बलिप्रतिपदा कहाणी
प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकले. मग विष्णूने वामनावतार घेतला व बळीच्या यज्ञात जाऊन त्याच्याकडे तीन पावले मावतील, एवढ्या जमिनीची याचना केली. बळीने त्रिपादभूमी वामनाला दिली. वामनाने दोन पावलांतच पृथ्वी व स्वर्ग व्यापला. तिसरे पाऊल कुठे ठेवू, असं विचारताच बळीने आपले मस्तक नमवून त्यावर तिसरे पाऊल ठेव, असं वामनाला सांगितलं. वामनाने बळीच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात दडपले. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका केली, व सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले. हे सर्व आश्विन वद्य त्रयोदशी ते अमावास्या या तीन दिवसांत घडलं. लक्ष्मीची सुटका झाल्यानंतर, ती कायम प्रसन्न असावी म्हणून तिची पूजा करण्याचा प्रघात सुरू झाला.
पुराणांत असं सांगितलं आहे की, आश्विनी अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधते. जिथे स्वच्छता, रसिकता असेल, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यनिष्ठ, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरूष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया असतील, त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं.
वामनाने जेव्हा तिसरं पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवलं, तेव्हा त्याने बळीराजाला पाताळात लोटण्यापूर्वी वर दिला की, 'तुझी आठवण कायम राहावी म्हणून कार्तिक शु. प्रतिपदेच्या दिवशी लोक तुझ्या नावाने आनंदोत्सव साजरा करतील.' कृष्णाने बळीराजास असा आशीर्वाद दिल्यानंतर दिवाळीला जोडून बलिप्रतिपदा साजरा करण्याचा प्रघात पडला.