Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लघुभागवत - अध्याय २ रा

Updated: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (11:52 IST)
परी मनीं उपजली कृपा । शापोक्ति कळविली नृपा । रायें नेमिला मार्ग सोपा । सात दिवसपर्यंत ॥१४॥
येऊं न शके सर्प जवळी । ऐशा प्रासादीं उंच स्थळीं । बैसे नृप घेऊनि मंडळी । भागवत शुक्र सांगे ॥१५॥
ऐका दैवाचा चमत्कार । तेथ येऊनि एक विप्र । बोरें देऊनि प्रचुर । आशिर्वाद अनुवादे ॥१६॥
त्या फळाआंत होता कीटक । तोचि झाला दंदशूक । तेणें दंशूनि नृपनायक । यमसदनीं धाडिला ॥१७॥
हा थट्टेचा केवळ । परिणाम आहे सकळ । परीक्षितीचा देह अमोल । बळी घेतला थट्टेनें ॥१८॥
ह्मणूनि तुह्मी निरंतर । थट्टेपासूनि रहा दूर । आरंभी वाटे थट्टा मधुर । भयंकर परिणामीं ॥१९॥
जैसी थट्टा नाशासि कारण । तैसेंचि घातक उन्मत्तपण । येविषयीं एक उदाहरण । करा श्रवण सांगतों ॥२०॥
एकदां सनत्कुमार ऋषी । वैकुंठी विष्णुदर्शनासी । गेले तेथें प्रतिबंध त्यांसी । द्वारावरी जाहला ॥२१॥
जय विजय द्वारपाळ । वदले त्यांचा करुनि छळ । वेष तुमचा अमंगळ । जाऊं न देऊं ह्मणूनी ॥२२॥
तेव्हां बोलले सनत्कुमार । सुवेषधारी मानिजे थोर । हा मृत्यूलोकींचा आचार । अनुचित साचार वैकुंठीं ॥२३॥
देवलोकी ऐसा भेद । असे जाणा अत्यंत निषिद्ध । ऋषिविप्रांसी प्रतिबंध । नाही कोठें ऐकिला ॥२४॥
थोरांच्या आश्रयें धुंद । होऊनि तुझी मतिमंद । सज्जनांचा उपमर्द । अनिवार करीतसां ॥२५॥
या उन्मादाचा परिणाम । दैत्यकुळी घ्याल जन्म । हांसत केलें पापकर्म । फळ भोगाल भूतळीं ॥२६॥
जैसा आमुचा केला छळ । तैसेंचि तुह्मां भूवरी सकळ । दुष्कर्म घडेल सर्वकाळ । नाश पावाल त्या योगें ॥२७॥
शाप ऐकतां जय विजय । दोघेही पावले भय । ह्मणती विष्णुचे पाय । दूर आह्मां नसावे ॥२८॥
तेव्हां उ:शाप वदले ऋषी । दैत्यकुळीं जन्म तुम्हांसी । तथापि व्हाल वैकुंठवासी । विष्णुहस्तें मरोनी ॥२९॥
तेचि हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू । दोघेही देवांचे रिपू । उ:शापें त्यांच्या वपू । विष्णुहस्तें निमाल्या ॥३०॥
उभयांमाजी हिरण्यांक्ष । बलिष्ट युद्धकलादक्ष । देवांसंगे विरुद्धपक्ष । स्वीकारुनी राहिला ॥३१॥
एकदां वरूणासीं युद्ध करावया झाला सिद्ध । येरु ह्नणे मी अशक्त वृद्ध । त्वां विष्णुसी झुंजावें ॥३२॥
मग विष्णुपाशी येउनी । हेतु धरिला जो मनीं । तो जाणवूनी ह्मणे येचि क्षणीं । उत्तर कांही पाहिजे ॥३३॥
विष्णु म्हणे अहंकार । सांडूनि येईं तदनंतर । करूं आपण परस्पर । जाण समर बलिष्टा ॥३४॥
तरी तो नुमजे कांही । ह्मणूनी देवें त्याचि समयीं । आवेशें ताडूनि हृदयीं । यमसदनी धाडिला ॥३५॥
विष्णुहस्तें मृत्यू आला । तेणें वैकुंठी पावला । जयांसी अभिमान झाला । ऐसेचि मरती ते मूढ ॥३६॥
हिरण्याक्षाचा वध । ऐकूनि, जैसा जातवेद । भडके, तैसा पावे क्रोध । तेव्हां हिरण्याकशिपू ॥३७॥
