रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (11:07 IST)

Yam Deep Daan धनत्रयोदशी पूजा विधी आणि यमदीपदानाचे महत्त्व

yam deep daan
Yam Deep Daan अश्‍विन महिन्याच्या तेराव्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचा वैद्य ‘धन्वंतरी देवता’ यांची जयंती. ‘धन्वंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेले भगवान धन्वंतरि यांच्या एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ असे. या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरि करतात.’
 
वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात.
 
या दिवसाला ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. हा दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो; कारण धनप्राप्तीसाठी श्री लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. या दिवशी ब्रह्मांडात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व प्रक्षेपित होत असते. व्यापारी वर्गाद्वारे नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात.
 
धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते.
 
धनत्रयोदशी या सणामागे एक कथा म्हणजे कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही आणि त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. अशात जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. 
 
मृत्यू कोणालाच चुकला नाही पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचे तेलाचे तेरा दिवे करुन घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावे. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
 
मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।
 
अर्थात धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.