बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 19 जून 2024 (11:36 IST)

श्री कोकिळा माहात्म्य अध्याय चोविसावा

॥ श्रीगणेशाय नम: ॥
धर्म म्हणे श्रीकृष्णासी ॥ पुढें कथेची रचना कैसी ॥ ते सांगावी मजसी ॥ कृपा करोनी देवराया ॥१॥
मागील अध्यायीं कथा निश्चित ॥ गौतम बोले राजयाप्रती ॥ जामात कन्या निगुती ॥ पाहून मान कांपविली ॥२॥
पुढें ऐके कथेची रचना ॥ पुढें कलावती द्विज कन्या ॥ भर्तु आज्ञा पाळी जाणा ॥ गृहकर्मी सादर असे ॥३॥
इचा पती निश्चित ॥ कृषि कर्म करी निश्चित ॥ दैवयोगें करुन सत्य ॥ जाती झाली क्षेत्र पहावया ॥४॥
कृर्षि मध्यें फिरत फिरत ॥ गेली एक्या जाळींत ॥ त्या जाळींत अकस्मात ॥ महाभुजंग देखिला ॥५॥
नागनागिणी सहित ॥ वेढा घालोनी बैसत ॥ ते पाहून भयाभित ॥ झाली तेव्हां द्विज कन्या ॥६॥
त्या मस्तकावरी ॥ नांगर फिरविला निर्धारी ॥ मग तो सर्प अवधारी ॥ मृत्यु पावला त्या समयासी ॥७॥
सर्प मनीं विचारीत ॥ इच्या पतीचा करीन घात ॥ तेह्वां रात्रंदिवस जपत ॥ तुझ्या जामात कारणें ॥८॥
गौतमाचे वचन ऐकोन ॥ राजा करी रुदन ॥ राजपत्नी लागी गैवर पूर्ण ॥ मनीं दाटला दोघांच्या ॥९॥
चंद्रलेखा ऋषीप्रती ॥ प्रश्न करिती झाली निश्चिती ॥ मज एक कन्या निगुती ॥ पुत्र नसे मजलागीं ॥१०॥
कृपा करुनी ऋषीवर्या ॥ इचें वैधव्य दु:ख निवडुनियां ॥ ईस सौभाग्य प्राप्त व्हावया ॥ कांही उपाय सांगावा ॥११॥
माझी कन्यां अनाथ दिन ॥ इचें करावें दु:खहरण ॥ वारंवार ऋषीचरण ॥ राजपत्नी धरितसे ॥१२॥
राजस्त्रिचें वचन ॥ गौरमें यथार्थ करुन श्रवण ॥ मुतमात्र करुनी ध्यान ॥ बोलता झाला राणी प्रती ॥१३॥
गौतम म्हणे चंद्रलेखें प्रती ॥ तृतीय वर्षे येईल कोकिला निश्चिती ॥ तें व्रत करवी कन्ये प्रती ॥ तेणें वैधव्य दूर होईल ॥१४॥
तें व्रत बहुत उत्तम ॥ कोकिळेची पूजा करुन ॥ भूमीवरी करावें शयन ॥ इंद्रियाचें दमन असावें ॥१५॥
एकमास व्रत करावें ॥ आनंदयुक्त असावें ॥ तेणें कोकिळास्वभावें ॥ कृपा करील निश्चयेसीं ॥१६॥
आणीक ऐक माझें वचन ॥ चंद्रलेखे करी श्रवण ॥ श्रावणशुध्द तृतीया जाण ॥ प्राप्त दिवस तेधवां ॥१७॥
ते दिवशीं इच्या पतीसी ॥ सर्प डंकील अर्धनिशीं ॥ व्रतें करुनी तयासी ॥ सजिवत्व होईल हा ॥१८॥
ऐसें भविष्य सांगोन ॥ ऋषी पावला अंतरध्यान ॥ मग कांहीएक दिवस लोट्तां जाण ॥ कोकिळाव्रत प्राप्त झालें ॥१८॥
मग कलावतीने तत्वतां ॥ व्रत आरंभिलें येतां ॥ यथाशास्त्र पूजन करितां ॥ व्रत समाप्ती अवग्र ॥२०॥
ऐसें हे कोकिळाव्रत ॥ कलावती करी निश्चित ॥ त्यास श्रावणमास त्वरित ॥ प्राप्त झाला ते समयीं ॥२१॥
श्रावणशुध्द तृतीयेसी ॥ काळ दिवस पातला निश्चयेसीं ॥ तेव्हां कलावतीच्या मानसीं ॥ भय अपास संचलें ॥२२॥
कलावती मनीं विचारीत ॥ हें संकट मोठें झाले प्राप्त ॥ सुवासिनीलागीं वाण देत ॥ सौभाग्यदायक जे असती ॥२३॥
मग आपुल्या स्वामीन स्नान घालुन ॥ षड्‍स पक्वान्नें भोजन ॥ पतीलागीं उत्तम शयन ॥ करवी परम प्रीतीनें ॥२४॥
चंद्रकेतू आणि राणी ॥ दोघांसी स्मरण आले ते दिनी ॥ आज कलावती लागोनी ॥ वज्रप्रहार होईल ॥२५॥
तंव तो सर्प येऊन ॥ कलावतीच्या पतीस डंकोन ॥ पळूं लागला भयेंकरुन ॥ भवानीमनी विचारीत ॥२६॥
पार्वती म्हणे सदाशिवा ॥ कृपा करुनी महादेवा ॥ कलावतीच्या धवा ॥ जिवदान पैं द्यावें ॥२७॥
यासी न देतां जीवदान ॥ तरी जाईल तुमचें ब्रिद पूर्ण ॥ पार्वतीचें वचन एकोन ॥ सदाशिव प्रसन्न जाहले ॥२८॥
पार्वतीसहित शिवजाण ॥ येते झाले तया स्थाना ॥ तयाचें प्रेत पाहुनियां ॥ कृपादृष्टी अवलोकिती ॥२९॥
शिवाच्या अवलोकनेंकरुन ॥ तो झाला सजीव पूर्ण ॥ ऐसा कोकिळाव्रताचा महिमा ॥ धर्मा तुज कथियेला ॥३०॥
ऐसा कलावतीचा पती ॥ जीवदान पावला निश्चितीं ॥ तेणें सक्ळ जनाप्रती ॥ सौख्य अपार झालें ॥३१॥
कोकिळ व्रताचा महिमा ॥ तुज सांगितला धर्मा ॥ आतां करी या नेमा ॥ तेणें राज्य पावसी ॥३२॥
 इतिश्रीभविष्योत्तर पुराणें ॥ ब्रह्मोत्तरखंडे ॥ कोकिळामहात्म्य ॥ चतुर्विशतिंतमोऽध्याय: अध्याय ॥२४॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ राधाकृष्णार्पणमस्तु ॥
॥ अध्याय २४ वा समाप्त: ॥