वैर्‍याचे घेऊनि प्राण । त्या रक्तें भातृतर्पण । करीन ऐसी दारुण । केली तेणें प्रतिज्ञा ॥३८॥
सकल सुरांसी आधार । विष्णुपासूनि असे थोर । करितां तयाचा संहार । पाड काय इतरांचा ॥३९॥
मजसारिखा समर्थ बळी । कोण दुजा भूमंडळीं । करीन सर्वांची होळी । उगवीन वैर बंधूचें ॥४०॥
मग निजकार्य यशस्कर । व्हावया तपश्चर्या थोर । आरंभिली तेणें सत्वर । गिरिकंदरीं बैसूनी ॥४१॥
कांही काळें ब्रम्हदेव । प्रसन्न होऊनि ह्मणे सर्व । मागशील तें वैभव । देईन तूतें तत्काळ ॥४२॥
तेव्हां दैत्य विनयें ह्मणे । नाही बहुत मागणें । परी माझें मरणें । कोणा हातीं नसावें ॥४३॥
दिवसा किंवा रात्रीं । आकाशी किंवा धरित्रीं । आंत अथवा बाहेरी । मरण माझें नसावें ॥४४॥
यावरी ह्मणे चतुर्मुख । सर्व दिधलें भोगी सुख । तेव्हां दैत्य हास्यमुख । वसतिस्थानीं परतला ॥४५॥
आधींच दीप्त वैश्वानर । वरी सोडिली घृताची धार । मग जैसा भयंकर । ज्वाळा निघती तेथुनी ॥४६॥
तैसा दैत्य स्वभावें क्रूर । वरी लाधे विधीचा वर । मग काय उरे तेथ विचार । इच्छी संहार सकळांचा ॥४७॥
सकळ निर्जर केले जर्जर । पदच्युत केला पुरंदर । छ्ळ मांडिला अनिवार । त्राहि भगवन्‍ जन वदती ॥४८॥
या हिरण्यकशिपूचा सुत । प्रल्हाद नामें ईश्वरभक्त । त्याचें चरित्र परम अद्भुत । ऐकुनि विस्मय वाटतो ॥४९॥
खाण तैसी माती । ऐसें जन बोलती । परी ईश्वराची कृती । अतर्क्य असे ॥५०॥
कोळशांमाजी सुंदर हिरा । हा प्रकार विचित्र खरा । परी एका परमेश्वरा । विदित कारण तयाचें ॥५१॥
हिरण्यकशिपू पिता दुष्ट । प्रल्हाद पुत्र जन्मला श्रेष्ठ । ईश्वरी योजना अचाट । नकळे आह्मां मानवां ॥५२॥
असो प्रल्हाद भगवद्भक्त । करी नामस्मरण सतत । पूजावे अनाथ साधु संत । नित्यक्रम हा त्याचा ॥५३॥
दैत्याचे वैरी देव । घेऊं नये त्यांचे नांव । ऐसें शिकविती आप्त सर्व । परी छंद सुटेना ॥५४॥
शिकविलें करुनि लालन । करुनी पाहिलें शासन । परी प्रल्हादाचें दृढ मन । कांही केल्या वळेना ॥५५॥
ऐसा बहुत केला छळ । उपाय हरले सकळ । तरी मुखीं सर्वकाळ । नारायण तयाच्या ॥५६॥
तेव्हां करावया त्याचा वध । हिरण्यकशिपु झाला सिद्ध । दैत्यांसी ह्मणे अपराध किती याचे सोसावे ॥५७॥
गजचरणीं तुडविला । पर्वततळीं वरुनि लोटिला । सर्पदंश करविला । तरी उरला जिवंत ॥५८॥
ज्यावरी देवाची दया । मारुं शके कोण तया । श्रीमंताची जाया । काय भिक्षा मागेल ॥५९॥
तैसा श्रीहरीचा ज्यासि आधार । तो सुखरुपचि निरंतर । सूर्यापासूनि दूर अंधार । तैसें भय दूर भक्तांसी ॥६०॥
ऐसा निर्भय प्रल्हाद । बहुत केला प्रतिबंध । तरी भजनाचा त्याचा छंद । लेशमात्र सुटेना ॥६१॥
त्याचें भजन सर्वकाळ । देखूनि, इतर सकळ । विद्यार्थी तोचि खेळ । शाळेमाजी खेळती ॥६२॥
मग तेथील मुख्य शिक्षक । ही प्रल्हादाची वर्तणूक । जाणवी संतापपूर्वक । तत्काळ पित्यासी ॥६३॥
