शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. ऑनलाईन दिवाळी अंक
Written By वेबदुनिया|

साहित्यामागचं 'संमेलन'

नितीन फलटणकर

स्थळ- मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ... नेहमीप्रमाणेच विमानतळ गजबजलेलं. परंतु आज काही तरी खास वाटलं. काही कळेना काय भानगड आहे. कारण गर्दी अमाप. पण सिक्युरीटी नसल्याने माझा गोंधळच झाला. कारण हल्ली गर्दी म्हटलं म्हणजे नेतेमंडळी आसपास आहेत हे समजून घ्यावं लागतं ना.

मलाही सुरवातीला तसंच वाटलं. काही मंत्री किंवा मग एखादा गेलाबाजार गल्ली नेता आला असेल. पण त्यांच्या स्वागताची तयारी किंवा त्यांच्या स्वागताचे फलक वगैरे काही दिसत नव्हते. मग वाटलं क्रिकेटपटू वगैरे आले असतील. पण तसंही काही वाटत नव्हतं.

मग काय विचारता राव. डोक्यात या साऱ्या गोष्टींचे 'अपचन' झालं आणि शेवटी एका अधिकार्‍याच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तसा तो एकदम म्हणाला,
तो- एस सर व्हॉट कॅन आय डू फॉर यू?
मी- नथिंग, मला फक्त विचारायचंय, ही गर्दी कशाची?
तो- ओ.. ओ.. सर दीस इज फॉर गेट टू गेदर ऑफ मराठी लिटरेचर्स, पोयटस, नॉव्हेलिस्ट..
तो हसला. मी ही.
मी म्हटलं तुमचं नाव?
ओ हो आय एम 'अनिरूद्ध गाडगीळ'
सालं मराठी माणूस एअरपोर्टावर गेल्यावर मराठी माणसाशी आंग्ल भाषेत का बोलतो हा प्रश्न माझं डोकं कुरतडण्याच्या आत त्याच डोक्यात लख्ख वीज चमकली.

च्यायला ही तर साहित्य संमेलनाला जाणार्‍या सारस्वतांची गर्दी. हे साहित्य संमेलनाचं वर्‍हाड सन फ्रान्सिस्कोला निघालं होतं तर. मी सगळ्या साहित्यिकांवर नजर फिरवली. म्हटलं बघूया कुणी ओळखीचं दिसतंय का? पण शप्पथ. एक पण चेहरा ओळखीचा नव्हता. (याचा अर्थ साहित्यिक बिनचेहर्‍याचे असतात असं नव्हे.) बिचारे मराठी साहित्यिक ते. त्यांना कुठलं आंग्ल साहित्यिकांसारखं ग्लॅमर. कुठल्यातरी सर्कारी खात्यात खर्डेघाशी करायची आणि त्यातून वाचवलेल्या वेळेत साहित्यनिर्मिती करणार्‍या बापड्या गरीब मराठी साहित्यिकांना कुठे ग्लॅमर येणार. पण तरीही मी अमेरिकेला जाणार्‍या साहित्यिकांची यादी आठवून आठवून चेहरे शोधू लागलो. आमच्या 'सौ'चा दूरचा कुणी नातेवाईकही साहित्यिक आहे. ते दिसतात का म्हणून मी शोधू लागलो. पण शोधून कुणीही सापडलं नाही. यंदाच्या यादीत पत्रकार जास्त असल्याचे मला माझ्या मित्राने सांगितले होते, ते ओझरते आठवले. मग मी ठरवलं, पत्रकारांच्याच नजरेने पाहायचं.

आणि आपणच ओळखायचं कोण काय आहे ते? म्हणजे कोण नेमका कोणता साहित्यिक ते? मी मस्त गरम कॉफी पीत हे सारं पाहत होतो. एक माणूस सफारी घातलेला दिसत होता. तो सारखा सारखा लोकांना मोजत होता. बरं मला काही समजतच नव्हतं? तो माणसं का मोजतो आहे? सुरुवातीला वाटलं तो एखादा ट्रॅव्हल एजंट असेल, परंतु तो जवळ आल्यानंतर सारे त्याला मान देत होते, हा नेमका कोण आहे, माझ्यातील पत्रकार पुन्हा जागा झाला.

पण, काहीच उमगत नव्हतं. मग वाटलं, बरोबर तो या साऱ्यांचा सुरक्षा रक्षक असेल. मग त्याला मान का बरा दिला जातोय. मी अधिकच गोंधळलो. काही नाही. मग मी एका व्यक्तीच्या जवळ गेलो, त्याला विचारलं हे धावपळ करणारे कोण? एखाद्या लग्नात यजमानांची धावपळ सुरू असते, तशी यांची धावपळ सुरू आहे?
त्या माणसाने मला खालून वरपर्यंत पूर्ण निरखून पाहिलं, आणि विचारलं, तुम्ही माझी मराठीतील प्रसिद्ध कविता वाचलेली दिसत नाही? माझ्या पोटात गोळा आला. मनात विचार आला स्वामी समर्थ वाचवा मला. मग अचानकच त्यांनी आपला विषय मोडत दुसरीकडे मोर्चा वळवत जोरजोऱ्यात हसण्यास सुरुवात केली. मी कोपऱ्यात जाऊन घाम पुसून पुन्हा मैदानात आलो. आता मी ठरवलं माणूस पाहायचा आणि मगच प्रश्न विचारायचा.

