विश्वचषकाचं बिगूल वाजण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दहाच संघ असणार आहेत. मात्र हा वर्ल्डकप सगळ्यांत खुला आणि आव्हानात्मक असेल असं बहुतांश कॅप्टन्स आणि कोचचं म्हणणं आहे. याचं कारण दडलंय राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये.
राऊंड रॉबिन संकल्पना मूळ फ्रेंच शब्द 'रुबन' या शब्दावरून घेण्यात आली आहे.
राऊंड रॉबिन म्हणजे नेमकं काय?
कोणत्याही वर्ल्डकपमध्ये किंवा खेळांच्या मोठ्या स्पर्धेत अनेक संघ असतात. त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी होते. प्राथमिक सामने गटवार होतात. गटात अव्वल राहणारे संघ सुपर सिक्स किंवा सुपर एटसाठी पात्र होतात. काही स्पर्धांमध्ये गटात अव्वल संघ उपउपांत्य फेरीत जातात. हे सामने नॉकआऊट पद्धतीचे असतात. सामना हरणारा संघ स्पर्धेबाहेर जातो.
"प्राथमिक-उपउपांत्य-उपांत्य-अंतिम" किंवा "प्राथमिक-सुपर सिक्स/सुपर एट-उपांत्य-अंतिम" असा खेळांच्या स्पर्धांचा प्रवास असतो. एका गटात असणारे संघ एकमेकांशी खेळतात. उदाहरणार्थ भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड एका गटात असतील तर प्रत्येक संघ दोन गटवार लढती खेळतो. गटातल्या अव्वल संघाचा अन्य गटांतील अव्वल संघाशी मुकाबला होतो. यापद्धतीने विजयी संघांची वाटचाल होत जाते.
राऊंड रॉबिन हा नेमका उलटा प्रकार आहे. उदाहरणार्थ यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दहा संघ आहेत. वर्ल्डकपमध्ये कोणतेही गट नाहीत. खुला फॉरमॅट आहे. प्रत्येक संघ अन्य नऊ संघांशी खेळेल. भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज यांच्याशी खेळायचं आहे. प्रत्येक सामन्यात विजयी संघाला 2 गुण मिळतील.
सामना टाय झाल्यास किंवा काही कारणांमुळे अर्धवट किंवा रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात येईल. सगळ्या संघांचे सगळे सामने झाले की सर्वाधिक गुण असणारे चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघांचे समान गुण असतील तर नेट रनरेट अधिक असणारा संघ उपांत्य फेरीत जाईल. अपवादात्मक परिस्थितीत, नेट रनरेटही सारखा असेल तर दोन संघांच्या एकमेकांविरुद्धच्या लढतीत कोण जिंकलं आहे यावर निर्णय घेतला जाईल.
राऊंड रॉबिनचे फायदे काय?
प्रत्येक संघाला अन्य सगळ्या संघांशी खेळता येतं. गटवार लढतींमध्ये सामन्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे दोन किंवा तीन गटवार लढती होतात. यापैकी एका सामन्यातला पराभव स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आणू शकतो. राऊंड रॉबिनमध्ये प्रत्येक संघाकडे भरपूर वेळ असतो. प्रत्येक संघाला सूर गवसण्यासाठी वेळ मिळतो. प्रत्येक सामना दडपणाचा राहत नाही.
प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीनुसार कसं खेळायचं याची आखणी करता येते. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चुका झाल्या तर त्या सुधारायला वेळ मिळतो. एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास त्यातून सावरण्यासाठी त्याला वेळ मिळतो. राऊंड रॉबिन फॉरमॅट अंगीकारल्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये गटवार टप्प्यात 45 लढती होतील. सर्वाधिक गुण असणाऱ्या चार संघांमध्ये उपांत्य फेरीचे दोन सामने होतील. उपांत्य फेरीतील विजेत्या संघांमध्ये अंतिम लढत होईल. संपूर्ण वर्ल्डकप 48 सामन्यांचा असेल.
राऊंड रॉबिन का?
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फक्त दहाच संघ आहेत. प्रत्येक गटात दोन अशी रचना केली तर पाच गट करावे लागतील. प्रत्येक गटात एकच सामना होईल. त्यामुळे गटाला अर्थ उरणार नाही. प्रत्येकी पाच संघ असे दोन गट केले तर प्रत्येक संघाला चार गटवार लढती खेळाव्या लागल्या असत्या. नॉकआऊट अर्थात बाद फेरीत आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता या फॉरमॅटमध्ये अधिक असते. राऊंड रॉबिनमध्ये प्रत्येक संघाला खेळण्याची भरपूर संधी मिळते. स्पर्धेतून बाद होण्याची शक्यता फक्त तीन सामन्यांपुरती राहते.
राऊंड रॉबिन फॉरमॅटच्या उणिवा
राऊंड रॉबिन फॉरमॅट प्रदीर्घ काळ चालणारा असतो. यामुळे स्पर्धा कंटाळवाणी होऊ शकते. मोठ्या संघांनी सुरुवातीचे सामने जिंकून उपांत्य फेरीसाठी आवश्यक गुण पदरात पाडून घेतले तर नंतरचे सामने नीरस ठरू शकतात.
आधीच्या वर्ल्डकपमध्ये काय फॉरमॅट?
1992 मध्ये राऊंड रॉबिन फॉरमॅट अंगीकारण्यात आलं होतं. 1999 आणि 2003 मध्ये सुपर सिक्स हा टप्पा होता. 2007 स्पर्धेत सुपर एट अशी रचना होती. 2011 आणि 2015 वर्ल्डकपमध्ये प्राथमिक-उपउपांत्य-उपांत्य आणि अंतिम अशी पारंपरिक रचना होती. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर आयसीसीने राऊंड रॉबिन फॉरमॅट अंगीकारलं आहे. संघांची संख्या दहावर आणल्याने राऊंड रॉबिन फॉरमॅट सोपा आणि सोयीचाही आहे.
आर्थिक नुकसान
2007 वर्ल्डकप वेस्ट इंडिजमध्ये झाला होता. त्यावेळी चार गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात चार संघ होते. भारताच्या गटात बर्म्युडा, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ होते. भारताने नवख्या बर्म्युडावर दणदणीत विजय मिळवला. मात्र बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्ध भारताला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. या दोन पराभवांमुळे भारताचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं.
भारताचा संघ स्पर्धेबाहेर पडल्याने वर्ल्डकपचं आर्थिक समीकरण पूर्णत: बिघडलं. भारतीय संघाची लोकप्रियता जगभरात प्रचंड आहे. जगात कुठेही भारतीय संघाचा सामना असेल तर स्टेडियम गच्च भरलेलं असतं. भारतीय संघाने बाद फेरी आणि पर्यायाने अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करणं स्पर्धेच्या यशाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये प्रत्येक संघ अन्य सर्वच संघांविरुद्ध खेळत असल्याने मोठे संघ स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका कमी होतो.