केजरीवालांचे आव्हान दखलपात्र नाही : भाजप
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी दिले असले, तरीही त्यांचे आव्हान दखलपात्र नाही, असे भाजपचे मत आहे. भाजपतर्फे मोदी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाने शनिवारी जाहीर केले. त्यानंतर‘जनतेने मागणी केल्यास आपणही वाराणसीतून लढू’असे केजरीवाल यांनी रविवारी सांगितले होते.
भाजपचे प्रवक्ते हरीश खुराना म्हणाले, देशात सर्वत्र मोदींची लाट आहे. आम्ही केजरीवाल यांचे आव्हान फार गांभीर्याने घेत नाही.‘आपण अराजकवादी आहोत’असे केजरीवाल यांनी स्वत:च सिद्ध केले आहे. दिल्लीतील त्यांची 49 दिवसांची सत्ता म्हणजे संपूर्ण अपयश होते. त्यात त्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली. उत्तर प्रदेश राहू द्या, केजरीवाल यांना दिल्लीतदेखील एकही जागा जिंकता येणार नाही.

