गुरूवार, 6 ऑक्टोबर 2022
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. देव-देवता
Written By अभिनय कुलकर्णी|

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु

पंढरपूर आणि विठोबा याच्या स्थानाविषयी आणि तो मुळचा कुठला हा वाद त्याच्या जन्माइतकाच जुना असावा. त्यात त्याच्याविषयी केलेले कानडा, कर्नाटकू, कानडे हे उल्लेख त्याचे मूळ रूप कानडी असावे हे दर्शवितात की काय असा प्रश्न पडतो. अनेक संतांच्या अभंगात त्याच्या कानडीपणाविषयी उल्लेख आहेत.

MH GovtMH GOVT
वास्तविक पंढरपूरला पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, पंडरी अशी नावे वेगवेगळ्या काळात देण्यात आली. पंढरपूरचा पांडरंगपल्ली या नावाने सर्वांत जुना उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जयद्विठ्ठ नावाच्या ब्राह्मणास दिलेल्या ताम्रपटात आढळतो. सोळखांबी मंडपाच्या पूर्वद्वारासमोरील दगडी तुळईच्या तिन्ही बाजूंवर देवनागरी लिपीत आणि संस्कृत व कानडी भाषांतील शिलालेखांत पंढरपूरला पंडरंगे म्हटले असून होयसळ वीर सोमेश्वर याने विठ्ठल देवाचे अंगभोग आणि रंगभोग यांसाठी आसंदी नाडामधील हिरिय गरंज (कर्नाटकातील चिकमगळूर जिल्ह्यातील कट्टर तालुक्यातील हिरे गरंजी गाव) हे गाव दान केल्याचे म्हटले आहे. बेळगावजवळच्या बेंडेगिरी गावाच्या सुसंस्कृत ताम्रपटात पंढरपुरास पौंडरीकक्षेत्र आणि विठोबास विष्णू म्हटले आहे.

पंडरगे हेच या क्षेत्राचे मूळ नाव असून ते कर्नाटकी असल्याचे काही पुरावे आढळतात. हिप्परगे, सोन्नलिगे, कळबरगे या कन्नड नावप्रमाणे पंडरगे हे नाव आहे. पंडरगे या क्षेत्र नावाचा अपभ्रंश होऊन पांडूरंग हे विठ्ठलाचे नाव झाल्याचेही एक मत आहे.

ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगातही विठ्ठलाच्या कानडेपणाचे उदाहरण आढळते.

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु| येणे मज लाविले वेधीं ||
असे ते म्हणतात. ज्ञानेश्वरांनी त्याला कानडा म्हणताना त्याच्या कर्नाटक प्रांताचाही उल्लेख केला आहे. याशिवाय एकनाथांनी तर तीन अभंगात विठ्ठल आणि कानडा हे नाते रंगविले आहे. कानडा विठ्ठल असे त्याला संबोधून नाथ म्हणतात

नाठवेचि दुजें कानड्यावाचुनी | कानडा तो मनी ध्यानी वसे ||
याशिवाय या विठ्ठलाचे तीर्थ कुठले हे सांगताना नाथ म्हणतात
तीर्थ कानडे देव कानडे | क्षेत्र कानडे पंढरिये |
विठ्ठल कानडे भक्त हे कानडे | पुंडलिके उघडे उभे केले ||

नामदेवांच्या अभंगातही कानडेपणाचा उल्लेख येतो.
कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी
भक्तांचे आर्त वो जीवा लागले भारी ||
इतकेच नव्हे तर नामदेव त्याच्या भाषेचाही उल्लेख करतात
विठ्ठल कानडे बोलू जाणे | त्याची भाषा पुंडलिक नेणे ||

MH GovtMH GOVT
रा. ज. पुरोहित व डॉ. रा. गो. भांडारकर हे अनुक्रमे पुंडरीकपूर व पांडुरंगपूर यांपासून पंढरपूर हा शब्द उत्पन्न झाला असे मानतात. चौ-याऐंशीच्या शिलालेखात (1273) पंढरपूरास फागनिपूर व विठोबास विठठ्ल किंवा विठल म्हटले आहे. 1260 ते 1270 च्या दरम्यानच्या हेमाद्रीच्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथात पंढरपूरला पौंडरीक व विठोबाला पांडुरंग संबोधिले आहे. 1258 च्या सुमारास चौंडरस या कानडी कवीने आपल्या अभिनव दशकुमारचिरते ग्रंथात पंढरपूर, विठठ्ल मंदिर व तेथील गरूड, गणपती, क्षेत्रपाल, विठ्ठल, रूक्मिणी यांचे वर्णन केले आहे. चोखामेळ्याच्या समाधीजवळच्या 1311 च्या मराठी शिलालेखात पंडरीपूर व विठल आणि विठ्ठल असे उल्लेख आढळतात.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि विठ्ठलाच्या मूळ रूपाचा शोध घेऊन त्यावर विठ्ठल एक महासमन्वय हा ग्रंथ लिहिणाऱ्या रा. चिं. ढेरे यांच्या मते मूळ विठ्ठल हा कानडीच आहे हे आपण मान्य केले पाहिजे. ते म्हणतात, संतांनी विठ्ठलाला लावलेले कानडा हे विशेषण त्याच्या स्वरूपाच्या अगम्यतेचे द्योतक आहे, असे म्हटले जाते. वेदा मौन पडे |श्रुतीसी कानडे यातून ते स्पष्ट होते. पम तरीही कानडा याचा अगम्य हा लक्ष्यार्थही त्या शब्दाच्या कर्नाटकीय या वाच्यार्थावरून आलेला आहे, हे विसरता येणार नाही. ज्ञनदेवांनी तर कानडा आणि कर्नाटकू हे दोन्ही शब्द वापरून याबाबतीतील संदिग्धता पूर्णतः मिटवली आहे, असे ढेरे यांचे मत आहे.

कानडा म्हणजे अगम्य आणइ कर्नाटकू म्हमजे करनाटकू (लीलालाघवी) असे अर्थ घेऊन विठ्ठलाच्या कर्नाटकियत्वाचे त्याच्या कानडेपणाचे निराकरण करण्याचा प्रयत्न अनेक मराठी अभ्यासक करताना दिसतात. प्रादेशिक अस्मिता म्हणून हे कितीही सुखद असले तरी वस्तुस्थिती तशी नाही, असे श्री. ढेरे यांचे स्पष्ट मत आहे.

पंढरपूर हे स्थान महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे. पंढरपूरजवळचे मंगळवेढे महात्मा बसवेश्वर यांचे कार्यक्षेत्र होते. पंढरपूरचे पुरातन नाव पंडरगे हे पूर्णपणे कन्नड आहे. विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार, सेवेकरी कर्नाटकीय आहेत. त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटकातले आहेत. याशिवाय यासंदर्भातील अनेक लहान सहान गोष्टी विठ्ठलाच्या कानडी रूपाला अधोरेखित करतात, असा निष्कर्ष श्री. ढेरे यांनी त्यांच्या संशोधनातून काढला आहे. तथापि हे मात्र खरे की, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा इ.मराठी संतांनी पंढरपूरचा महिमा वाढविला व गाजविला. महाराष्ट्रातील वारकरी आणि कर्नाटकातील हरिदास येथे सारख्याच भक्तिभावाने येतात.
त्यामुळे प्रादेशिक संस्कृतीचा समन्वय आणि मराठी-कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो.