मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (10:42 IST)

'दिवाळी दीपोत्सवाचा सण'

दिवाळी हा हिंदू लोकांचा मोठा आवडीचा सण आहे. तसे तर आपल्या हिंदू धर्मात बरेच सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दसऱ्याच्या 20 दिवसानंतर दिवाळी येते. दसऱ्या नंतरच दिवाळीसाठीची घरा घरात जय्यत तयारी सुरू असते. घराची डाग-डुजी, स्वच्छता करणे, रंग करणे, नवे कपडे घेणे, घरा -घरात नाना प्रकाराचे गोड-धोड केले जातात. घरा-घरात रांगोळ्या काढतात. आकाश कंदील लावतात. नवे कापडं घालतात. 

दिवाळीचा सण हा 6 दिवसाचा सण आहे. हा सण वसुबारस पासून सुरू होऊन भाऊबीज पर्यंत साजरा केला जातो. या सणा मध्ये वसु-बारस, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी-पूजन, पाडवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात. दिवाळीचा सण प्रामुख्याने उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतले होते. त्यांनी लंकेवर विजय मिळवून रावणाचे वध केले त्याच्या प्रीत्यर्थ हा विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. त्या वेळी लोकांनी आपल्या घरात दिवे लावून हा विजयोत्सव साजरा केला होता. त्यामुळे या दिवशी घरा-घरात दिवे लावतात. या शिवाय दिवाळीबद्दल आणखी काही पौराणिक कथा आणि माहिती देखील आहेत. चला जाणून घेऊया. 
 
प्रत्येक समाज किंवा धर्म आपल्या सणाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतात. हिंदूंचे मुख्य सण होळी, राखी, दसरा आणि दिवाळी आहे. दिवाळी सर्वात मोठा सण आहे. हा सण आश्विन अमावास्येला साजरा केला जातो. खरं तर अमावस्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त काळोखच. पण या दिवशीची अमावस्या असंख्य दिव्यांची असते. सर्वीकडे दिवे लखलखत असतात. अवसेच्या काळोखाची रात्र असंख्य दिव्यांनी झगमगते. सर्वीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण असतं. लहान मुलांच्या आनंदाला पारावारच नसतो. सण कोणता ही असो मुलं त्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. दिवाळीसाठी नवे परिधान घेतात, फटाके, फुलबाज्या सोडतात. वेगवेगळ्या व्यंजनांचा आस्वाद घेतात. लोक देवी लक्ष्मीच्या आगमनासाठी घराला स्वच्छ करतात. दिवाळीच्या 6 दिवसाच्या सणांबद्दल माहिती
 
1 वसु बारस - दिवाळीच्या सणाचा पहिला दिवस वसु -बारसेचा असतो. या दिवशी गाय आणि त्याचा वासराची पूजा केली जाते. बायका उपवास धरतात आणि संध्याकाळी गाय आणि वासराची पूजा करूनच उपवास सोडतात. गवारीची भाजी, बाजऱ्याची भाकर आणि गूळ असा नैवेद्य असतो. आपल्या मुलां-बाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि घरात सौख्य नांदावे यासाठी ही पूजा करतात. तसेच घरात लक्ष्मी आगमन व्हावे या हेतूने देखील गाय वासराची पूजा करतात. घरात या दिवसा पासून दिवे लावण्यास सुरुवात होते. दर रोज सडा-रांगोळी करतात.
 
2 धनतेरस - दुसरा दिवस असतो धन तेरस किंवा धनत्रयोदशीच्या. कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धनतेरस साजरा करतात. या दिवशी खरेदी करणं शुभ मानतात. व्यापारी वर्ग या दिवशी आपल्या व्यवसायाची नवी पुस्तके बनवतात आणि त्याची पूजा करतात. या दिवशी सोनं, चांदी, नवे कपडे, भांडे, धणे, लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, खेळणी, साळीच्या लाह्या-बत्ताशे इत्यादी विकत घेतात. या दिवशी लक्ष्मी, गणेश, कुबेर, धन्वंतरी आणि यमराजाची पूजा केली जाते. कोरडे धणे आणि गुळाचा नैवेद्य असतो. या दिवशी यम दीपदान करतात.
 
