रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Updated : मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (13:36 IST)

क्रिकेट वर्ल्ड कप : आर. अश्विनला करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आणखी एक विश्वचषक जिंकण्याची संधी

ravichandran ashwin
विधांशू कुमार
एकदिवसीय सामन्यामध्ये रविचंद्रन अश्विनचा हा 154 वा बळी आहे. समोर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे.
 
अश्विन आणि वॉर्नर दोघेही कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. पण स्पर्धेच्या बाबतीत दोघेही मागे नाहीत आणि दोघेही खेळात नवनवीन युक्त्या वापरण्यात पटाईत आहेत.
 
वॉर्नरला माहीत आहे की अश्विनचा सरासरी आणि डावखुऱ्या फलंदाजांविरुद्धचा स्ट्राइक रेट उजव्या हाताच्या फलंदाजांपेक्षा चांगला आहे. त्यामुळे वॉर्नर उजव्या हाताने अश्विनचा सामना करण्यासाठी वळला. त्याने एक चेंडू स्विप केला आणि धावाही काढल्या. पण तोपर्यंत अश्विनने आपल्या डोक्यात एक नवीन युक्ती शोधून काढली होती.
 
यावेळी वॉर्नरला विकेटवर वेगाने फेकलेल्या कॅरम चेंडूचा सामना करावा लागला. चेंडू इतक्या शानदारपणे फेकला गेला होता की, अश्विनची अॅक्शन पाहून वॉर्नरने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला असता तर तो चेंडू चुकला असता आणि तो चेंडू पाहत असता तर त्याची अॅक्शन चुकली असती.
 
परिणामी चेंडू त्याच्या पॅडला लागला, अश्विनने जोरदार अपील केले आणि वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला.
 
कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये 700 हून अधिक बळी घेणाऱ्या अश्विनसाठी फलंदाजाला पॅव्हेलियनमध्ये माघारी पाठवणे ही नवीन गोष्ट नाही, पण या विकेटमध्ये काहीतरी खास होते.
 
मैदानावर कधीही आपल्या भावना व्यक्त न करणाऱ्या भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडच्या ओठांवर हलके समाधानी स्मितही दिसत होते.
 
इंदूरमध्ये त्या संध्याकाळी, वॉर्नरशिवाय, अश्विनने मार्नस लॅबुशेन आणि जोश इंग्लिस यांचेही बळी घेतले. भारताच्या 399 धावांना प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलिया 29 व्या षटकात 217 धावांवर सर्वबाद झाला, ज्यामध्ये अश्विनने 41 धावांत 3 बळींचे योगदान दिले. अश्विनने शेवटच्या वेळी 2017 साली एकदिवसीय सामन्यात तीन बळी घेतले होते.
 
इंदूरमध्ये वॉर्नरची विकेट अद्वितीय ठरल्यानंतर लॅबुशेनला पराभूत करण्यात अश्विनने कोणतीही कसर सोडली नाही. अश्विनने त्याला देखील कॅरम बॉलने बाद केले होते, परंतु अश्विनच्या मते हा तिस-या प्रकारचा कॅरम बॉल होता जो त्याने मधल्या बोटाने पकडला होता आणि तो स्लाइडरसारखा एका विशिष्ट कोनात सोडला होता ज्यामुळे लॅबुशेनचे स्टंप कुठच्या कुठे फेकले गेले.
 
ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांमध्येही अश्विनच्या कलात्मकतेचे कौतुक होत होते आणि अश्विन त्याच्या पुढील लक्ष्यासाठी पायाभरणी करत होता.
 
ध्येय होते - विश्वचषक संघात स्थान मिळवणे.
 
याआधीच्या सामन्यातही अश्विनने तगडी गोलंदाजी करत यश मिळवले होते. या मालिकेपूर्वी अश्विनने गेल्या सहा वर्षांत केवळ दोनच एकदिवसीय सामने खेळले होते.
 
2017 मध्ये, निवडकर्त्यांनी असे म्हणण्यास सुरुवात केली की भारतीय एकदिवसीय क्रिकेट अश्विन आणि जडेजा यांच्या पलिकडे गेले आहे. पण नंतर जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले पण अश्विनसाठी दरवाजे बंद झाले. 2019 च्या विश्वचषक संघातही तो नव्हता.
 
रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचे फळ
अश्विनने कधीच पराभव स्वीकारला नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या गोलंदाजीत विविधता आणण्यासाठी तो एनसीए किंवा इतर ठिकाणी रात्रंदिवस मेहनत करत असे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अनेक सामन्यांमध्ये तो सहभागी झाला आणि फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींवर मेहनत घेतली. 'एनसीए'मध्ये त्याने माजी भारतीय फिरकीपटू आणि प्रशिक्षक साईराज बहुतुले यांच्यासोबत आपल्या फिरकी गोलंदाजीला तावूनसुलाखून काढले.
 
लाबुशानचा बळी घेतल्यानंतर त्याने बीसीसीआयला एका मुलाखतीत सांगितले की त्याने त्याच्या विविधतेवर कसे काम केले आहे.
 
सरावावर प्रकाश टाकताना तो म्हणाला, "मी साईराजसोबत बॉल ग्रिप आणि वेगवेगळ्या अँगलवर थोडं काम केलं आहे. मला सर्वात जास्त याचा आनंद आहे की मी फलंदाजाच्या मनात हा संभ्रम निर्माण करण्यात यशस्वी झालो आहे की, चेंडू कोणत्या दिशेने वळणार? या प्रकारच्या स्लायडर कॅरम बॉलचा कोन आणि रिलीझ पॉईंट जवळपास पूर्वीसारखाच राहतो, ज्यामुळे मी फलंदाजाला गोंधळात टाकू शकतो की त्याला चेंडूचा सामना बॅटच्या बाहेरच्या किनारीने की आतल्या किनारीने करावा लागेल. मी बराच काळ यावर काम करत होतो आणि आता मी तशाप्रकारे गोलंदाजी करण्यात यशस्वी झालो आहे.
 
अश्विनला अहोरात्र मेहनतीचे फळ मिळाले आणि 'बीसीसीई' ने गुरुवारी संध्याकाळी घोषित केले की जखमी अक्षर पटेलच्या जागी रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे.
 
संघातील निवडीवर माजी खेळाडूंची प्रतिक्रिया
सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिले की, "ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या दोन सामन्यांनंतर अश्विनची निवड होणार हे निश्चित होते. अक्षर पटेलसाठी मी थोडा दु:खी आहे, पण त्याला नंतर संधी मिळतील. भारताने अष्टपैलू कौशल्ये असलेल्यांच्या तुलनेत गोलंदाजाची निवड केली आहे. हार्दिकने जर चांगली गोलंदाजी केली तर तुम्ही अश्विनलादेखील पहिल्या अकरा खेळाडूंमध्ये पाहू शकाल.
 
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अश्विनची गोलंदाजी पाहिल्यानंतर सुनील गावसकर यांनी संघात त्याच्या निवडीची बाजू मांडली होती. ते म्हणाले होते, "पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, मला वाटते की त्याने वर्ल्डकपचे तिकीट पक्के केले होते."
 
माजी कसोटीपटू आणि समालोचक आकाश चोप्राने यापूर्वी विश्वचषकादरम्यानच बोर्डाला अश्विनचीच आठवण का होते, असा प्रश्न उपस्थित केला होता. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, "दरवर्षी विश्वचषकापूर्वी असे का घडते हे मनोरंजक आहे. जर तुम्ही मागील टी20 विश्वचषक पाहिला तर तुम्हाला असे दिसून येईल की विश्वचषकाच्या एक वर्ष आधी त्याची निवड केली जात नाही, परंतु वर्ल्डकपच्या आधी भारतीय क्रिकेटला अश्विनची आठवण येते.
 
आणि आठवण तरी का येऊ नये?
या मालिकेपूर्वी आशिया चषक स्पर्धेत अक्षर पटेलच्या सामान्य गोलंदाजीनेही अश्विनच्या संघातील स्थानावर वाद निर्माण केला होता. श्रीलंकेच्या फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्टीवरही पटेल बळी घेण्यात अपयशी ठरला होता, त्यामुळे फलंदाजी मजबूत करून संघाची गोलंदाजी कमकुवत होत आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.
 
विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर यावेळी भारतीय निवडकर्त्यांनी संघात कोणत्याही ऑफस्पिनरची निवड केली नव्हती आणि पटेलच्या दुखापतीनंतर जेव्हा संघात जागा उपलब्ध झाली तेव्हा अश्विन त्यात फिट झाला. मात्र, अश्विनसोबतच वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचीही निवड बैठकीत चर्चा झाली. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत अश्विनने ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना नाचायला लावले होते, त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला प्राधान्य दिले आणि संघात चांगल्या गोलंदाजाची निवड करण्यात आली.
 
अश्विनने वेळोवेळी फलंदाजीतही करामती दाखवल्या आहेत. सलामीवीर म्हणून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर पाच शतके आहेत.
 
काही महिन्यांपूर्वी त्याने इच्छा व्यक्त केली होती की त्याला विश्वचषक संघात यायला आवडेल, परंतु यासाठी तो फक्त त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ज्यावर त्याचे नियंत्रण आहे - म्हणजे अश्विन फक्त कठोर परिश्रम करण्याबद्दल बोलत होता. गेल्या काही दिवसांत स्वत:च्या फलंदाजीवरही त्याने खूप काम केले आहे आणि एकदिवसीय सामन्यातील परिस्थितीनुसार वेगवान आणि लांब फटके मारण्यासाठी भरपूर सरावही केला आहे.
 
विश्वचषकात फिरकी गोलंदाजाचे महत्त्व
भारतीय खेळपट्टी आणि परिस्थितीमध्ये फिरकीपटूची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. भारताने जिंकलेला 2011 चा विश्वचषक आठवून पाहा. हरभजन आणि अश्विन व्यतिरिक्त भारताच्या संघात युवराज सिंग, युसूफ पठाण, सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे फिरकीपटू पण होते.
 
अनेक सामन्यांमध्ये भारतीय फिरकीपटूंनी 30 पेक्षा जास्त षटके टाकली. या विश्वचषकात, विशेषत: पूर्वार्धात असेच काहीसे आपल्याला पाहायला मिळेल.
 
2011 चा विश्वचषक फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळला गेला. त्यावेळी उष्मा वाढत होता, तर यावेळी विश्वचषकाचे दिवस जसजसे वाढत जातील तसतसा हिवाळाही जवळ येईल. किमान ऑक्टोबर महिन्यात परिस्थिती संथ गोलंदाजीला अनुकूल असेल. हार्दिक पांड्याने तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका निभावल्यास भारतीय संघालाही तीन फिरकी गोलंदाज खेळण्याची संधी मिळेल. या संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आहे, त्याची निवड निश्चित आहे.
 
रवींद्र जडेजाचीही त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे संघात निवड होते. हार्दिकच्या गोलंदाजीमुळे रविचंद्रन अश्विनचा मार्ग मोकळा झाला आणि कारकिर्दीच्या या टप्प्यावर त्याला हातची एकही संधी जाऊ द्यायची नाहीए.
 
अश्विनची खासियत
अश्विनची खासियत म्हणजे तो इतक्या विविध प्रकारे गोलंदाजी करू शकतो जे क्वचितच एखादा आधुनिक क्रिकेटपटू करू शकेल. वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करण्यात तो निपुण आहे, तो कॅरम बॉलचे तीन प्रकार टाकू शकतो, तो क्रिझच्या कोपऱ्यातून किंवा स्टंपच्या जवळ येऊन गोलंदाजी करण्यास सक्षम आहे, त्याच्याकडे संथ गोलंदाजीचे कसबही आहे आणि तो वेगवान गोलंदाजीही करू शकतो. ऑफ स्पिन हा त्याचा ठेवणीतला चेंडू असेल तर तो लेगब्रेक टाकूनही फलंदाजांना फसवू शकतो.
 
विविध प्रकारे गोलंदाजी करण्यात यशस्वी असलेला अश्विन शक्य तितक्या त्याच शैलीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून चेंडू आत येईल की बाहेर जाईल हे फलंदाजांना ठरवता येणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने ही खासियत दाखवून दिली, ज्यासमोर सर्वश्रेष्ठ फलंदाजही नतमस्तक झाले.
 
आता वर्ल्ड कपची पाळी आहे. अश्विन भारताच्या पहिल्या सराव सामन्यासाठी गुवाहाटीला पोहोचला आहे जिथे भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. पुन्हा एकदा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग व्हायचे आहे, अशी इच्छा अश्विनने व्यक्त केली होती. त्यासाठी त्याने आपले पहिले पाऊल उचलले आहे.
 
विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.