शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By

रोहित शर्माच्या घाम न गाळता केलेल्या शतकाचं मोल

हिटमॅन रोहित शर्माच्या संयमी शतकाच्या बळावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 6 विकेट्सनी मात करत वर्ल्ड कप अभियानाची विजयी सुरुवात केली. भेदक गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 227 धावांतच रोखलं. रोहित शर्माच्या 23व्या वनडे शतकासह भारतीय संघाने विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहितने 13 चौकार आणि 2 षटकारांसह 122 धावांची खेळी केली.
 
फलंदाजीसाठी अवघड अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी याचा वस्तुपाठ रोहित शर्माने सादर केला. कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर टीम इंडियाची घसरण होईल अशी चिन्हं होती मात्र रोहितने पडझड टाळत चिकाटीने फलंदाजी केली.
 
दक्षिण आफ्रिकेने 228 धावांचा बचाव करताना भारताच्या शिखर धवनला झटपट बाद केलं. फलंदाजांसाठी अवघड अशा खेळपट्टीवर विराट कोहली आणि रोहित शर्मा जोडीने 41 धावांची भागीदारी केली. अँडिले फेलुकवायोचा ऑफस्टंपबाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न कोहलीने केला. स्टंप्सपाठी क्विंटन डी कॉकने उजवीकडे झेपावत अफलातून झेल टिपला. कोहलीने 34 चेंडूत 18 धावा केल्या. मात्र यानंतर रोहित शर्माने संयमी खेळी करत अर्धशतकी खेळी केली. राहुलने रोहितला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र कागिसो रबाडाने लोकेश राहुलला बाद करत भागीदारी फोडली. राहुल बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि रोहित जोडीने चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करत विजय सुकर केला. धोनीने 34 धावांची खेळी केली.
 
सलग तिसऱ्या पराभवासह दक्षिण आफ्रिकेसाठी बाद फेरीत पोहोचण्याचा अवघड झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंड, बांगलादेश आणि भारताविरुद्ध पराभूत झाला आहे.
 
 
आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जसप्रीत बुमराहने लौकिकाला साजेसा खेळ करत टीम इंडियाला आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार सुरुवात करून दिली. आयसीसीच्या बॉलर्सच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जसप्रीत बुमराहने वर्ल्डकपमध्ये खेळण्याचं कोणतंही दडपण न घेता आक्रमक सुरुवात केली. हशीम अमला आणि क्विंटन डी कॉक या दोघांचीही भारताविरुद्धची कामगिरी चांगली आहे. या दोघांना चुका करायला भाग पाडत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवातीलाच खिंडार पाडलं.
 
इंग्लंडविरुद्धच्या लढतीत जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूवर अमला दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीतून सावरलेल्या अमलाने भारताविरुद्धच्या लढतीत पुनरागमन केलं. मात्र गेले वर्षभर धावांसाठी झगडणाऱ्या अमलाला बुमराहने तंबूचा रस्ता दाखवला. उसळता चेंडू अमलाच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात जाऊन विसावला. त्याने 6 धावा केल्या.
 
भारताविरुद्ध सातत्याने धावा करणाऱ्या क्विंटन डी कॉककडून दक्षिण आफ्रिकेला खूप अपेक्षा होत्या. मात्र बुमराहचा उजव्या यष्टीबाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. कोहलीने दुसऱ्या स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला.
 
तिसऱ्या विकेटसाठी फॅफ डू प्लेसिस आणि रुसी व्हॅन डर डुसे यांनी 54 धावांची भागीदारी केली. मात्र युझवेंद्र चहलने एकाच ओव्हरमध्ये या दोघांना बाद करत आफ्रिकेला धक्का दिला. चहलने 51 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स घेतल्या.
 
डू प्लेसिस आणि डुसे यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र चहलने एकाच ओव्हरमध्ये दोघांना बाद करत भागीदारी फोडली. डुसेने 22 तर प्लेसिसने 38 धावांची खेळी केली. चहलच्या वळणाऱ्या चेंडूवर रिव्हर्स स्विप करण्याचा डुसेचा प्रयत्न फसला. डू प्लेसिसला चहलचा चेंडू कळलाच नाही आणि तो त्रिफळाचीत झाला.
 
