1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (07:36 IST)

वर्ल्ड कप: भारतीय संघाच्या भरारीत राहुल द्रविडचाही असा आहे सिंहाचा वाटा

Rahul Dravid
तो दिवस होता 23 मार्च 2003. राहुल द्रविड आणि त्याचे सहकारी जोहान्सबर्गमधील न्यू वाँडर्स स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेट वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी उतरले होते.भारतीय संघ तब्बल दोन दशकानंतर फायनलमध्ये पोहचल्यानं त्यांच्याबद्दलच्या सर्वांच्या अपेक्षा गगनाला पोहोचल्या होत्या. पण, प्रत्यक्ष सामना भारतीयांसाठी एक कटू आठवण ठरला. ऑस्ट्रेलियानं अगदी एकतर्फी पद्धतीनं टीम इंडियाला पराभूत केलं.
 
राहुल द्रविडला 2007 साली पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धा जिंकण्याची संधी होती. त्या स्पर्धेत द्रविड भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार होता.
 
टीम इंडियानं सपशेल निराशा केली. विश्वचषक स्पर्धेची बाद फेरी गाठण्यातही द्रविडच्या संघाला अपयश आलं.
 
आता 20 वर्षांनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड कप फायनल खेळणार आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
 
क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेच्या ट्रॉफीला द्रविडचे हात लागणार का हे लवकरच स्पष्ट होईल. पण, एक महान प्रशिक्षक म्हणून द्रविडनं स्वत:चं स्थान निर्माण केलंय.
 
महान फलंदाज ते टीम इंडियाच्या यशस्वी कामगिरीचा सूत्रधार हा प्रवास द्रविडनं कसा केला? याचं उत्तर त्याच्या गौरवशाली कारकिर्दीमध्ये दडलं आहे.
 
चिवट फलंदाज ही राहुल द्रविड खास ओळख होती. स्वत:ची विकेट गोलंदाजांना सहजासहजी न देण्याच्या त्याच्या सवयीमुळे ‘द वॉल’, ‘मिस्टर डिपेंडेबल’ ही नावं त्याला मिळाली.
 
राहुल द्रविडनं 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कोलकाता टेस्टमध्ये व्ही.व्ही.एस. लक्ष्मणसोबत 376 धावांची भागिदारी केली होती. त्यांच्या भागिदारीमुळे भारतानं तो कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून अक्षरश: खेचून आणला आणि जिंकला.
 
पाकिस्तानविरुद्ध 2004 साली झालेल्या कसोटीमध्ये त्यानं तब्बल 12 तास किल्ला लढवला. द्रविडच्या जिद्दीचं मूर्तिमंत प्रतीक म्हणून ती खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे.
 
भारतीय संघासाठी 2011 मधील इंग्लंड दौरा अत्यंत निराशाजनक ठरला. टीम इंडियानं 4-0 असा सपाटून मार खाल्ला. त्या पडझडीतही 602 धावा करून राहुल द्रविड दीपस्तंभासारखा ठामपणे उभा होता.
 
एक खेळाडू म्हणून अखेरपर्यंत हार न माणण्याची द्रविडची वृत्ती त्याच्या कोचिंग स्टाईलमध्येही उतरली आहे.
 
पण, प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या कारकिर्दीचा बारकाईनं अभ्यास केल्यानंतर त्याला या इनिंगमध्येही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागल्याचं लक्षात येतं. खेळाडू म्हणूनही द्रविडनं हा संघर्ष केला होता. या दोन्ही इनिंगमध्ये टीकाकारांची पर्वा न करता स्वत:च्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत द्रविडनं त्याचं काम केलं आहे.
 
राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून सहज यश मिळालेलं नाही. त्यानं यासाठी अगदी प्राथमिक स्तरापासून सुरूवात केली आहे. तो सुरूवातीला अंडर 19 आणि इंडिया ए (कनिष्ठ राष्ट्रीय टीम) संघाचा प्रशिक्षक बनला. राष्ट्रीय टीमच्या ग्लॅमरपासून दूर असलेली जबाबदारी त्यानं स्वीकारली.
 
द्रविडच्या मार्गदर्शनाखाली अंडर 19 टीमनं 2016 मधील विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. तीन वर्ष कनिष्ठ पातळीवरील खेळाडूंच्या गुणवत्तेला योग्य दिशा दाखवल्यानंतर त्याची राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या संचालकपदी निवड झाली
खेळाडूंना दुखापतीमधून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांचा फिटनेसचा स्तर उंचावण्यासाठी काम करणारं NCA हे प्रमुख केंद्र आहे.
 
