रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 4 नोव्हेंबर 2023 (15:14 IST)

प्रसिद्ध कृष्णाची क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्याच्या जागी निवड करण्याचं ‘हे’ आहे कारण

prasith krishna
ओंकार डंके
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेची उपांत्य फेरी सर्वात प्रथम गाठणाऱ्या भारतीय टीमला मोठा धक्का बसलाय.
 
टीम इंडियाचा प्रमुख ऑल राऊंडर हार्दिक पंड्या उर्वरित स्पर्धेतून बाहेर गेलाय. हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची टीममध्ये निवड करण्यात आलीय.
 
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्यात झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिकचा पाय दुखावला होता. या दुखापतीमुळे त्याला तातडीनं मैदान सोडावं लागलं. विराट कोहलीनं त्याच्या ओव्हर्समधील उर्वरित 3 बॉल टाकले होते.
 
हार्दिक या दुखापतीनंतर एकही सामना खेळलेला नाही. नेदरलँड्सविरुद्ध 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सामन्यापूर्वी तो फिट होईल अशी अपेक्षा होती.
 
त्याला दुखापतीमधून सावरण्यास आणखी वेळ लागणार असल्यानं टीम इंडियानं प्रसिद्ध कृष्णाची निवड केलीय.
 
कोण आहे प्रसिद्ध कृष्णा?
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटककडून खेळणारा प्रसिद्ध कृष्णानं 2015 साली बांगलादेश अ संघाविरुद्ध प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
 
कृष्णानं पदार्पणातील सामन्यात 5 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केलं.
 
2017-18 साली झालेल्या विजय हजारे टुर्नामेंटमध्ये कृष्णानं 8 सामन्यात 17 विकेट्स घेतल्या. त्यानं सौराष्ट्रविरुद्ध अंतिम सामन्यात 3 विकेट्स घेत कर्नाटकच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.
 
कृष्णाची आयपीएल कारकीर्द
कृष्णाच्या आयपीएलमधील कारकिर्दीला सुरूवात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा नेट बॉलर म्हणून झाली.
 
आयपीएल 2018 मध्ये त्याचा बदली खेळाडू म्हणून कोलकाता नाईट रायडर्समध्ये समावेश झाला. पहिल्याच सिझनमध्ये त्यानं 7 सामन्यात 10 विकेट्स घेत समाधानकारक कामगिरी केली.
 
प्रसिद्ध कृष्णानं आजवर 51 आयपीएल सामने खेळले असून त्यामध्ये 49 विकेट्स घेतल्या आहेत.
 
कृष्णाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
प्रसिद्ध कृष्णानं 2021 साली इंग्लंडविरुद्ध पुण्यात झालेल्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
 
कृष्णानं आजवर 17 एकदिवसीय सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत.
 
तो या विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेतील दोन सामने खेळला होता. त्या दोन सामन्यांमध्ये मिळून त्यानं तीन विकेट्स घेतल्या.
 
सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत तो कर्नाटकाकडून पाच सामने खेळला असून त्यामध्ये त्यानं पाच विकेट्स घेतल्या आहेत.
 
कृष्णाची निवड का?
हार्दिक पंड्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाची निवड होताच अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. अक्षर पटेल, शिवम दुबे हे पर्याय असताना प्रसिद्धची निवड का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांनी विचारलाय.
 
हार्दिक पंड्या हा भारताचा नंबर 1 ऑल राऊंडर आहे. त्याला थेट रिप्लेस करेल असा एकही फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर भारताकडं नाही.
 
अक्षर पटेलची यापूर्वी विश्वचषक स्पर्धेत निवड झाली होती. पण, आशिया कपमध्ये झालेल्या दुखापतीमुळे त्याला ऐनवेळी वगळण्यात आले. तो या दुखापतीमधून किती सावरलाय याची माहिती नाही.
 
शिवम दुबे हा देखील हार्दिकप्रमाणे बॅटींग ऑलराऊंडर म्हणून प्रसिद्ध आहे. पण, तो गोलंदाजी फार करत नाही. आयपीएल 2023 मध्ये त्यानं एकदाही बॉलिंग केली नव्हती.
 
टीम इंडियाकडं सूर्यकुमार यादवसारखा स्पेशालिस्ट फिनिशिर असल्यानं टीम मॅनेजमेंटनं शिवम दुबेचा विचार केला नसावा.
 
प्रसिद्ध कृष्णाची निवड का?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 17 जणांच्या प्राथमिक संघात प्रसिद्ध कृष्णाचा समावेश होता. अंतिम संघातून त्याला वगळण्यात आलं होतं.
 
प्रसिद्ध कृष्णाकडं 140 किमी प्रती तास वेगानं गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर तो पहिल्या 10 ओव्हर्समधील पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
 
टीम इंडियाच्या 15 सदस्यांमधील चौथा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करत नाही. त्याचबरोबर त्याची या स्पर्धेतील कामगिरी देखील साधारण आहे.
 
जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे तीन वेगवान गोलंदाज टीम इंडियाकडून अंतिम 11 मध्ये खेळतातयत. त्यांना कव्हर म्हणून प्रसिद्ध कृष्णाचा समावेश करण्यात आलाय.
 
टीम इंडियाचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना नेदरलँड्सविरुद्ध 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात एखाद्या वेगवान गोलंदाजाला विश्रांती देऊन प्रसिद्धला अंतिम 11 मध्ये संधी मिळू शकते.
 
उपांत्य आणि अंतिम फेरीसाठी तीन नाही तर चार वेगवान गोलंदाज सज्ज करण्यासाठीच प्रसिद्ध कृष्णाचा हार्दिकच्या जागी टीममध्ये समावेश करण्यात आलाय.