शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय २५

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीराधाकृष्णाय नमः ॥    
ऐका श्रोते हो सावकाश ॥ परम वैष्णव रोहिदास ॥ हरिभजन रात्रंदिवस ॥ प्रेमभावें करीतसे ॥१॥
मनें दुराशा सांडोन ॥ भावें करीतसे हरिकीर्तन ॥ नित्यनेमें स्नान करून ॥ विष्णुपूजन करीतसे ॥२॥
संसारीं असोनि जाण ॥ परोपकार योजिला त्याण ॥ आल्या वैष्णवाकारण ॥ एक जोडा देतसे ॥३॥
चर्मकवृत्ति नीच दिस ॥ तेथें अणुमात्र न घडे दोष ॥ उपकार करितां जगन्निवास ॥ प्राप्त होईल निर्धारें ॥४॥
सुतार आणि कुंभारास ॥ कर्म करितां नाहीं दोष ॥ उपकार करितां जगन्निवास ॥ प्राप्त होईल तयांसी ॥५॥
गंवडी आणि पाथरवटांस ॥ कर्म करितां नाहीं दोष ॥ उपकार करितां जगन्निवास ॥ प्राप्त होईल तयांसी ॥६॥
साळी कोळी बेलदारांस ॥ निजकर्मांत न घडे दोष ॥ परोपकारें जगन्निवास ॥ प्राप्त होईल निजनिष्ठें ॥७॥
रजक आणि रंगार्‍यास पाहीं ॥ निजकर्म करितां दोष नाहीं ॥ परोपकारें भजतां कांहीं ॥ सार्थक देहीं घडेल ॥८॥
तपीं आणि ब्राह्मणांचें कर्मांत ॥ कपट घात नाहीं त्यांत ॥ परोपकारें रुक्मिणीकांत ॥ कृपा करील निर्धारें ॥९॥
असो आतां बहु भाषण ॥ अठरा वर्णांची सांगतां खूण ॥ पुढें कथा वाढेल जाण ॥ श्रोतीं चित्त देइजे ॥१०॥
मग परोपकारें रोहिदास ॥ भजों लागला वैष्णवांस ॥ फाटके मोचे यात्रेकर्‍यांस ॥ सांधोनियां देतसे ॥११॥
परोपकारी भक्त जाण ॥ हरीस आवडती जीवाहून ॥ त्यांचें घरीं जगज्जीवन ॥ रात्रंदिवस तिष्ठत ॥१२॥
उपदेश देऊनि जनांसी ॥ सेवा घेती तयांपासीं ॥ आपण थोडें उदकही कोणासी ॥ न देती जाण सर्वथा ॥१३॥
ते पढतमूर्ख ते अज्ञान ॥ ऐसें रोहिदासें जाणून ॥ भावें करी वैष्णवपूजन ॥ मिथ्या संसार जाणूनि ॥१४॥
प्रातःकाळीं उठोन ॥ आधीं करीतसे भोजन ॥ यावरी करूनियां स्नान ॥ विष्णुपूजन करीतसे ॥१५॥
ऐसें ऐकूनि मानसीं ॥ विपरीत वाटलें श्रोतयांसी ॥ तरी उपवासी बैसतां ध्यानासी ॥ स्वस्थ मनासी वाटेना ॥१६॥
कलियुगीं अन्नमय प्राण ॥ ऐसें बोलती सर्वज्ञ जन ॥ दोन प्रहर येतां दिन ॥ व्याकुळ होती तत्काळ ॥१७॥
क्षुधा लागेल करितां ध्यान ॥ तेव्हां तत्काळ फांकेल मन ॥ रोहिदास हें जाणून ॥ आधीं भोजन करीतसे ॥।१८॥
जैसें चोर झोंबतांचि जाण ॥ आधीं टाकून देइंजे धन ॥ कीं पिशाचबाधा न होतां पूर्ण ॥ देती सांदण पंचाक्षरी ॥१९॥
