1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (07:44 IST)

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

Margashirsha Month 2024 Marathi
Margashirsha Guruvar 2024 हिंदू धर्मात वर्षातील सर्व 12 महिने विशेष आहेत. वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबर पासून सुरू होत आहे. या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्तव असते. आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात. तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत असून याचे या व्रताचे नियम काय आहेत ते-
 
मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात. कुटुंबात सौख्य - समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते. तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं. यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरपासून सुरु होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा 5 डिसेंबरला आहे तर या दिवशी व्रत सुरु करावे.
 
मार्गशीर्ष गुरुवार 2024
पहिला मार्गशीर्ष गुरुवार 2024 : 5 डिसेंबर
दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 2024 : 12 डिसेंबर
तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 2024 : 19 डिसेंबर
चवथा मार्गशीर्ष गुरुवार 2022 : 26 डिसेंबर
 
मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी
मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा. त्यात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावावी, त्यावर नारळ ठेवावा.
त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे. दागिने, गजरा घालावा. देवीची पूजा करावी.
हल्ली देवीचे मुखवटे, पोशाख, दागिने, पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते.
पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे. 
देवीची आरती करावी.
गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.
शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. 
ब्राह्मणाला दान द्यावे. 
सुवासिनी बोलावून हळदी-कुंकू करावे.
मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी.