शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By विकास शिरपूरकर|

'मि. एक्लिप्स'ना तुम्ही ओळखता?

PRPR
'सावल्‍यांच्‍या मागे धावणे हा वेडेपणा आहे' असे म्हणतात. मात्र, हा वेडेपणा पत्करून आयुष्‍यभर सावल्‍यांचा पाठलाग करणा-याला तुम्ही काय म्हणाल? नक्कीच 'ठार वेडा' म्हणून संबोधाल नाही का?. वयाच्‍या 72 व्‍या वर्षीही याच सावल्‍यांचा ध्‍यास घेऊन त्‍यांच्‍या मागे पळणारा असाच एक ठार वेडा आहे. फ्रीड स्पेनक हे त्याचं नाव असलं तरी 'मि. एक्लिप्स' या नावाने तो जगभरात ओळखला जातो.

चंद्र आणि पृथ्‍वीच्‍या सावल्‍यांचा तुम्ही शाळेत अभ्‍यास केला असेल आणि ग्रहण म्हणजे काय हे तुम्हाला कळत असेल तर मि. एक्लिप्सबद्दल तुम्हाला माहिती असायलाच हवी. कारण ग्रहण आणि त्याच्या सावल्या हा या माणसाचा अभ्यासाचा विषय आहे आणि वयाच्या ७२ व्या वर्षीही हा माणूस सावल्यांच्या मागे पळतोय. 'संपेल ना कधी ही हा खेळ सावल्यांचा' हे त्याच्या बाबतीत अगदी खरं आहे.

'नासा' या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्‍थेमध्ये ग्रहणाच्‍या घटनांचे वृत्तांकन आणि छायाचित्रणाचे काम करणारे एक्लिप्स हे खगोल शास्त्रज्ञांमध्‍ये ग्रहण या विषयावरील चालता-बोलता 'एन्‍सायक्लोपिडीया' म्‍हणून परिचित आहेत. कुठल्‍या वर्षी, कोणत्या दिवशी, कशा प्रकारचे ग्रहण असेल आणि ते कोणत्या ठिकाणावरून किती वाजता आणि किती वेळ पाहता येईल याची अचूक माहिती कुठल्‍याही यांत्रिक उपकरणांची मदत न घेता मि. एक्लिप्स सांगू शकतात. इतका त्यांचा या विषयातील गाढा अभ्‍यास आहे.

सात-आठ वर्षाचे असताना फ्रीड एकदा आपल्‍या आजोळी गेले. त्‍यावेळी शेजारच्‍या एका मुलाच्‍या लहानशा टेलिस्‍कोपमधून त्यांनी पहिल्‍यांदा चंद्र पाहिला. आणि त्‍या दिवसांपासून त्‍यांना ग्रह व तार्‍यांचे जणू वेडच लागले. तासनतास आकाशाकडे डोळे लावून ग्रह व तार्‍यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा छंदच झाला. तब्बल दोन वर्षे वडिलांचा पाठपुरावा केल्‍यानंतर फ्रीडला वडिलांनी पहिली दुर्बिण घेऊन दिली आणि त्‍यांचे आख्‍खे जीवनच बदलले.

भौतिक शास्‍त्रात पदवी आणि पदव्‍युत्तर शिक्षण घेतल्‍यानंतर स्‍पेनक यांनी कोलोरॅडोतील एका महाविद्यालयातून प्राध्‍यापक म्हणून आपल्‍या कारकीर्दीला सुरवात केली. नंतरच्‍या काळात नासामध्‍ये आल्‍यानंतर हवामानाचे अंदाज, नकाशे आणि भविष्‍यातील ग्रहणांची माहिती पुरविण्‍याचे काम त्‍यांनी सुरू केले. या काळात त्‍यांनी ग्रहण या विषयावर मुबलक लिखाण केले. त्‍यांचे Fifty Year Canon of Solar Eclipses: 1986-2035 आणि Fifty Year Canon of Lunar Eclipses: 1986-2035 ही गाजलेली पुस्‍तके म्हणजे खगोल शास्‍त्राचा अभ्‍यास करणा-यांसाठी भगवद्गीताच आहे.या शिवाय त्‍यांनी जेन म्‍युस या खगोलशास्‍त्रज्ञांसोबत Five Millennium Canon of Solar Eclipses नावाचे पुस्‍तकही लिहिले आहे.

फ्रीड यांनी आतापर्यंतच्‍या आपल्‍या कारकीर्दीत सर्व प्रकारची 20 हून अधिक ग्रहणे पाहिली आहेत. प्रत्येक ग्रहण वेगळे आणि वैशिष्‍ट्यपूर्ण असल्‍याचे त्यांचे मत आहे.

चंद्र आणि सूर्य ग्रहण पाहण्‍यासाठीच्‍या पध्‍दती वेगवेगळ्या असतात असे फ्रीड यांचे मत आहे. ते म्हणतात, 'सूर्यग्रहणा सोबत मी कशाचीही तुलना करू शकत नाही. सूर्यग्रहण पाहण्‍यासाठी तुमच्‍याकडे केवळ काही मिनिटे असतात आणि त्यामुळे तुमच्‍याकडच्‍या 'बेस्‍ट' साहित्‍यासह तुम्‍हाला सज्ज रहावेच लागते. कदाचित नंतर आयुष्‍यात ती संधी तुम्हाला कधीही मिळणार नाही.

चंद्रग्रहण मात्र काहीसे वेगळे असते. सर्वांत सुंदर असा तो क्षण असला तरीही त्यात सूर्यग्रहणासारखी एक्‍साईटमेंट नसते. ते तुम्ही आरामात तास दीड तास पाहू शकता.

नासामधून निवृत्तीनंतरही 'मि.एक्लिप्स' जगभर ग्रहणांच्‍या आणि सावल्‍यांच्‍या शोधासाठी भटकत असतात. सध्‍या ते दक्षिण चीनमध्‍ये ठाण मांडून असून तेथून शतकातील सर्वांत मोठ्या खग्रास सूर्यग्रहणाचा ते अभ्‍यास करणार आहेत.

[email protected]
(09713039145)