मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परदेशातील संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (10:03 IST)

६७% विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्राधान्य, सर्वाधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील

गेल्या काही वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांचे परदेशी विद्यापीठांत शिक्षणासाठीचे प्रमाण वाढले आहे. विविध क्षेत्रांतील अत्याधुनिक शिक्षण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा हा परदेशी शिक्षणाकडे राहिला असून याकरिता विद्यार्थ्यांची अमेरिकेला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्रिटन आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमधील गेल्या १२ महिन्यांतील प्रवाह जाणून घेण्यासाठी प्रोडिजी फायनान्स या क्रॉस बॉर्डर फिनटेक प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी सर्वाधिक विद्यार्थी हे महाराष्ट्रातून जात असल्याचे देखील या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
 
विदेशात मास्टर्स डिग्री करण्याकरिता प्रोडिजी फायनान्सद्वारे निधी पुरवलेल्या एकूण भारतीय विद्यार्थ्यांपैकी ६७% विद्यार्थी अमेरिकेत गेले. त्यानंतर ब्रिटन आणि फ्रान्समध्ये प्रत्येकी ८% विद्यार्थी गेले. मागील वर्षी उच्च शिक्षणाकरिता कर्जाच्या स्वरुपात प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास ४०,४६१ डॉलर (३० लाख रुपये) वितरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग कोर्ससाठी नॉर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी, द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास-अल्रिंगटन आणि स्टिव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या विद्यापीठांना पसंती दिली गेली. तर जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ टोराँटो आणि युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर या एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध आहेत.
 
मागील वर्षात भारतातील ज्या राज्यांतून विद्यार्थी विदेशात शिकायला गेले त्या राज्यांमध्ये महाराष्ट्र (२०%) शीर्षस्थानी असून कर्नाटक (१५%), दिल्ली (१२%) आणि तेलंगणा (८%) यांचा समावेश होता. विदेशात गेलेल्यांपैकी जवळपास ७०% पुरुष तर ३०% महिला होत्या. मागील वर्षी देशव्यापी लॉकडाऊनमु‌ळे बहुतांश कुटुंबांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागल्याने विदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अनिश्चितता होती. तरीही २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये यासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये ४१% ची वृद्धी दिसून आली.
 
प्रोडिजी फायनान्सचे कंट्री हेड इंडिया श्री मयांक शर्मा म्हणाले, “जगभरातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसमोर २०२० या वर्षाने अनेक आ‌व्हाने उभी केली. आर्थिक बाजारही यामुळे आकुंचन पावला. त्यामुळे मागील वर्षात तत्परतेने विद्यार्थ्यांना भांडवल पुरवण्यासाठीही आम्हाला मर्यादा जाणवल्या. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय सीमा हळू हळू खुल्या होत आहेत. लसीकरण मोहीम पाहता पुढील तिमाहीत कँपस शिक्षण आणखी आशादायी वाटते आहे. त्यामुळे २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये ३०-३५% वृद्धीची आम्ही अपेक्षा करतो.”
 
प्रोडिजी फायनान्सने नुकतीच सहा आंतरराष्ट्रीय महाविद्यालयांशी भागीदारी केली. याद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना ८०० कॉलेज आणि १००० पोस्ट-ग्रॅज्युएट कोर्सची सुविधा मिळाली आहे. जगभरातील जवळपास २०,००० विद्यार्थ्यांना मदत केल्यानंतर या प्लॅटफॉर्मद्वारे पुढील तीन वर्षात २०,००० पेक्षा जास्त पात्र विद्यार्थ्यांना १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे.