श्री गजानन विजय ग्रंथ पारायण प्रकार
पारायण करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी-
पारायण नेहमी मनापासून व भक्तिभावाने करावे. केवळ देखावा करण्यासाठी किंवा दुसरा करतो म्हणून केलेले वाचन योग्य नव्हे.
दुसऱ्यांनी कौतुक करावं म्हणून वाचन करणे योग्य नाही.
इतरांपेक्षा लवकर वाचन करता येतं म्हणून स्पर्धात्मक वाचन करणे अगदी अयोग्य. स्पष्ट व भक्ती असणे अती आवश्यक.
केवळ प्रसिद्धीसाठी केलेले वाचन किंवा मानधन घेऊन केलेले वाचन योग्य नाही.
वाचनातून बोध किंवा शिकवण घेणे आवश्यक.
पारायणाचे प्रकार
१) एकआसनी पारायण- एका दिवसात एकाच बैठकीत संपूर्ण २१ अध्यायाचे पारायण करणे. गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या एक आसनी पारायणाचे विशेष महत्व असल्याचे दासगणूनी सांगितले आहे.
२) एकदिवसीय पारायण- एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार २१ अध्यायाचे पारायण करणे. जागतिक पारायणदिनाला या दोनपैकी एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे.
३) तीन दिवसीय पारायण- तीन दिवस दररोज दिवस दररोज ७ अध्याय वाचून हे पारायण केलं जातं. दशमी, एकादशी व द्वादशी च्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्व संतकवी दासगणूनी सांगितले आहे.
४) सप्ताह पारायण- सात दिवस दररोज ३ अध्याय वाचून हे पारायण केलं जातं.
५) गुरुवारचे पारायण- गुरुवार हा महाराजांचा शुभदिन तसेच २१ हा महाराजांचा शुभ अंक. २१ भक्तांचा ग्रुप तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचावयाचा व सगळे मिळून २१ अध्याय वाचून पारायण पूर्ण करायचे. यामध्ये दर गुरुवारी एक पारायण व २१ गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणीत लाभ मिळतो.
६) चक्री पारायण- अनेक भक्तांनी मिळून दररोज एक अध्याय (समान अध्याय जसे पहिल्या दिवशी सर्वांनी पहिला) वाचन करून २१ दिवसात हे पारायण करावे. ह्यामधे भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या कितीही असू शकते.
७) संकीर्तन पारायण- एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन करणे व इतरांनी ते श्रवण करणे.
८) सामुहिक पारायण- एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे. येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे.