धनुर्मासाची सुरुवात सूर्य जेव्हा धनू राशीत प्रवेश करतो, तेव्हा होते. यंदा १६ डिसेंबर रोजी धनुर्मासारंभ होत आहे. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो.
धनुर्मास हा सौर मास आहे, जो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत होणाऱ्या संक्रमणावर आधारित असतो. धनुर्मास म्हणजे सूर्याने धनू राशीत एक महिनाभर केलेला वास. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्य गुरु ग्रहाच्या मालकीच्या (धनू रास) घरात असतो, तेव्हा तो महिना शुभकार्यांसाठी तेजहीन मानला जातो. याला खरमास देखील म्हणतात. याला चापा मास, कोदंडा मास किंवा कर्मुका मास असेही म्हणतात, कारण संस्कृतमध्ये धनुष्याला हे समानार्थी शब्द आहेत.
धनुर्मासात काय करतात?
हा काळ देव-पूजा, भक्ती आणि तपश्चर्येसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या काळात खालील गोष्टींवर विशेष भर दिला जातो-
विष्णू आणि कृष्णाची उपासना- हा महिना भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार (विशेषतः श्रीकृष्ण) यांना समर्पित असतो. दक्षिण भारतात हा महिना गोदादेवी (आंडाळ) आणि रंगनाथ स्वामी (विष्णू) यांच्या विवाहाच्या तयारीसाठी साजरा केला जातो.
या काळात सूर्योदयापूर्वी स्नान करून सूर्यनमस्कार आणि अर्घ्य देणे अत्यंत फलदायी मानले जाते.
पहाटे लवकर उठून विष्णू मंदिरांमध्ये (किंवा घरी) विशेष पूजा आणि भजन केले जातात.
तुळशीजवळ किंवा मंदिरात दीप (दिवा) लावणे शुभ मानले जाते.
दान-धर्म- या महिन्यात गरिबांना आणि गरजूंना वस्त्र, धान्य किंवा पैसे दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते. पवित्र नद्यांमध्ये स्नान (उदा. गंगा, गोदावरी) करणे किंवा तीर्थस्थळांना भेट देणे श्रेयस्कर असते.
धनुर्मासात काय करु नये?
धनुर्मास हा शुभ कार्यांसाठी योग्य मानला जात नाही, त्यामुळे खालील गोष्टी टाळल्या जातात-
विवाह कार्य : या काळात लग्न करणे टाळले जाते, कारण याचा थेट परिणाम वैवाहिक जीवनातील सुख-समृद्धीवर होतो असे मानले जाते.
गृहारंभ/ गृहप्रवेश : नवीन घर बांधायला सुरुवात करणे किंवा नवीन घरात प्रवेश करणे टाळले जाते.
नवीन व्यवसाय/उद्योगाचा आरंभ : महत्त्वाचे मोठे व्यावसायिक व्यवहार किंवा नवीन उद्योगाची सुरुवात करणे टाळले जाते.
नवीन मोठी खरेदी : मोठी मालमत्ता किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे टाळले जाते.
वैयक्तिक लहान धार्मिक विधी आणि रोजची नित्य पूजा या काळात चालू ठेवता येतात.
आख्यायिका
सूर्यदेव सात घोड्यांच्या रथात बसून ब्रह्मांडाची परिक्रमा करतात. त्यांना मध्येच थांबण्याची परवानगी नाही. परंतु असे करताना घोड्यांना विश्रांती न मिळाल्याने ते थकतात व त्यांना तहानभूक लागते. त्यांची ही दशा पाहून एकदा सूर्यदेवांनाही वाईट वाटले. त्यामुळे पाणी पिण्यासाठी सूर्यदेवांनी रथ एका तलावाच्या कडेला नेला. पण जर रथ थांबला तर तर अनर्थ होईल हे जाणून सूर्यदेवांनी तलावाकाठी बसलेल्या दोन गाढवांना रथाला जोडून आपला रथ दौडतच ठेवला. महिन्यानंतर त्याच तलावाजवळ आल्यावर परत रथाला घोडे जुंपले आणि पुढची कालक्रमणा चालूच ठेवली. हे त्यानंतर दरवर्षी घडू लागले आणि वर्षातून एका महिन्याला खरमास म्हणू लागले.