कुलदीप यादवच्या चेंडूवर अनुभवी जेपी ड्युमिनी एलबीडब्ल्यू झाला. ड्युमिनी 3 धावा करू शकला.
 
डेव्हिड मिलरने संयमी खेळी करण्याचा प्रयत्न केला मात्र चहलने त्याचा प्रतिकार संपुष्टात आणला. त्याने 31 धावा केल्या. आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध फेलुकवायोचा अडसर चहलनेच दूर केला. त्याने 34 धावा केल्या. मिलर आणि फेलुकवायो यांच्यामुळे दक्षिण आफ्रिकेने दोनशेचा टप्पा ओलांडला.
 
ख्रिस मॉरिसने 42 तर कागिसो रबाडाने 31 धावांची खेळी करत आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
 
घाम न गाळता केलेल्या शतकाचं मोल
रोहित शर्मा हिटमॅन या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या नावावर वनडेत तीन द्विशतकं आहेत. वर्ल्डकपच्या मोहिमेच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहितने 122 धावांची संयमी खेळी केली. एरव्ही कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्यासाठी प्रसिद्ध रोहितने या खेळीसाठी पुरेसा वेळ घेतला.
 
144 चेंडू आणि जवळपास 50 षटकं बॅटिंग करून रोहितने ही खेळी साकारली. खेळपट्टी आणि बॉलर्सचा नूर यांचा अंदाज घेत रोहितने साकारलेली खेळी म्हणजे टेस्ट इनिंग्जचा वस्तुपाठ होती. रोहितला या खेळीसाठी वेळ आणि फटके पुरवून पुरवून उपयोगात आणावे लागले. मात्र जराही घाम गाळावा लागला नाही. याचं कारण साऊदॅम्पटनचं तापमान होतं 16अंश सेल्सिअस.
 
50 ओव्हर्स फिल्डिंग केल्यानंतर रोहितने जवळपास 50 ओव्हर्स बॅटिंग केली. मात्र हे शतक शारीरिकदृष्ट्या दमवणारं नव्हतं. कारण इंग्लंडमधलं सुखद हवामान. पिचच्या हिरव्यागार कॅनव्हासवर रोहितने आपल्या बॅटरुपी कुंचल्यासह सुरेख इनिंग्ज साकारली.
 
दीड महिना चाललेल्या आयपीएल स्पर्धेत रोहितच्याच नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर मात करत जेतेपदाची कमाई केली होती. रोहितने आयपीएलच्या 15 मॅचेसमध्ये 28.92च्या सरासरीने 405 धावा केल्या होत्या.
 
आयपीएलमध्ये रोहितने उपयुक्त खेळी केल्या मात्र दमदार मोठी खेळी साकारण्यात यंदा त्याला अपयश आलं होतं. ही उणीव रोहितने वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत शतकी खेळीसह पूर्ण केली.
 
ओपनर शिखर धवन आणि रनमशीन विराट कोहली बाद झाल्यावर रोहितवरची जबाबदारी वाढली होती. बहुचर्चित चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलला पाठवण्यात आलं. या क्रमांकावर फलंदाजीला येऊन चांगली कामगिरी करण्याचं दडपण राहुलच्या खेळातून जाणवत होतं.
 
खेळपट्टीवर चेंडूला मिळणारी उसळी असमान होती. आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज योग्य जागी चेंडू राहील याची काळजी घेत होते. त्यामुळे धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी रोहितवर होती. रनरेट आवाक्याबाहेर जाणार नाही याची काळजी घेत रोहितने एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार यांची सुरेख सांगड घालत शतकी खेळी साकारली.
 
शतकानंतरही मोठे फटके खेळण्याचा मोह आवरत रोहितने सूत्रधाराची भूमिका निभावत टीम इंडियाच्या पहिल्यावहिल्या विजयावर मोहोर उमटवली. विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी यांच्यासह महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या रचत रोहितने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक अशी खेळी रचली.