कीं निधान उकरितां विवसी छळी ॥ त्याआधीं साधक देती बळी ॥ कीं हवालदार न देतां शिव्यागाळी ॥ जवा। तत्काळ देइंजे ॥२०॥
रोहिदास तैशा रीतीं ॥ आधीं देत प्राणाहुती ॥ मग स्नान करून सत्वर गती ॥ करी एकांती देवपूजा ॥२१॥
तंव कोणे एके दिवसीं ॥ विष्णुभक्त बैसला देवपूजेसी ॥ साहित्य घेऊन एकांतासी ॥ चंचल मनासी आवरिलें ॥२२॥
चर्माचा बोदला आणून ॥ उदक ठेविलें भरून ॥ आसन गवाळें संपुष्ट जाण ॥ चर्माचींच असती ॥२३॥
सर्व चर्माचीं उपकरणीं ॥ रोहिदास बैसला घेऊनी ॥ तों पंचांग सांगावयालागूनी ॥ ब्राह्मण गृहासी पातला ॥२४॥
वृंदावन शुचिर्भूत सुंदर ॥ ते स्थळीं बैसला द्विजवर ॥ रोहिदास उठोन सत्वर ॥ केला नमस्कार निजभावें ॥२५॥
ब्राह्मण म्हणे रोहिदासासी ॥ देवपूजा तूं करितोसी ॥ चर्माचें आसनीं बैसलासी ॥ याचें फळ कोणतें ॥२६॥
विष्णुमूर्ति शालिग्राम जाण ॥ आम्ही ब्राह्मण करितों पूजन ॥ त्वां चर्माची संबळी करून ॥ त्यांत कैसा घातला ॥२७॥
वैकुंठवासी जगज्जीवन ॥ ज्याचें योगी करिती ध्यान ॥ त्वां चर्माची संबळी करून ॥ त्यांत कैसा घातला ॥२८॥
जो क्षीरसागरीं शेषशायी ॥ शास्त्रें धुंडितां न पडे ठायीं ॥ चर्माची संबळी करूनि पाहीं ॥ त्यांत कैसा ठेविला ॥२९॥
व्रतें तीर्थें तपें याग ॥ करितां नागुडे श्रीरंग ॥ तो वैकुंठवासी भक्तभवभंग ॥ चर्मांत कैसा वेष्ठिला ॥३०॥
ऐकूनि द्विजवराचें वचन ॥ रोहिदास बोले त्याकारण ॥ चर्मावांचोनि पदार्थ कोण ॥ तुम्हीं दृष्टीस देखिला ॥३१॥
काहाळ ढोल मृदंग जाण ॥ त्यावरी होतसे हरिकीर्तन ॥ चर्मावांचूनि पदार्थ आन ॥ दृष्टीस न देखों सर्वथा ॥३२॥
चर्माची धेनु कपिलवर्ण ॥ तिचें दुग्ध पवित्र जाण ॥ तेणें पंचामृतस्नान ॥ देवाकारण घालितां ॥३३॥
जारज अंडज उद्भिज नाम ॥ तिन्ही खाणी वेष्टिल्या चाम ॥ त्यांत नांदे आत्माराम ॥ सर्वा भूतीं सारिखा ॥३४॥
शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ॥ चामें वेष्टिले संपूर्ण ॥ चामाचा नगारा करून ॥ चामाचे हात वाजविती ॥३५॥
त्यांतूनि मधुर निघे ध्वन ॥ ते चर्माचे ऐकती कान ॥ चर्माचे जिव्हेकरून ॥ वेद कैसे बोलती ॥३६॥
चर्माचे हस्तेंकरून ॥ तुम्ही करितां अन्नपान ॥ चर्ममंदिरीं आत्माराम ॥ मधुर ध्वनि बोलत ॥३७॥
ब्राह्मण म्हणे रोहिदासासी ॥ ब्रह्मज्ञान तूं बोलतोसी ॥ परी जीव असतां शरीरासी ॥ विटाळ नाहीं सर्वथा ॥३८॥
