शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 (18:53 IST)

दहशतवादाशी लढण्यास शासन सज्ज- मुख्यमंत्री

दहशतवादाशी लढण्यास राज्य शासन सज्ज असून त्यासाठी आवश्यक यंत्रणा सक्षम करण्यात आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी इंडियन मर्चंटस् चेंबर्सतर्फे आयोजित श्रध्दांजलीपर कार्यक्रमात केले.

चर्चगेट येथील सदर संस्थेच्या कार्यालयात हा कार्य़क्रम झाला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतिफलकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी अनावरण करण्यात आले.

मुंबईवरील हल्ल्याचा दिवस अतिशय दुर्दैवी होता, असे उद्गार काढून श्री. चव्हाण म्हणाले, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पोलीस अधिकारी, जवान आणि नागरिकांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. गेल्या वर्षभराच्या कालावधीत मुंबई आणि राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

दहशतवाद आज जागतिक समस्या झाली आहे. दहशतवादाशी लढताना राज्य आणि अवघ्या देशातील जनतेने दाखविलेली एकजूट अतिशय महत्त्वाची आहे, असेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त डी. शिवानंदन, इंडियन मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष गूल कृपलानी, उपाध्यक्ष दिलीप दांडेकर, मर्चंटस् चेंबर्सचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.