1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्ड कप 2023
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (23:17 IST)

IND vs Aus : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूंचं आव्हान

rohit viraat
जान्हवी मुळे
भारत आणि ऑस्ट्रेलिया... हे दोन बलाढ्य संघ वन डे विश्वचषकाच्या ट्रॉफीसाठी फायनलमध्ये खेळतील.
 
पण मोठ्‌या युद्धात जशा छोट्या लढाया निर्णायक ठरू शकतात, तसं क्रिकेटच्या या युद्धातही खेळाडूंमधल्या काही चढाओढी महत्वाच्या आणि निर्णायक ठरू शकतात.
 
कोणत्या खेळाडूंमध्ये चुरस रंगेल अशी अपेक्षा केली जाते आहे, जाणून घ्या.
 
कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलियन गोलंदाजी
विराट कोहली सध्या त्याच्या कारकीर्दीतल्या शिखरावर असल्यासारखा खेळतोय. तो फलंदाजीसाठी आला की त्याच्या डोळ्‌यात आणि देहबोलीत निष्ठा आणि निर्धार दिसून येतात.
 
यंदा विश्वचषकातल्या दहा पैकी आठ सामन्यांत विराटनं अर्धशतकाची वेस ओलांडली आहे आणि त्यात तीनता शतक ठोकलं आहे. त्यानं या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 711 रन्स केल्या आहेत.
 
पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना विराट कसा करतोय, यावर बरंच अवलंबून राहिल.
 
विशेषतः डावाच्या सुरुवातीला मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड तर मधल्या ओव्हर्समध्ये अडम झॅम्पा यांच्यासोबत विराटची लढाई पाहायला मजा येईल.
 
याआधी चेन्नईत वर्ल्ड कप 2023 मधल्या आपल्या पहिल्याच सामन्यात भारत संकटात असताना विराटनं 85 रन्सची खेळी केली होती आणि आता त्याहीपेक्षा मोठ्या खेळीची अपेक्षा चाहते करतायत.
 
रोहित विरुद्ध हेझलवूड
चेन्नईतल्या त्या सामन्यात हेझलवूडनं रोहित शर्माला शून्यावर पायचीत करून माघारी धाडलं होतं. रोहितला तेव्हा सेट होण्याची संधीच मिळाली नाही.
 
पण त्यानंतर एक श्रीलंकेचा अपवाद वगळला तर स्पर्धेतल्या प्रत्येक सामन्यात रोहितनं भारताला आक्रमक सुरुवात मिळवून देण्याचं काम चोखपणे पार पाडलंय.
 
आता वर्ल्ड कपच्या अखेरच्या सामन्यात रोहित पुन्हा हेझलवूडला कसं तोंड देतोय हे पाहणं करेल, यावर भारतीय डावाची सुरुवात कशी होते आहे हे अवलंबून राहील.
 
वॉर्नर विरुद्ध सिराज आणि बुमरा
जी जबाबदारी रोहित भारतासाठी पार पाडतो, तेच काम वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी अनेक वर्ष करत आला आहे.
 
37 वर्षांच्या वॉर्नरचा हा वन डेत कदाचित शेवटचा वर्ल्ड कप सामना आहे, आणि आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करण्यासाठी तो उत्सुक आहे.
 
पण भारताच्या फॉर्मात असलेल्या गोलंदाजीसमोर तो टिकाव धरू शकेल का? ही गोष्ट ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरेल.
 
स्टीव्हन स्मिथ विरुद्ध रविंद्र जाडेजा
अलिकडच्या काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया जेव्हा जेव्हा आमने सामने आले, तेव्हा तेव्हा स्टीव्हन स्मिथ आणि रविंद्र जाडेजा यांच्यातली चुरस रंगतदार ठरली आहे.
 
विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये, कारण कसोटीत जाडेजानं स्मिथला चार वेळा बोल्ड केलंय. पण वन डेतही अनेकदा जाडेजाच्या बोलिंगनं स्मिथला चकवलं आहेत.
 