तेव्हां हिरण्यकशिपू सक्रोध भूमीसी आपटी हस्तपाद । ह्मणे कुलांगार प्रल्हाद । कोठें आहे दाखवा ॥६४॥
मग सेवकें आणूनि सत्वर । उभा केला समोर । त्यासी पुसे हा तुज दुराचार कोण्या अधर्मे शिकविला ॥६५॥
मी येथील मुख्य राजा । स्वेच्छेनुरुप सारी प्रजा । वागवावी हा अधिकार माझा । पाड तुझा मग किती ॥६६॥
कोणी माझा आज्ञाभंग करील त्यासी सवेग । दाखवीन मृत्यूयोग । नक्षत्रवार नसतांही ॥६७॥
तेव्हां येरु वदे प्रत्युत्तर । पृथ्वीचा राजा एक ईश्वर । त्यावीण सारे इतर । जीव दुर्बळ सर्वथा ॥६८॥
कीं जेवीं जगीं जीवां इतरां । तेवीं राजांसी व्याधी जरा । जन्म, मृत्यु, भय, भोग सारा । भोगावया लागतो ॥६९॥
पाहतां ईश्वराचे दृष्टीं । समान ही जीवसृष्टी । राजा चाले ज्या महीपुष्टीं । तेथेंचि मुंगी चालते ॥७०॥
भू जल तेज समीर । यांवरी ज्याचा अधिकार । तोच पृथ्वीचा भूप साचार । ऐसें आहे मत माझें ॥७१॥
जलप्रलय धरणीकंप । निवारील ऐसा प्रताप । ज्याचे अंगी तोचि भूप । सत्ताधीश पृथ्वीचा ॥७२॥
ऐसी शक्ती ईश्वराअंगी । ह्मणूनि तोचि या जगीं । सर्वांसी आधार, यालागीं । तोचि राजा पृथ्वीचा ॥७३॥
तैं हिरण्यकशिपू ह्मणे । सत्य नसे हें बोलणें । प्रत्यक्ष पाहिल्याविणें । मी न मानीं देवातें ॥७४॥
यास्तव तुझा पालनकर्ता । दावीं देव मज आतां । एर्‍हवीं तुझिया जिविता । घात करीन क्षणार्धे ॥७५॥
तेव्हां प्रल्हाद वदे सर्वत्र । भरुन आहे ईश्वर । काष्टीं पाषाणीं अणुमात्र । स्थळ न रिक्त त्याविणें ॥७६॥
ऐकूनि ऐसें पुत्रवचन । हिरण्यकशिपू सिंहासन । सोडूनि, तळीं आपण । उभा सक्रोध बोलला ॥७७॥
ह्मणसी ईश्वर जळीं स्थळीं । काष्ठीं पाषाणीं अंतराळीं । तरी सांग पाहूं ये वेळीं । येथें स्तंभीं दिसेल का ?॥७८॥
अवश्य ह्मणे तो बालभक्त । वस्तुमाजीं ईश्वर व्याप्त । तोंचि दैत्यें स्तंभीं लाथ । मारिता अद्भुत वर्तलें ॥७९॥
तेथूनि प्रचंड सिंहनाद । होतांचि घाबरूनि स्तब्ध । उभेचि राहिले सर्व सखेद । प्रल्हाद एक तोषला ॥८०॥
तैं भयचकित सर्व होती । नाद येई कोठूनि देखती । तंव नृसिंहरुपें विष्णुमूर्ती । स्तंभाआंतुनी अवतरली ॥८१॥
ती देखूनि दैत्य चढे मदा । हातीं घेऊनि सर्वेंची गदा । करावया शिरच्छेदा । विष्णूवरी धांवला ॥८२॥
विष्णुनें त्यासी मांडीवरी । घेऊनि चिरिला उदरीं । प्राण सोडी त्या अवसरीं । दैत्य हिरण्यकशिपू ॥८३॥
तेव्हां प्रल्हादें करुनि स्तुती । ह्मणे पिता पावो सद्गती । ते समयीं वैकुंठपती । तैसेंचि घडेल बोलिला ॥८४॥
सारांश जगदीश्वर । भक्तांसी रक्षी निरंतर । घेऊनि त्यांचा कैवार । करी संहार दुष्टांचा ॥८५॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील सार सुबोध । गातसे सानंद गोविंद । बालहिताकारणें ॥८६॥
याचें करितां श्रवण पठन । प्राप्त होईल विद्याधन । तैसेंचि दु:ख भय शमन । होईन, वचन व्यासाचें ॥८७॥
इति श्रीलघुभागवते द्वितीयोऽध्याय: ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments