रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (12:52 IST)

वर्ल्ड कप IND vs AUS : कोहलीची ही ‘विराट’ आकडेवारी त्याला 'ऑल टाइम ग्रेट' बनवते

virat kohli
IND vs AUS: वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 50 वं शतक झळकावत सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकत विराट कोहली शतकांचा बादशहा झाला.
शतकांचं अर्धशतक झळकावणाऱ्या विराट कोहलीच्या आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतो.
 
सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम विराटने मोडला आहे, त्यामुळे या दोन्ही फलंदाजांच्या एकदिवसीय कारकिर्दीची तुलना होणं स्वाभाविक आहे.
 
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी धावांचा हा डोंगर कसा रचला आणि शतकं कशी झळकावली ते पाहूया.
 
तसंच आकडेवारीच्या नजरेतूनही या फलंदाजांच्या शतकांचे रेकॉर्ड पाहूया.
 
विराट विरुद्ध सचिन: आकडेवारीची तुलना
सचिन तेंडुलकरने आशिया चषकात त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 451 व्या डावात बांगलादेशविरुद्ध 49 वे शतक झळकावलेलं.
 
पुढचा सामना सचिनचा शेवटचा एकदिवसीय सामना होता. हा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला गेला आणि त्यात सचिनने अर्धशतक मारलेलं.
 
याच सामन्यात विराट कोहलीने 183 धावांची खेळी केली होती, जी विराटची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.
 
एकदिवसीय सामन्यातील विराटचं ते केवळ 11 वं शतक होतं.
विराटच्या शतकांच्या सिलसिल्याने 49 व्या शतकाचा टप्पा गाठला तोपर्यंत त्याने एकदिवसीय सामन्यातील 277 डाव खेळले होते, त्यामुळे आता 279 व्या डावातच त्याने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकलाय.
 
विराटने कमी डावात सचिनचा विक्रम तर मोडलाच पण त्याचा स्ट्राईक रेटही मास्टर ब्लास्टरपेक्षा चांगला आहे.
 
सचिन तेंडुलकर 86.23 च्या स्ट्राईक रेटने एकदिवसीय सामने खेळायचा, तर विराटचा स्ट्राइक रेट 93.62 आहे.
 
सचिनने सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं (45) ठोकली आहेत, तर विराट कोहलीने तिसर्‍या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक शतकं (43) झळकावली आहेत.
 
सचिन तेंडुलकरची एकदिवसीय सामन्यातील सरासरी 44.83 होती तर विराट येथेही खूप पुढे आहे. 50 हून अधिक एकदिवसीय सामने खेळलेल्यांमध्ये विराट 58.70 च्या सरासरीने आघाडीवर आहे.
 
सचिनबद्दल कोहली म्हणतो- ‘तो परिपूर्ण आहे’
सचिनच्या उपस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध 117 धावा करून सचिनचा विक्रम मोडल्यानंतर विराट म्हणाला की, हे सर्व स्वप्नवत वाटतंय.
 
तेव्हा स्टँडमध्ये बसलेले सचिन तेंडुलकर आणि विराटची पत्नी अनुष्का शर्माही हे पाहत होते.
 
तो म्हणाला, "जर मी सर्वोत्कृष्ट चित्र रेखाटू शकलो तर मला हे चित्र रेखाटायचंय. माझ्या आयुष्याची जोडीदार, जिच्यावर मी सर्वाधिक प्रेम करतो, ती तिथे बसलेय. माझा नायक सचिन तिथे बसलाय. मी त्यांच्या आणि माझ्या चाहत्यांसमोर अशा ऐतिहासिक मैदानावर माझं 50 वं शतक झळकावू शकलो. हे अद्भूत आहे."
 
मात्र, कोहली अजूनही सचिन तेंडुलकरला महान क्रिकेटपटू मानतो.
 
गेल्या आठवड्यात तो म्हणाला, "आपण सर्वजण त्याचा इतका आदर करण्यामागे एक कारण आहे."
 
विराट म्हणाला, "मी त्याच्यासारखा चांगला कधीच होऊ शकणार नाही. फलंदाजीचा विचार केला तर तो परिपूर्ण आहे."
 
आपल्या 50 व्या शतकादरम्यान विराटने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगच्या एकूण धावसंख्येला मागे टाकत 13794 धावा केल्या आहेत.
 
आता श्रीलंकेचा कुमार संगकारा (14,234) त्याच्या थोडासा पुढे आहे, तर सचिन त्याच्या विक्रमी 18,426 धावांसह अग्रस्थानी आहे.
 
कदाचित त्याच्याकडे सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकण्याची कोणती ना कोणती तरी पद्धत असेल, पण सध्या तो त्याच्या (4632 धावा) खूप मागे आहे.
 
‘चेस मास्टर’
धावांचा पाठलाग करण्याच्या कोहलीच्या क्षमतेबाबत संपूर्ण क्रिकेट विश्व परिचित आहे. त्याचे हे आकडे खरोखरच आश्चर्यकारक आहेत.
 
एकदिवसीय सामन्यांमध्ये पाठलाग करताना, कोहलीने 65.49 च्या सरासरीने फलंदाजी केली, जी क्रिकेटच्या इतिहासातील इतर कोणत्याही फलंदाजाच्या सरासरीपेक्षा सात धावा जास्त आहे.
 
धावांचा पाठलाग करताना कोहलीने 50 पैकी 27 शतकं झळकावली आहेत. या प्रकरणात कोहलीचा आदर्श सचिनच्या शतकांची संख्या 17 होती.
 
कोहलीने जगात कुठेही फलंदाजी केली तरी त्यानं शतक झळकावलंय.
 
अर्थातच, त्याने आपल्या घरच्या मैदानावर 121 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि इथे त्याने सर्वाधिक 24 शतकं झळकावलेत.
 
कोहलीने आपल्या देशाबाहेर बांगलादेशमध्ये सर्वाधिक सहा शतकं झळकावली आहेत.
 
तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर कोहलीने आपल्या बॅटने अनुक्रमे पाच आणि तीन शतकं झळकावलेत.
 
सरासरीच्या दृष्टिकोनातून, कोहलीचा आवडता परदेशी देश दक्षिण आफ्रिका आहे. तिथे त्याने आतापर्यंत 20 सामन्यांमध्ये 76.38 च्या सरासरीने फलंदाजी केलेय.
 
खरंतर, कोहली ज्या नऊ देशांसोबत खेळला आहे, त्यापैकी श्रीलंका (48.95) आणि न्यूझीलंड (49.66) वगळता सर्व सात देशांमध्ये त्याने 50 पेक्षा अधिक सरासरीने फलंदाजी केलेय.
 
सचिन तेंडुलकर फक्त झिम्बाब्वे, मलेशिया, बांगलादेश, आयर्लंड आणि सिंगापूरविरुद्ध 50 पेक्षा जास्त सरासरीने खेळलेला, तर घरच्या मैदानावर त्याची सरासरी 48.11 होती.
 
कोहलीचं पुनरागमन
विराट कोहलीने यावर्षी सहा शतकं झळकावली आहेत. या आधीच्या तीन वर्षांत कोहली फक्त एकच शतक करू शकला. तसं पाहता, त्या काळात कोविड-19 साथीमुळे फारसं क्रिकेट खेळलं गेलं नाही.
 
2010 च्या दशकात कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये होता. 2011 ते 2019 या नऊ वर्षांमध्ये कोहलीने एका वर्षात सात वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये हजारांहून अधिक धावा केल्या.
 
निश्चितपणे 2010 चं दशक कोहलीचं दशक म्हणून परिभाषित केलं जाऊ शकतं. त्या काळात त्याची सरासरी 60 होती आणि त्याने 42 शतकांसह 11,125 धावा केल्या.
 
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात एका दशकात कोणत्याही फलंदाजाची आकडेवारी पाहता जोरदार पुनरागमनाची ही गोष्ट आहे.
कोहलीने हे कसं साध्य केलं?
गोलंदाजी कोणतीही असो, कोहलीचे दमदार विक्रम त्याची ताकद सिद्ध करतात.
 
एकदिवसीय सामन्यांमध्ये लेग स्पिनर वगळता सर्व प्रकारच्या गोलंदाजांविरुद्ध विराटची सरासरी 45 पेक्षा जास्त आहे.
 
पण कोहलीची बॅट विशेषत: लेग स्पिन बॉलिंग विरुद्ध चांगली चालते. त्याने ज्या लेगस्पिनर्सविरुद्ध फलंदाजी केली त्यात त्याने दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज इम्रान ताहिरच्या चेंडूवर 197 च्या सरासरीने सर्वाधिक धावा केल्या आहेत, तर श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज (सरासरी 187) हा देखील त्याच्या आवडत्या गोलंदाजांपैकी एक आहे.
 
त्याचबरोबर कोहलीने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (166) आणि मिचेल स्टार्क (139) वरही वर्चस्व राखलंय.
 
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साउदीने बुधवारी कोहलीला बाद केलं. कोहलीविरुद्ध साउदी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरलाय. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने कोहलीला सर्वाधिक सात वेळा बाद केलंय.
 
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोस हेझलवूडने आठ सामन्यांत पाच वेळा अशी कामगिरी केली. तर जेम्स अँडरसनच्या चेंडूवर एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीला केवळ 8.66 च्या सरासरीने खेळता आलंय.
 
एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जेम्स अँडरसनने कोहलीला त्याच्या स्विंग बॉल्सने सहा सामन्यांत तीनवेळा बाद केलंय.
 
कोहलीचा विक्रम मोडता येईल का?
सचिन तेंडुलकरकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा विक्रम आपल्या नावावर करणा-या विराट कोहलीचा विक्रम कधी मोडता येईल का? याची शक्यता काय आहे?
 
सध्याच्या क्रिकेटपटूंवर नजर टाकली तर कोहलीनंतर रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 31 शतकं आहेत, मात्र तो कोहलीपेक्षा 18 महिन्यांनी मोठा आहे.
 
त्याच्यानंतर डेव्हिड वॉर्नर 22 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा क्विंट डी कॉक 21 शतकांसह चौथ्या स्थानावर आहे. पण हे दोघेही क्रिकेटच्या या प्रकारामधून निवृत्ती घेणार आहेत.
 
वास्तविक पाहता, यावेळी कोहलीला आव्हान देण्यासाठी पाकिस्तानचा बाबर आझम सर्वोत्तम स्थितीत आहे. तो केवळ 29 वर्षांचा असला तरी त्याने यापूर्वी 19 शतकं झळकावली आहेत.
 
पण एकदिवसीय सामन्यांच्या प्रकारावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. एकमेकांच्या देशांत फिरणाऱ्या संघांच्या वेळापत्रकात टी-20 चा दबदबा वाढतोय.
 
अशा परिस्थितीत 50 षटकांच्या या प्रकारामध्ये कोहलीची 50 शतकांची राजवट कायम राहण्याचीही शक्यता आहे.
 










Published By- Priya Dixit