यंदा चेन्नईत वर्ल्ड कपच्या सामन्यात जाडेजानं एका अप्रतिम बॉलवर स्मिथला बोल्ड केलं होतं आणि भारताला अत्यंत गरजेचा ब्रेकथ्रू मिळवून दिला होता.
जाडेजाच्या त्या बॉलची गणना यंदाच्या वर्ल्ड कपमधल्या सर्वोत्तम बोलिंग क्षणांमध्ये केली जाते आहे.
 
जाडेजानं या स्पर्धेत सोळा विकेट्स काढून आणि उत्तम फिल्डिंग करून भारताच्या विजयाला अनेकदा हातभार लावला आहे. स्टीव्हन स्मिथच्या कामगिरीत काही चढउतार आले आहेत.
 
शमी विरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाजी
वर्ल्ड कप फायनलमध्ये कदाचित शमी विरुद्ध ऑस्ट्रेलियन फलंदाज ही लढाई सर्वात निर्णायक ठरू शकते.
 
शमीला सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये खेळवलं नव्हतं. पण पुढच्या सहा सामन्यांत त्यानं 23 विकेट्‌स काढल्या आहेत.
 
समोर प्रतिस्पर्धी म्हणून कुठलाही संघ असो, शमी त्यांच्या फलंदाजीच्या चिंधड्या उडवेल असंच वाटतं. संघ अडचणीत असताना भारताला ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठीही तो ओळखला जातोय.
 
शमी ऐन भरात गोलंदाजी करतो आहे आणि तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वात धोकादायक ठरू शकतो, हे कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सनही मान्य केलं आहे.
 
डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल अशी तगडी बॅटिंग लाईनअप असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला शमीनं रोखून धरलं, तर भारताला विजयाची चांगली संधी मिळू शकते.
 
कोहली आणि मॅक्सवेलमधली जुगलबंदी
 
यंदाच्या वन डे विश्वचषकात एकीकडे विराटनं सर्वाधिक रन्स केल्या आहेत तर दुसरीकडे मॅक्सवेलनं स्पर्धेतली सर्वात मोठी खेळी केली आहे.
 
आता फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या लढतीत, या दोघांमधली जुगलबंदी कोण जिंकतो, याविषयीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
 
तसं विराट आणि मॅक्सवेल या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं आहे. म्हणूनच वानखेडेवर मॅक्सवेलनं ऐतिहासिक खेळी केली, तेव्हा विराटनं त्याचं कौतुक केलं.
 
तर एप्रिलमध्ये एका मुलाखतीत विराटशी आपली तुलना केली जाणं हा बहुमान असल्याचं मॅक्सवेलनं म्हटलं होतं.
 
विराट आणि मॅक्लवेलनं आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुररू संघात ड्रेसिंग रूमही एकत्र शेअर केली आहे. दोघंही 35 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या वाढदिवसात जेमतेम पंधरा दिवसांचं अंतर आहे.
 
दोघंही आपापल्या टीममध्ये फिनिशरची भूमिकाही बजावतात आणि अलीकडेच धावांचा पाठलाग करताना आपापल्या टीमला दोघांनी मोठे विजय मिळवून दिले आहेत.
 
मॅक्सवेलचा खेळ जास्त स्फोटक आहे आणि तुलनेनं विराटच्या खेळात सातत्य आणि स्थिरता आहे.
 
पण म्हणून मॅक्सवेलला कमी लेखण्याची चूक करून अजिबात चालणार नाही. कारण कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद आणि फिरकी गोलंदाजी सहज खेळण्याची क्षमता त्याच्या खेळात आहे.
 
सर्वात मोठं आव्हान प्रेक्षकांचं
पण कदाचित या सामन्यात सगळ्यात मोठी लढाई ही मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही सुरु राहील. ती लढाई म्हणजे स्टेडियममधले सव्वा लाख भारतीय पाठीराखे आणि ऑस्ट्रेलियाचे 11 खेळाडू.
 
कमिन्स म्हणला आहे की, “खेळात एका मोठ्या प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियमला चिडीचूप करण्याइतकं समाधान कशातच नसतं, आणि तेच करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
 
आता कोण कुणाला गप्प करतंय, हे प्रत्यक्ष मॅचमध्येच कळेल.