यावरी रोहिदास बोले वचन ॥ विश्वव्यापक जगज्जीवन ॥ तो गवळ्यांट असोन ॥ विटाळ कैसा मानितां ॥३९॥
रजस्वलेच्या रुधिरांत ॥ त्यांत पुरुषाचें पडे रेत ॥ त्याचें शरीर हें निश्चित ॥ अमंगळचि जाणतां ॥४०॥
जन्मतां आणि मरतां ॥ याचा विटाळ तुम्ही धरितां ॥ तेथें उत्तम पदार्थ कोणता ॥ तुमचे दृष्टीस कोण दिसे ॥४१॥
अमंगळ यापरीचें चाम ॥ तेथें उत्तम आत्माराम ॥ निष्कलंक घनश्याम ॥ सर्वां घटीं सारिखा ॥४२॥
ब्राह्मण वदे ते वेळां ॥ शालिग्राम शुद्ध शिला ॥ हा चर्मकांनीं जरी पूजिला ॥ दोष घडतो त्यांलागीं ॥४३॥
ऐकूनि ब्राह्मणाचें वचन ॥ रोहिदास वदे त्यालागून ॥ शालिग्राम शिला पूजावी कोणें ॥ ऐसें स्वामी मज सांगा ॥४४॥
ब्राह्मण म्हणे रे शतमूर्खा ॥ आम्हीं पूजावें वैकुंठनायका ॥ चहूं वर्णांमाजी देखा ॥ श्रेष्ठ वर्ण ब्राह्मण ॥४५॥
देवांत श्रेष्ठ श्रीहरी ॥ चहूं वर्णांत ब्राह्मण थोरी ॥ यज्ञोपवीताचा अधिकारी ॥ त्यानेंचि विष्णु पूजावा ॥४६॥
ऐसें ऐकूनियां वचन ॥ रोहिदास बोले त्याकारण ॥ यज्ञोपवीत दाखवीन ॥ तुजलागून स्वामिया ॥४७॥
मग रांपी घेऊनियां करीं ॥ उदर चिरिलें ते अवसरीं ॥ यज्ञोपवीत सत्वरीं ॥ तयामाजी दाखविलें ॥४८॥
विप्र बोले ते अवसरां ॥ तूं विष्णुभक्त होसी खरा ॥ म्यां न करितां निजविचारा ॥ तुजकारणें छळिलें कीं ॥४९॥
अग्नींत टाकितां जाण ॥ मोलास चढे जैसें सुवर्ण ॥ तैसें करितां तुझें छळण ॥ महिमा तुझा वाढविला ॥५०॥
नातरी नाणें सुलाखीं टोंचून ॥ त्याचें पाहाती खरेपण ॥ त्यापरी करितां तुझें छळण ॥ महिमा तुझा वाढेल ॥५१॥
कीं साहाणेवरी घांसितां चंदन ॥ तयाचा सुगंध कळे पूर्ण ॥ तेवीं मी तुझें करितां छळण ॥ तुझा महिमा वाढेल ॥५२॥
कीं लोह परिसासी झगटतां जाण ॥ तत्काळ त्याचें होय सुवर्ण ॥ तैसें करितां तुझें छळण ॥ महिमा पूर्ण वाढला ॥५३॥
नातरी टांकीनें फोडूनि पाषाण ॥ देव बैसविला दृढ करून ॥ तेवीं म्यां तुझें छळण ॥ केलें जाण न कळतां ॥५४॥
तूं विष्णूभक्त आहेसी परम ॥ सुखें पूजीं शालग्राम ॥ ऐसें बोलोनि द्विजसत्तम ॥ गृहासी गेला आपुल्या ॥५५॥
पुढिले अध्यायीं निरूपण ॥ पिपाजीचरित्र अति पावन ॥ महीपति म्हणे एकाग्र मन ॥ सज्जन परिसा निजप्रीतीं ॥५६॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ पंचविंशाध्याय रसाळ हा ॥५७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥ अध्याय ॥२५॥    ॥ ओंव्या ॥५७॥
॥ श्रीभक्तविजय पंचविंशाध्याय समाप्त ॥