एका कोपऱ्यात एक जण पेपर वाचत बसला होता. मी हेरलं, हे असतील प्रसिद्ध पत्रकार महाशय, मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांना विचारलं. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणे, कोणत्या दैनिकाचे तुम्ही? का चॅनलवाले? मी म्हटलं नाही तसं नाही, म्हणजे मलाच तुम्ही ते वाटलात म्हणून मी आलोय. त्यांनी अगदी निर्विकारपणे माझ्याकडे पाहत म्हटले, तो मी नव्हेच. मी ओळखलं ते कोण होते. मी म्हटलं मग तुम्ही पेपर इतक्या आवडीने पाहात होतात की मला वाटलं तुम्हीच याचे संपादक असाल, ते म्हणाले नाही तसं नाही. यात मी आज जाणाऱ्यांच्या यादीत माझे नाव आहे का ते शोधत होतो.

मी कपाळावर हात मारला. म्हणालो चुकलो. मला माफ करा. ते म्हणाले असू द्या हल्ली होतंच असं, मला लोकं हल्ली लिहिणं कमी केल्यापासून संपादकच म्हणतात. त्यांची पुन्हा माफी मागत मी मैदान सोडले.
आता ठरवलं जोपर्यंत खात्री पटत नाही, तोपर्यंत कोणाला ओळख विचारायची नाही. मग मी पुन्हा त्या फिरणाऱ्या माणसाकडे पाहू लागलो. त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होते. मी त्यांच्याकडे वळणार तोच त्यांना कोणीतरी 'काय पाटील..' अशी हाक मारली. मग मी यादी काढून त्यांचे नाव शोधण्यास सुरुवात केली, तर सर्वात वर एकच पाटील दिसले. मला उमजलं ते कोण ते?

मी साऱ्यांकडे पाहत होतो. साऱ्यांच्या वेषभूषा पार बदलल्या होत्या. कोणी झब्ब्याच्या जोडीला जीन्स घातली होती, तर कोणी जीन्सवर झब्बा. दोन- तीन जणांची वेष आणि केशभूषा नेमकी समजतच नव्हती, ते काय प्लॅनिंग करून हे सारं करून आलेत ते? कोणाचे फोन अजूनही चालूच होते. कोणी सारखं विमानाकडं पाहत होतं, कोणी पहिल्यांदाच विमान पहिल्याने त्यांनी आपल्या प्रवासवर्णन लिहायला विमानतळावरूनच सुरुवात केली होती. कोणाला विषयच सूचना नव्हते. चार-चौघे एकत्र येऊन एकमेकांनाच वाहवा देत होते.

यादीतून आपले नाव वगळण्याच्या भीतीपोटी अनेकजण लपण्याचा प्रयत्नही करताना दिसत होते, तितक्यात
अनाऊंसमेंट झाली. साऱ्यांनी एकमेकांचे हात धरत, चला असे म्हणत, दाराकडे एकमेकांना रेटण्यास सुरुवात केली. मला वाटलं माझीच फ्लाईट असेल, पण या साऱ्या साहित्यिकांचे विशेष विमान होते. काही कारणांमुळे त्यांना उशीर झाला होता. पण अखेर त्यांचे विमान आलेच..

मला मनस्वी आनंद झाला, चला संमेलनात सहभागी होता येणार नाही, कधी संमेलन पाहिलं नाही, कधी
साहित्यिकांचा सहवास लाभला नाही, पण आज बदललेलं साहित्य विश्व आणि विमानाने बाहेर जाणारी मराठी ग्रंथ मला पाहायला मिळाल्याने मी सुखावलो होतो.

साऱ्यांची लगबग चालली होती, मी मान हालवत, परत जागेवर बसलो. तो गोंधळ मला साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाची आठवण करून देत होता. तितक्यात माझी नजर अजूनही खुर्चीवरच बसलेल्या एका वयस्कर महिलेकडे गेली. कपाळाला हात लावून त्या बसल्या होत्या. कदाचित त्यांनाही हे असं पळापळ करणं आणि किलकिलाट पसंत नव्हता.

मला त्यांचा चेहरा नीट दिसत नव्हता म्हणून मी त्याच्याकडे गेलो. मला वाटलं वयोमानानुसार त्यांना त्यांचे सामान उचलता येत नसल्याने त्या बसल्या असतील. पण तसे नव्हते. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटलो. त्यांना पाहताक्षणीच मला त्या कोण ते कळले. मी त्यांना वाकून नमस्कार केला. म्हटलं ताई का बसलात? अहो तुमचं विमान जाईल निघून, त्या हसल्या म्हणाल्या जाऊदे केला. माय पोरं तिथं माझी वाट पाहतायेत.

मला त्यांना सोडून जावं वाटत नाही बघ. पण काय करावं हे म्हणाले चलाच ताई, म्हणून आले. पदर डोक्यावर घेत त्या म्हणाल्या सगळे गेले की जाईल मी मागून, माझी काळजी नको करूस. या साऱ्यांच्या गराड्यात मला फक्त हाच चेहरा ओळखीचा आणि खरा वाटला. त्या सिंधुताई होत्या. सिंधुताई सपकाळ......