मंगळवार, 11 मार्च 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 10 मार्च 2025 (21:34 IST)

कन्यादान विधी

Kanyadan Vidhi
कन्यादान म्हणजे लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या हातात आपल्या कन्येचा हात देणे किंवा तिला सोपवण्याची विधी म्हणजे कन्यादान.हा विधी लग्न आणि मंगलाष्टक झाल्यावर केला जातो. 
या विधी शिवाय लग्न पूर्ण होत नाही. या विधी मध्ये वधूचे आई-वडील पूजेला बसतात. वर आणि वधू एकमेकांसमोर बसतात.  
या तांब्याच्या कलशात पाच रत्ने व सुवर्ण घालून पाणी भरतात.वधूचे आई वडील तांब्यांच्या कलशातील मंत्रित केलेल्या पाण्याने कन्यादान करतात. या विधी मध्ये  सर्वप्रथम वराची पूजा केली जाते नंतर वर सोवळे नेसून विधीसाठी बसतो. 

काशाचे भांडे जमिनीवर ठेऊन त्यावर वधू आणि वधूचे आई-वडील आपापली ओंजळ करतात आणि वधूची आई कलशातील पाण्याची धार सतत वधूच्या पित्याच्या ओंजळीत धरते. तेथून ते पाणी वधू वरच्या ओंजळीतून काशाच्या भांड्यात पडते. कन्यादान करताना वधूचे वडील 
पुढील मंत्र म्हणतात.
धर्मप्रजा सिध्यर्थं कन्यां तुभ्यं संप्रददे |
त्यानंतर वधूचे वडील खालील मंत्र उच्चारतात. ‘अत्यंत श्रेष्ठ अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती मला व माझ्या सर्व पितरांस होण्याकरता व त्यांची पितृलोकातून मुक्ती होण्यासाठी ही माझी अमुक नावाची कन्या अमुक गोत्रोत्पन्न, सौभाग्यकांक्षिणी, लक्ष्मीरूपी कन्या मी ह्या विष्णुरूपी वराला ब्राह्यविवाहविधीने अर्पण करतो हिचा वराने स्वीकार करावा असे वधूचे वडील म्हणतात. असे म्हणून वरच्या हातावर अक्षदा व पाणी सोडतात.
 
असे म्हणून उजव्या हाताने दर्भ, अक्षत व पाणी वराच्या हातावर सोडायचे. त्यावर वराने ‘ओम् स्वस्ति’ म्हणजे ‘मान्य आहे’ असे म्हणायचे. त्यानंतर दानावर दक्षिणा देतातच, त्या नाण्याने कन्यादानावर वरदक्षिणा म्हणून ज्या वस्तू किंवा धन देण्यात येणार असेल त्यांचा मंत्रपूर्वक उच्चार वधूपित्याने करावयाचा. ‘धर्म, अर्थ व काम या तिन्ही बाबतीत मी पत्नीच्या परवानगीशिवाय कोणतेही अतिक्रमण करणार नाही’ असे वचन वराने वधूपित्याला द्यावयाचे व ‘धर्म, अर्थ व काम या तिन्ही बाबतीत मी पतीच्या परवानगीशिवाय कोणतेही अतिक्रमण करणार नाही’ असे वचन वधूनेही आपल्या पित्याला द्यावयाचे असते.
त्यानंतर वधू-वरांनी दूध व तुपात भिजवलेली अक्षत परस्परांच्या मस्तकावर टाकून ‘आमचा संसार सुखाचा होवो, आम्हांला उत्तम संतती प्राप्त होवो, उत्तम यश मिळो व हातून सतत धर्माचरण होवो’ असे म्हणायचे अश्याप्रकारे कन्यादान विधी पार पडतो. एकदा कन्यादानाची विधी झाल्यावर त्यापुढील सर्व विधी सप्तपदी, मंगळसूत्राची विधी वराकडील असते. हा विधी खूप भावनिक असतो 
Edited By - Priya Dixit