कृष्णाला पूर्ण पुरूष मानले जाते. भारतीय जनमानसावर, आध्यात्मावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला, कृष्णनीती, कृष्णकृत्य असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. त्याच्या लीलांमुळे तो बालगोपाळांना आपला वाटतो.
त्याच्या अलौकीक व्यक्तिमत्वाची भुरळ गोपींवरही पडली होती. त्याचवेळी त्याच्या भगवदगीतेतील चिंतनातून तत्वज्ञ म्हणूनही तो ओळखला जातो. महाभारताच्या युद्धात पांडवांचा सल्लागार म्हणूनही त्याचे वेगळे दर्शन घडते. कृष्णाची ही रूपे जनमानसावर प्रभाव टाकणारी आहेत.
कृष्ण हा भगवान विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कंसाची बहीण देवकी व वासूदेव यांचा कृष्ण हा आठवा मुलगा. देवकीचा आठव्या मुलाच्या हस्ते आपला वध होणार असल्याचे भविष्य सांगितले गेल्याने कंसाने तिची सहा मुले आपटून ठार केली होती. बलरामाला योगमायेच्या रूपाने नेण्यात आले होते.
मात्र, कृष्णाचा जन्म झाल्यानंतर वासुदेवाने त्याला टोपलीतून यमुना नदी पार करून गोकुळात यशोदेच्या घरी पोहोचविले. तेथे मोठा झाल्यावर त्याने आपल्याला मारण्यास आलेल्या पूतना या राक्षसीचा वध केला. कंसाने त्याला मारण्यासाठी अनेक राक्षस पाठविले.
पण कृष्णाने त्यांची तीच गत केली. कालिया नावाच्या महाभयंकर सर्पालाही त्याने मारले. मोठा झाल्यावर कृष्ण मथुरेत गेला. तेथे त्याने कंसाचा वध केला. दरम्यानच्या काळात त्याची अर्जुन व इतर पांडवांशी मैत्री झाली. कौरव पांडवांच्या युध्दात त्याने पांडवांना साथ दिली.
या युध्दात तो अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. या युध्दातच समोर आपले ज्येष्ठ श्रेष्ठ नातेवाईक पाहून गोंधळलेल्या अर्जुनाला त्याने त्याचे कर्म करावे यासाठी भगवद्गीता सांगितली.
'कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नका', यासह अनेक जीवनोपयोगी तत्वज्ञान सांगणारा कृष्ण तत्वचिंतकांचाही आवडता आहे. म्हणूनच त्याच्या भगवदगीतेवर आजपर्यंत सर्वाधिक टीका (समीक्षा या अर्थाने) झाली आहे. भारतीय दर्शनशास्त्रात म्हणूनच भगवदगीतेला मोठे स्थान आहे.