1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 6 जुलै 2019 (13:31 IST)

रोहित शर्माला 'हे' तीन विश्वविक्रम मोडण्याची संधी

Rohit Sharma
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघ साखळी फेरीतील शेवटचा सामना शनिवारी श्रीलंका संघाविरुध्द खेळणार आहे. या सामन्यात रोहितला विश्वचषकातील तीन विक्रम मोडण्याची संधी आहे.
 
रोहितने बांगलादेशविरुध्द केलेल्या 104 धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळवत उपान्त्य फेरीत स्थान‍ मिळाले. या स्पर्धेत रोहितने 90.66 च्या सरासरीने आणि 96.96 च्या स्ट्राइक रेटने सर्वाधिक 544 धावा केल्या आहेत.
 
रोहितने चार शतके ठोकली असून भारताचे साखळी फेरीतील एक आणि उपान्त्य फेरीमधील एक असे दोन सामने खेळणे नक्की आहे. या सामन्यांमध्ये मोठी खेळी करत तीन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी रोहितकडे आहे.
 
एका विश्वचषक स्पर्धेत सर्वात जास्त शतके करण्याची त्याला संधी आहे. रोहितने या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात शतक करत त्याने माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा तीन शतकांचा विक्रम मोडला होता. तसेच त्याने विश्वचषकात सर्वात जास्त शतके करण्याच्या कुमार संगाकाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. यामुळे आता अजून एक शतक ठोकत सर्वाधिक शतके करण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावे होऊ शकते.
 
विष्वचषकात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावा केल्या होत्या. अजून 130 धावा करत रोहितला हा धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
 
भारत साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंकेशी खेळणार आहे. रोहित या सामन्यात 43 धावा करत विश्वचषकातील साखळी फेरीत सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम  करू शकतो. सध्या सचिन तेंडुलकर (586) आणि मॅथ्यू हेडन (580) या यादीत अव्वल आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (516) आणि एरॉन फिंच (504) देखील या स्पर्धेत आहेत.