शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. दिवाळी फराळ
Written By

पिठी साखरेचे चिरोटे

साहित्य : बारीक रवा १ वाटी, अर्धी वाटी मैदा, तांदुळाची पिठी ५-६ मोठे चमचे, साजूक तूप ७-८ मोठे चमचे, चवीपुरते मीठ, ४-५ मोठे चमचे तेल, तळण्यासाठी तेल, पिठीसाखर चिरोट्यांवर पेरण्यासाठी, रवा मैदा भिजवण्यासाठी दूध.

कृती : सर्वप्रथम रवा मैदा एका परातीत घ्या. त्यात अगदी थोडे चवीपुरते मीठ घाला. एका कढईत 5-6 मोठे चमचे तेल तापवून घ्या. ते चांगले कडकडीत तापल्यावर रवामैद्यावर घाला. एका चमच्याने पीठ एकसारखे करून घ्या व दूध घालून रवामैद्याचे पीठ भिजवा. हे पीठ २ तास मुरू द्यावे. नंतर एका वाटीमध्ये तांदुळाची पिठी व साजूक तूप घ्या व हे मिश्रण चांगले फेटून घ्या. हे मिश्रण पोळीवर लावण्याइतपत पातळ करा.
 
कढईत तेल घालून गरम करा. रवामैद्याच्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन एक खूप पातळ पोळी लाटा. ही पोळी एका ताटात काढून घ्या. अशीच अजून एक खूप पातळ पोळी लाटा. या पोळीवर सर्व बाजूने तुपात भिजवलेले तांदुळाचे पीठ लावा. त्यावर आधी केलेली पातळ पोळी ठेवा व या पोळीवरही तांदुळाचे पीठ सर्व बाजूने लावा. आता या पोळीच्या घड्या घाला. दोन्ही बाजूने अर्धी अर्धी घडी घाला व या दोन्ही अर्ध्या घड्या एकमेकांवर येऊ देत. प्रत्येक घडी घालताना त्यावर तांदुळाचे पीठ लावून घ्या. आता एक वळकटी तयार होईल. ही वळकटी दोन्ही बाजूने दुमडून घ्या म्हणजे आत लावलेले पीठ बाहेर येणार नाही. आता या वळकटीचे सुरीने चौकोनी तुकडे करा. या तुकड्यांवर एकदा आडव्या बाजूने व एकदा उभ्या बाजूने अलगद लाटणे फिरवा. अशा रितीने सर्व चिरोटे करून घ्या.
 
कढईत तेल तापत ठेवलेले आहे त्याची आच मध्यम करा. तापलेल्या तेलात सर्व चिरोटे तळून घ्या. तळून ताटात काढल्यावर लगेचच गरम 
 
असताना त्यावर पिठीसाखर पेरा. हे चिरोटे खुसखुशीत व कुरकुरीत होतात. यंदाच्या दिवाळीत हे नक्की करून बघा.