून डोस पुरवले जातील असं सांगण्यात आलं असलं तरी साडे चार लाखांमध्येच लस नाही म्हणून केंद्र बंद ठेवावं लागत आहेत. लोकांना लस नसल्याचे सांगावं लागत आहे.
त्यांनी म्हटले की लसीकरण करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य असून लस मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. सर्वात जास्त बाहेर पडणार्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील तरुण असून लवकरच १८ पुढील सर्वांचं लसीकरण गरजेचं आहे. राज्यातील तरुण तरुणींना सुरक्षित करायचं असल्यामुळे केंद्राकडून याची लवकर परवानगीची टोपे यांनी मागणी केली. केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे अशी टीका राजेश टोपे यांनी केली.