बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 26 मे 2014 (10:37 IST)

शपथविधीची जंगी तयारी

भारतीय जनता पक्षाचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रिमं डळाचा शपथविधी सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळाला अधिकाराची आणि गुप्ततेची शपथ देतील.
 
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला सुमारे तीन हजार पाहुणे उपस्थित राहणार असून त्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, श्रीलंकेचे अध्यक्ष महेंद्र राजपक्षे, अफगाणिस्तानचे अध्यक्ष हमीद कलझाई यांचा प्रामुख्याने समावेश आहे. ‘सार्क’ देशाच्या सर्वच प्रमुखांना मोदी यांच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण देण्यात आले आहे.
 
समारंभाला मावळते पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, इतर पक्षांचे नेते आणि नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबाई उपस्थित राहणार आहेत.
 
विदेशी पाहुण्यांमध्ये नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला, भूतानचे पंतप्रधान शेरींग तोद्दी, मालदीवचे अध्यक्ष अब्दुला येमेन गय्यूम हे उपस्थित राहणार आहेत. बांगला देशच पंतप्रधान शेख हसीना या जपानच दौर्‍यावर असल्यामुळे बांगला देश संसदेचे सभापती शिलीन चौधरी हे समारंभाला शोभा आणणार आहेत.
 
देशाच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला प्रथमच ‘सार्क’ देशाच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच मोदी यांनी आपला शपथविधी राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलऐवजी प्रशस्त प्रांगणामध्ये व्हावा, अशी इच्छा व्यक्त केल्यावर राष्ट्रपती भवनाने त्याप्रमाणे  चोख व्यवस्था केली आहे. या अगोदर माजी पंतप्रधान चंदशेखर यांनीदेखील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणामध्ये शपथ घेतली होती.
 
गेल्या तीस वर्षात प्रथमच एका पक्षाला एवढे प्रचंड बहुमत मिळालेल्या सरकारचे नेतृत्व करण्याचे भाग्य नरेंद्र मोदी यांना मिळत आहे. शपथविधी समारंभाचवेळी कोणतीही जोखीम नको म्हणून राष्ट्रपती भवन व परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पण प्रजासत्ताक दिनाच्या  सोहळवेळी जसे हवेतून विमाने व हेलिकॉप्टर्स यांचा पहारा ठेवण्यात येतो, तशी आकाशातून टेहळणी करण्यासाठी विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रपती भवन वसलेल्या रायसीना भागामध्ये आपल्या तुकडय़ा तैनात करण्याचे ठरविले आहे. शपथविधीच्या वेळेत पाच तास राष्ट्रपती भवन परिसरातील वाहतूक तहकूब ठेवण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवन परिसरातील सरकारी कार्यालये दुपारी एक वाजल्यापासून बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रजासत्ताक दिनाप्रमाणेच भारतीय वायुदलाची विमाने व हेलिकॉप्टर्स दुपारपासून राष्ट्रपती भवन परिसरामध्ये घिरटय़ा घालत राहणार आहेत.