शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (10:33 IST)

संत बहिणाबाईचे अभंग

आदिनाथें उपदेश पार्वतीस केला । मत्स्येंद्रें ऐकिला मच्छगर्भी ॥ १ ॥
शिवह्रदयींचा मंत्र पैं अगाध । जालासे प्रसिद्ध भक्तियोगें ॥ २ ॥
तेणें त्या गोरक्षा केलें कृपादान । तेथोनी प्रकट जाण गहिनीप्रती ॥ ३ ॥
गहिनीनें दया केली निवृत्तिनाथा । बाळक असतां योगरूप ॥ ४ ॥
तेथोनि ज्ञानेश पावले प्रसाद । जाले ते प्रसिद्ध सिद्धासनीं ॥ ५ ॥
'सच्चिदानंद बाबा' भक्तीचा आगरू । त्यासी अभयवरू 'ज्ञाने' केला ॥ ६ ॥
पुढें विश्वंभर शिवरूप सुंदर । तेणें राघवीं विचार ठेविलासे ॥ ७ ॥
केशव चैतन्य बाबाजी चैतन्य । झालेसे प्रसन्न 'तुकोबासी' ॥ ८ ॥
एकनिष्ठ भाव तुकोबा-चरणीं । म्हणोनी 'बहिणी' लाधलीसे ॥ ९ ॥
 
उघडोनी नेत्र पाहे जंव पुढें । तंव दृष्टी पडे पांडुरंग ॥ १ ॥
देखिली पंढरी ध्याना तेची येत जयराम दिसत दृष्टीपुढें ॥ २ ॥
ब्राह्मण स्वप्नांत देखिला तो जाण । त्याची आठवण मनीं वाहे ॥ ३ ॥
न दिसे आणिक नेत्रांपुढें जाण । नामाचें स्मरण मनीं राहे ॥ ४ ॥
पूर्वील हरिकथा आयकिल्या होत्या । त्या मनीं मागुत्या आठवती ॥ ५ ॥
तुकोबाची पदें अद्वैत प्रसिद्ध । त्यांचा अनुवाद चित्त झुरवी ॥ ६ ॥
ऐसीं ज्याचीं पदें तो मज भेटतां । जीवास या होतां तोष बहु ॥ ७ ॥
तुकोबाचा छंद लागला मनासी । ऐकतां पदांसी कथेमाजीं ॥ ८ ॥
तुकोबाची भेटी होईल ते क्षण । वैकुंठासमान होये मज ॥ ९ ॥
तुकोबाची ऐकेन कानीं हरिकथा । होय तैसें चित्ता समाधान ॥ १० ॥
तुकोबाचें ध्यान करोनी अंतरीं । राहे त्याभीतरीं देहामाजीं ॥ ११ ॥
बहिणी म्हणे तुका सद्‌गुरु सहोदर । भेटतां अपार सुख होय ॥ १२ ॥
 
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी । तैसीच आवडी तुकोबाची ॥ १ ॥
अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी । अनुभवें मनीं जाणेल तो ॥ २ ॥
तृषितांसी जैसें आवडे जीवन । तैसा पिंड प्राणावीण तया ॥ ३ ॥
बहिणी म्हणे हेत तुकोबांचे पायीं । ऐकोनिया देहीं पदें त्यांचीं ॥ ४ ॥