गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुरूपौर्णिमा
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 जुलै 2018 (12:49 IST)

ऐसी सद्‌गुरु माउली

लागली बत्ती।
ती कशी रें विझवूं पाहाती ॥ ध्रु ॥
बत्ती लागली दारूला।
दारूसगट बुधला गेला।
धुर अस्मानी दाटला।
नये तो पुढती ॥1॥
बत्ती लागली तोफेला।
पुढे धणीच उभा केला।
काय भीड त्या तोफेला।
उडऊनि देती ॥2॥
बत्ती लाविली कर्पुरा।
ज्योतिस्वरूप भरला सारा।
आला मुळिंचीया घरा।
न राहे रती ॥4॥
ऐसी सद्‌गुरू माउली।
दासा बत्ती लाऊन दिधली।
निज वस्तू ते दाविली।
स्वयंभ ज्योती ॥5॥
- समर्थ रामदास स्वामी
 
गुरूशिष्य परंपरा ही आपल्या भारतीय संस्कृतीचे एक मोठेच वैशिष्ट्य आहे. आज जे कोणी अध्या‍त्मविद्या जाणणारे संत सत्पुरुष आपल्याला दिसतात ते सर्व सद्‌गुरूशरण आहेत. प्रभू श्री रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण हे दैवी अवतारदेखील त्यांच्या मानवी लीलेमध्ये वसिष्ठ, सांदीपनी या गुरूंपुढे नतमस्तक झाले. श्रीमत्स्येन्द्रनाथ आणि श्रीगोरक्षनाथ, संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी आणि योगिराज श्रीकल्याणस्वामी, राकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही या गुरुशिष्य परंपरेची काही विलक्षण उदाहरणे. सर्वच पंथ संप्रदायांमध्ये सद्‌गुरूंचे महिमान वर्णिलेले आहे. सद्‌गुरु कृपेशिवाय अध्यात्मविद्येचा प्रारंभच होत नाही. सद्‌गुरू म्हणजे परमब्रह्म. सद्‌गुरू काय करतात? ते आपल्या शरणागत सत्शिष्याला आपल्यासारखेच करतात.
 
सद्‌गुरूंचा केवळ देह म्हणजे सद्‌गुरू नव्हेत. सच्चिदानंद हे सद्‌गुरूंचे स्वरूप आहे. सत्शिष्यदेखील सद्‌गुरुकृपेने हा आनंद अनुभवतो. जो स्वतःला देह मानतो, तो या आनंदाला पारखा होतो. स्वतःला देह मानणे हे अज्ञान आहे. स्वतःला या देहापुरते सीमित केल्यामुळे तो असीम आनंद अनुभवण्याची क्षमता गमावून बसतो. खरोखर ही देहबुद्धीच सर्व दुःखांचे कारण आहे. देहबुद्धीलाच बोलीभाषेमध्ये 'मी' पणा अथवा अहंकार असे म्हणतात. जसे एखाद्या आईला आपल्या मुलाचे रडणे पाहावत नाही, लगेच ती त्याचे रडणे थांबवते. तसेच सद्‌गुरू मातृवत्सल असल्यामुळे त्यांना आपला शरणागत शिष्य दुःखी असल्याचे पाहावत नाही. ते आपल्या कृपाशक्तीने शिष्याच्या दुःखांचे कारण असलेली देहबुद्धी नष्ट करतात. त्याचा अहंकार नष्ट करतात. 'मी'पणाच्या कोषामध्ये अडकलेले त्याचे अस्तित्व स्वतःमध्ये विलीन करतात. याच विषयाचे वर्णन करणारा वरील अभंग आहे. समर्थ रामदास स्वामींनी सर्वसामान्य साधकांना विषय समजावा म्हणून फटाक्यांची दारू, तोफगोळा, कापूर इत्यादी दृष्टांत देऊन ही रचना केली आहे. अतिशय मार्मिक दृष्टांत असलेली ही रचना समर्थांच्या काव्य सामर्थ्याचीदेखील ओळख करून देते.
 
समर्थ म्हणतात, ठिणगी पडताक्षणी पेट घेणार्‍या फटाक्यांची दारू, तोफगोळा, कापूर इत्यादी वस्तूंना दिव्याची बत्ती लागली आहे. आता तुम्ही ती कशी विझवणार? अर्थात आता गुरुकृपा झाली आहे मग देहबुद्धी कशी राहील? स्वतःचे भिन्न अस्तित्व तरी कसे राहील? याचे पहिले उदाहरण एका शोभेच्या फटाक्याचे आहे. त्या फटाक्याला बत्ती लागली.
 
त्यावेळी केवळ शोभेची दारूच नव्हेच तर त्यासोबत ती ज्यामध्ये भरून ठेवली होती तो बुधलादेखील उडून गेला. त्याचा धूर सर्व आसंतामध्ये पसरला. आता तो बुधला पुन्हा मिळणार नाही. तो अग्निसोबतच संपला. तसेच ज्याच्यावर गुरुकृपा झाली तोदेखील वेगळेपणाने शिल्लक राहत नाही. तो सच्चिदानंदस्वरूप होतो.
 
दुसरे उदाहरणदेखील समर्थांच्या रोखठोक शैलीला साजेसेच आहे. तोफेला बत्ती लावली आणि तिच्या मालकालाच त्या तोफेपुढे उभे केले. तोफेच्या तोंडी दिले. तर ती तोफ काय भीड बाळगेल? नाही. ती तिचे काम चोख बजावेल. त्या मालकालादेखील उडवूनच देईल. अर्थात जो कोणी सद्‌गुरूंना शरण जाईल, त्यांचा अहंकार सद्‌गुरू शिल्लक ठेवणार नाहीत. त्यानंतर समर्थ कापराचा दृष्टांत आपल्यासोर ठेवतात. कापूर पेटवला तर एक सुंदर ज्योत प्रकाशित होते. परंतु कापराचे अस्तित्व मात्र संपून जाते. तसेच गुरुकृपेने स्वतःचे मूळस्वरूप जाणल्यावर साधकाला अन्य गोष्टींमध्ये रस राहत नाही. कापराची जशी ज्योत होते, तसाच शिष्यदेखील आत्मस्वरूप होतो.
 
सद्‌गुरू दयाळू असतात. ते मातृहृदयी असतात. समर्थ म्हणतात, सद्‌गुरू माउलीने कृपारूपी बत्ती लावली आहे. त्याने जन्मजन्मांतरीचा अहंकार नष्ट झाला. 'मी'पणा नष्ट झाला. सद्‌गुरुकृपेने स्वयंभू ज्योतिर्मयस्वरूप अनुभवास आले. सद्‌गुरुंनी स्वरूपाचे दर्शन घडवले. गुरुपौर्णिमेला आपण सद्‌गुरूंचे पूजन करतो. गुरु म्हणजे 'मोठा' जे आपल्याहून मोठे त्यांच्यापुढे नतस्तक व्हावे. त्यांचे पूजन करावे. सद्‌गुरूंच्या चरणी आपला 'मी'पणा अर्पण करावा. तेव्हाच या पौर्णिमेच्या पूर्णचन्द्राचे चांदणे आपल्या जीवनामध्ये पडेल असे सांगणारी ही गुरुपौर्णिमा आहे.
 
सचिन जहागीदार