शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By

धवनच्या जागी या खेळाडूला मिळणार संधी

भारताला वर्ल्ड कप दरम्यान तेव्हा मोठा धक्का बसला जेव्हा अंगठ्याला दुखापत झाल्यामुळे भारताचा सलामीवीर शिखर धवन तीन आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर शिखर धवनला ही दुखापत झाली होती. 
 
शिखरच्या अंगठ्याला फॅक्चर झाल्यामुळे शिखर पुढील तीन आठवडे खेळण्यास असमर्थ असेल. तो फिट कधीपर्यंत होईल हे तर सांगता येणार नाही पण तोपर्यंत तो संघाबरोबर इंग्लंडमध्येच राहणार आहे. अशात पर्याय म्हणून यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत याचे नाव उचल खात असताना पंतला इंग्लंडसाठी रवाना होण्यास सांगण्यात येणार अशी देखील चर्चा सुरू आहे.
 
एका वृत्तपत्राच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धवनच्या दुखापतीचा अंतिम अहवाल हाती आल्यानंतर बदली खेळाडू म्हणून पंतला बोलावण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
 
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम 15 जणांचा समावेश करताना त्याचा नावाची चर्चा असून देखील रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान दिले. पण सध्याची परिस्थिती बघता पंतला वर्ल्ड कपमध्ये आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळणार असल्याचे संकेत आहे. निर्णय त्याच्या बाजूने लागल्यास दोन दिवसाआत त्याला भारताहून रवाना व्हावं लागेल. अशात पंतची निवड झाली तरी गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पंत खेळण्याची शक्यता कमीच आहे मात्र रविवारी पाकिस्तानविरुद्ध रंगणार्‍या सामन्यात पंतला मैदानावर बघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विश्वचषकात भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध 13 जून रोजी होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टर इथं हा सामना होणार आहे.
 
सध्या शिखर धवन ऐन फॉर्मात होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन या जोडीने 127 धावांची सलामी दिली होती. शिखर धवनने संयमी शतक झळकावल्याने भारताला ऑस्ट्रेलियासमोर 352 धावांचा डोंगर उभा करता आला होता. रोहित-शिखरची जोडी फॉर्मात असल्यामुळे भारताची फलंदाजीची बाजू मजबूत झाली होती. मात्र आता रोहितच्या साथीला धवन नसल्यामुळे भारताला मोठा झटका मानला जात आहे.
 
शिखर धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार याची आता चाचपणी सुरु आहे. भारताकडे सलामीसाठी अनेक पर्याय आहेत. त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे के एल राहुल. के एल राहुलने अनेक सामन्यात सलामीला फलंदाजी केली आहे. राहुलशिवाय विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये सलामीला येऊन मोठ्या खेळी केल्या आहेत.
 
दरम्यान, शिखर धवनच्या अनुपस्थितीत रिकाम्या झालेल्या जागी रवींद्र जाडेजा किंवा विजय शंकर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. याशिवाय जर फलंदाज म्हणून निवड करायची असेल तर दिनेश कार्तिकचाही पर्याय टीम मॅनेजमेंटसमोर आहे.