3 नरक चतुर्दशी - आश्विन कृष्ण पक्षाची चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणून साजरी करतात. या दिवशी अभ्यंग स्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी सुवासिक तेल लावून उटण्याने स्नान करतात. यमासाठी दीपदान करतात. या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करतात आणि घरातील पुरुष मंडळींना स्नान करताना दिवे ओवाळतात. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याचा प्रीत्यर्थ नरकचतुर्दशी साजरी करतात. असे म्हणतात की या दिवशी जो कोणी सूर्योदयाच्या पूर्वी उठून अभ्यंग स्नान घेत नाही त्याला नरकाच्या त्रास भोगावा लागतो. या दिवशी सकाळी दिवे लावतात जेणे करून वाईट आसुरी शक्तींचा नायनाट होवो. संध्याकाळी दुकानात घरात, कार्यालयात दिवे लावतात. याच दिवशी हनुमानाचे जन्म देखील झाले होते.
 
4 दिवाळी (लक्ष्मी-पूजन)- आश्विन अमावास्येला संध्याकाळी ही पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी देवी सर्वीकडे संचारते. स्वच्छ, योग्य असे स्थळ ती आपल्या वास्तव्यास शोधते. या दिवशी रात्री श्री गणेश, लक्ष्मी देवी आणि देवी सरस्वतीची पूजा करतात. अष्टदल कमळ किंवा स्वस्तिक वर लक्ष्मी स्थापित करून पूजा करतात. पंचामृत, साळीच्या लाह्या-बत्ताशे, धणे-गूळ, अनारसे, फळे यांचा नैवेद्य दाखवून सुवासिनी बायकांना हळदी-कुंकू देतात. या दिवशी नाणी, सोनं, चांदीची पूजा देखील करतात. रात्री फटाके उडवतात. व्यावसायिक किंवा व्यापारी वर्ग आपल्या दुकानाची पूजा करतात. मुले फुलबाज्या उडवून आपला आनंद साजरा करतात. घर लख्खं-लख्खं दिव्यांनी उजळून निघतं.
 
5 पाडवा- दिवाळीचा पुढचा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळी प्रतिपदा किंवा पाडवा असे ही म्हणतात. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. या दिवशी व्यापारी वर्ग नवं वर्षाची सुरुवात करतात. बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात आणि त्यांची पूजा करतात. तसेच नवीन कामाला सुरुवात करतात. याच दिवशी राजा बळीचे गर्वहरण श्री विष्णूनी वामनरूप धरुनी केले होते. या दिवशी घरातील स्त्रिया आपल्या वडीलधारी करता पुरुषाला औक्षण करतात. बाई आपल्या नवऱ्याला वडिलांना, सासऱ्यांना औक्षण करते. नवरा, वडील, सासरे तिला काही भेट वस्तू देतात. तसेच मुली देखील आपल्या वडिलांचे औक्षण करतात.
 
6 भाऊबीज - दिवाळीची सांगता भाऊबीजेच्या सणा नंतर होते. हा सण खास भाऊ -बहिणीचा आहे. कार्तिक शुद्ध द्वितीयेला ज्याला यम द्वितीया असे ही म्हणतात हा सण साजरा करतात. बहिणी या दिवशी भावाला बोलवून किंवा त्याचा कडे जाऊन गोड धोडाचे जेवण करतात. संध्याकाळी चंद्राची कोर बघून बहीण आधी चंद्राला नंतर भावाला ओवाळते. भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. या मागील शास्त्र असे की भाऊ चिरंजीव व्हावा आणि त्याची प्रगती व्हावी. भाऊ आपल्या बहिणीला यथाशक्ती भेटवस्तू देतो. ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या चंद्राला ओवाळतात. अश्या प्रकारे हा दिवाळीचा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्याची पद्धत आहे. 
 
दिवाळीत लोक एकमेकांकडे जाऊन शुभेच्छा देतात, मिठाई देतात. एकमेकांसह आनंद साजरा करतात पण या दिवशी काही लोक जुगार खेळतात. ते फार वाईट असत. समाजासाठी ही अतिशय वाईट बाब आहे. खरं तर हा दिवस आपल्याला उत्साहाने आनंदाने जगण्याची शिकवण देतो. आपल्याया वाईट सवयी पासून दूर राहावे. फुलबाज्या आणि फटाके सोडताना अतिशय काळजी घ्यावी. या दिवशी काही अतरंगी मुले मुक्या प्राण्यावर फटाके सोडतात, असे करू नये.आपल्या व्यवहारामुळे कोणाला ही त्रास न होवो याची काळजी घ्यावी. मुलांनी देखील मोठ्यांच्या संरक्षणाखालीच फटाके सोडावे. आणि या सणाचा आनंद घ्यावा आणि दिवाळीचा सण दणक्यात साजरा करावा.