गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव
गुरुपौर्णिमेचा पावन दिवस हा सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो. श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या भक्तांसाठी श्री गजानन विजय या ग्रंथाचे वाचन आणि पारायण करणे अत्यंत फलदायी आणि फलश्रुती देणारे मानले गेले आहे. या गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव जाणून घ्या..
ग्रंथाचे अनन्यसाधारण महत्त्व (अध्यात्माचा पाया)
संत श्री दासगणू महाराज यांनी रचलेला 'श्री गजानन विजय' हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून गजानन महाराजांच्या साक्षात् लीलांचा आणि अध्यात्मिक शिकवणीचा साठा आहे. यामध्ये २१ अध्याय आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ग्रंथाचे वाचन केल्याने थेट महाराजांच्या सानिध्यात असल्याचा भास होतो.
गुरुपौर्णिमेला पारायण का करावे?
सद्गुरू तत्त्वाची प्राप्ती: गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मांडातील गुरुतत्त्व अत्यंत कार्यरत असते. या दिवशी केलेल्या ग्रंथाच्या वाचनामुळे महाराजांचे आशीर्वाद आणि कृपाशीर्वाद मिळणे सोपे होते.
संकल्पपूर्ती आणि मानसिक शांती: अनेक भक्त गुरुपौर्णिमेला विशेष संकल्प सोडून एकाहिक (एका दिवसात) किंवा त्रिदिन (तीन दिवसांचे) पारायण करतात. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन मन शांत व सकारात्मक बनते.
गुरुऋणातून मुक्तीचा भाव: सद्गुरूंनी आपल्याला दिलेल्या सन्मार्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या लीलांचे स्मरण करणे. हे स्मरण या ग्रंथाच्या पारायणाने घडते.
पारायणाची पद्धत (घरी पारायण कसे करावे?)
पूर्वसिद्धता: गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकून देवघरासमोर किंवा स्वच्छ पाटावर पिवळे वस्त्र अंथरावे.
स्थापना: पाटावर श्री गजानन महाराजांची प्रतिमा/फोटो आणि 'श्री गजानन विजय' ग्रंथाची स्थापना करावी. प्रतिमेला व ग्रंथाला हळद-कुंकू, अक्षता आणि ताजी पिवळी फुले वाहावीत.
संकल्प: हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन "मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री महाराजांच्या कृपाशीर्वादासाठी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहे" असा संकल्प सोडून ते पाणी ताम्हणात पाटासमोर सोडावे.
अखंड नामस्मरण: अध्यायांच्या सुरुवातीला आणि शेवटी "श्री गजानन जय गजानन" किंवा "गण गण गणात बोते" या मंत्राचा जप करावा.
नैवेद्य व आरती: पारायण पूर्ण झाल्यावर महाराजांना पिठले-भाकरी किंवा शिऱ्याचा (प्रसादाचा) नैवेद्य दाखवून भावपूर्ण आरती करावी.
पारायणाचे फलित (फलश्रुती)
गजानन विजय ग्रंथाच्या २१ व्या अध्यायात दासगणू महाराजांनी नमूद केल्याप्रमाणे, जो भक्त श्रद्धेने आणि भक्तीभावाने या ग्रंथाचे पारायण करतो त्याच्या आयुष्यातील संकटे आणि विघ्ने दूर होतात. घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. साधकाला अध्यात्मिक प्रगतीचा मार्ग सापडतो आणि महाराजांचे 'अदृश्य' संरक्षण कवच पाठीशी राहते.
"गण गण गणात बोते!"
अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री गजानन महाराज की जय!
Edited By- Dhanashri Naik
