शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Modified: बुधवार, 22 मार्च 2023 (15:51 IST)

गुढीपाडवा – एकाच वर्षात दोन गुढीपाडवे

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
 
गुढीपाडवा – एकाच वर्षात दोन गुढीपाडवे
साधारणपणे शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षात वर्षारंभी एक आणि एकच गुढीपाडवा येतो. पण शके १९३८ मध्ये दोन गुढीपाडवे आले होते.
 
८ एप्रिल २०१६ पासून सुरू होणाऱ्या शालिवाहन शक १९३८ या नूतनवर्षी वर्षारंभी आणि वर्षअखेरीस असे दोन गुढीपाडवे आले होते. ८ एप्रिल २०१६ रोजी रोजी गुढीपाडवा आलाच होता, पण नंतरच्या वर्षी शके १९३९ च्या चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशीच्या २८ मार्च २०१७ रोजी आलेल्या अमावास्येच्या दिवशी-सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा करावा लागला.

गुढीपाडवा – सांस्कृृतिक इतिहास
 
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे सांगितले आहे.
 
श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला.
 
शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला.
 
प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्यादिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनींची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. काश्मिरी मुलींना पार्वतीचे रूप असे श्रीकृष्णाने म्हटले आहे. पार्वती लग्न झाले की माहेरवाशिणी म्हणून महिनाभर माहेरी राहते. तेव्हा तिच्या कौतुकासाठी चैत्रगौरीचे हळदीकुंकू केले जाते. अक्षयतृतीया यादिवशी ती सासरी जाते. संदर्भ- शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंशात व भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ या नाटकांमध्ये आले आहेत.
ध्वजांचे पौराणिक उल्लेख
 
प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी)च्या अनुषंगाने झालेल्या अभ्यासाच्या दृष्टीने इंद्रध्वज व ब्रह्मध्वज कसे दिसत याबद्दल उपलब्ध वर्णने फारच कमी वाटतात. जी वर्णने उपलब्ध आहेत त्यांच्यांतही आपआपसांत फरक आहे. त्यांमध्ये इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही केली गेली आहे असेही दिसते.
 
रामायण, महाभारत आणि पुराणे असोत, अथवा नाटके, इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात आलेले दिसतात. नायकांना इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्थी पडणाऱ्या शत्रुपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसून येते.
 
श्रीरामाने रावणावर विजय मिळवून ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपरिक समजूत आहे.
 
    ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैश च सर्वतः
    समुच्छ्रितपताकास्तु रथ्याः पुरवरोत्तमे ||
    ततो हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास्ते गृहे गृहे
    ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम् आससाद् पितुर्गृहम् ||
 
हे वाल्मिकी रामायणातील श्लोक आहेत. ह्यांत गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे
गुढी शब्दाची उकल
 
तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. दाते, कर्वे लिखित ‘महाराष्ट्र शब्दकोशा’चा आधार घेतला तर.
 
महाराष्ट्रीय गुढीचे लिखित साहित्यिक संदर्भ
 
संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये
 
अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥
ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥
 
संत नामदेव, संत जनाबाई आणि संत चोखामेळा यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात
 
टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
 
१६ व्या शतकातील संत एकनाथांच्या धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात; पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.
 
संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन असावे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात
 
“पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥”
 
१६ व्या शतकातील विष्णुदास नामा यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख ‘गुढीयेसी’ असा होताना रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावली गेल्याचे दिसते, तो अभंग असा”
 
आनंदु वो माये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ।।
मोतिया तांदुळ कांडिती बाळा । गाती वेळोवेळा रामचंद्र ।।
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ।।
कनक दंड चवऱ्या ढळताती रामा । विष्णुदास नामा गुढीयेसी ||
अर्वाचीन साहित्यात
 
अर्वाचीन साहित्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी त्यांच्या ‘गुढी उभारनी’ या कवितेतून गुढीपाडव्याचे खालील प्रकारे वर्णन करतात. अहिराणी बोलीचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे यांच्या मतानुसार बहिणाबाई चौधरी यांची ही काव्यरचना खानदेशातील लेवा पाटीदार गणबोलीत आहे.
 
आरंभ होई चैत्रमासीचा गुढ्या-तोरणे सण उत्साहाचा
गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी
गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा
 
स्त्री लोकगीतांत गुढीपाडव्याचे वर्णन पुढीलप्रमाणे येताना दिसते.
 
गुढी पाडव्याला उंचे गुढी उभवावी
कुळाची कीर्ती जावी दाही दिशा ॥२४॥
 
गुढी पाडव्याला गुढी उंच उभी करी
खण घाली जरतारी गोपूबाळ ॥२५॥
 
गुढी पाडव्याला कडुलिंब खाती
आधी कडू मग प्राप्ती अमृताची ॥२६॥
 
गुढी पाडव्याला घरोघरी गुढी
पडू दे माझी कुडी देवासाठी ॥२७॥
 
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
चांदीची वर लोटी गोपूबाळाची ॥२८॥
 
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
कुळाची कीर्ती मोठी बाप्पाजींच्या ॥२९॥
 
पाडव्याची गुढी उंच कळकीची काठी
वर खण जरीकाठी उषाताईचा ॥३०॥
 
Edited By- Ratnadeep Ranshoor