राहुल द्रविड एनसीएची जबाबदारी सांभाळत असताना भारतीय क्रिकेटमध्ये अनेक उलथापालथी घडत होत्या. आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद मिळवण्याची देशाची प्रतीक्षा लांबली होती. 2013 नंतर कोणतीही स्पर्धा जिंकण्यात टीम इंडियाला अपयश आलं होतं.
 
आयसीसी वन-डे विश्वचषक 2019 मधील सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभव झाला.
 
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 2021 साली द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. त्यानं ज्युनिअर लेव्हला घडवलेले अनेक खेळाडू आता सिनिअर टीमचा भाग झाले होते.
 
राहुल द्रविडसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रवास सोपा नव्हता. सतत होणारे बदल ही भारतीय संघासमोरील मोठी डोकेदुखी होती. त्यातच विराट कोहलीनं 2002 साली कर्णधारपद सोडल्यानं अस्थिरता आणखी वाढली.
 
द्रविडसाठी हे आव्हान नवीन नव्हतं. तो बाहेरच्या गोंधळानं विचलित झाला नाही. त्यानं टीमला पराभवाची पर्वा न करता प्रोसेसवर विश्वास ठेवण्याचा मंत्र दिला.
 
भारतामध्ये 2023 साली होणारी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा हे त्याचं मुख्य लक्ष्य होतं. हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून त्यानं संघामध्ये अनेक प्रयोग केले. त्या प्रयोगासाठी पराभावाची किंमतही चुकवली.
 
द्रविडनं त्याच्या टीममधील खेळाडूंना पाठिंबा दिला. केएल राहुलच्या टीममधील जागेबद्दल टीकाकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी तो राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता.
 
आज राहुल भारतीय संघाचा आधारस्तंभ बनलाय. एक फलंदाज म्हणूनच नाही तर यष्टीरक्षक म्हणूनही त्यानं चोख जबाबदारी पार पाडलीय.
 
2003 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत राहुल द्रविडनं यष्टीरक्षक म्हणून अतिरिक्त जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे टीमला एक जादा फलंदाज किंवा गोलंदाज खेळवणे शक्य झालं होतं. 20 वर्षांनी हेच काम भारतीय संघातील आणखी एक राहुल करतोय.
 
श्रेयस अय्यरच्या टीममधील समावेशाबद्दलही अनेकांनी शंका उपस्थित केली होती. आज श्रेयस भारताचा चार नंबरवरील एक सर्वोत्तम फलंदाज आहे.
 
द्रविडनं गोलंदाजीकडंही तितकंच लक्ष दिलंय. विशेषत: मोहम्मद सिराज. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा या वेगवान त्रिकुटावर द्रविडनं मेहनत घेतलीय. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व गोलंदाज फिट आणि फॉर्मात असतील याची खबरदारी त्यानं घेतली.
 
कर्णधार रोहित शर्मासोबतही त्याचं घट्ट नातं आहे. या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा वैयक्तिक विक्रमांची पर्वा न करता फलंदाजी करतोय. रोहितची फलंदाजी आणि नेतृत्त्वकौशल्याचा संघाला फायदा होतोय.
 
विश्वचषकापूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेतच द्रविडच्या शिकवणुकीचे फळ मिळण्यास सुरूवात झाली. त्या स्पर्धेत भारतानं पाकिस्तान आणि श्रीलंकेचा मोठा पराभव केला होता.
 
विश्वचषक स्पर्धेतही एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठलीय. आता खेळाडू, कर्णधार म्हणून अर्धवट राहिलेलं द्रविडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता फक्त एकच अडथळा बाकी आहे.
 
19 नोव्हेंबरच्या रात्री विश्वचषक उंचावण्यासाठी द्रविड सर्वात जास्त आतूर असेल. पण, फायनलपूर्वी आणि नंतरही याबाबतचा कोणताही उतावीळपणा त्याच्या चेहऱ्यावर दिसणार नाही.
 
आपलं काम शांतपणे करण्याची राहुल द्रविडची ही पद्धत सर्वांच्या चांगल्याच सवयीची आहे.
 







Published By- Priya Dixit