मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय ३८

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
ऐका श्रोते हो सावध चित्ती ॥ श्रद्धा हेचि पौर्णिमा तिथी ॥ तेह्तें भक्तविजय निशापती ॥ देखिला अवचितीं निजदृष्टीं ॥१॥
हृदयाकाशीं प्रकटतां सत्वरी ॥ अविद्यांतिमिर गेलें दूरी ॥ सज्ञान चातकांसी अंतरीं ॥ सौख्य निर्धारीं वाटलें ॥२॥
आवडी विश्वासें लक्षितां दृष्टीं ॥ प्रेमाची लाधली अमृतवृष्टी ॥ तेणें अपार सौख्यकोटी ॥ लाधल्या पोटीं तयांच्या ॥३॥
इतर जन जे का रसिक ॥ तयां प्रसाद लाधला कथानक ॥ तेणें संतोष पावूनि देख ॥ सायुज्यसुख पावती ॥४॥
अहो हा रोहिणीवर देखतां दृष्टीं ॥ विकल्पतस्कर जल्पती पोटीं ॥ तयांची न चाले दुरितरहाटी ॥ मग उठाउठी पळाले ॥५॥
केवळ अज्ञान ते तरुवर जाण ॥ त्यांसी निशापतीचे लागतां किरन ॥ प्राक्तन मधुमास येतां त्वरेन ॥ जाहले सघन फळपुष्पीं ॥६॥
यालागीं आतां स्वस्थ चित्तीं ॥ सादर असावें श्रवणार्थीं ॥ मागें रसिकमुरारआख्यान प्रीतीं ॥ परिसिलें श्रोतीं निजप्रेमें ॥७॥
हिंदुस्थान देशांत थोर ॥ उदेपूर नांव पुण्यनगर ॥ तेथील राणा नृपवर ॥ असे सादर विष्णुभक्तीं ॥८॥
आल्या अतीताकारण ॥ राजा पुरवी वस्त्र अन्न ॥ अकस्मात येतां वैष्णवजन ॥ त्यांचें पूजन करीतसे ॥९॥
त्याचें घरें गोपाळमूर्ती ॥ षोडशोपचारें पूजी नृपती ॥ वस्त्रें भूषणें लेववूनि प्रीतीं ॥ मंगळआरती करीतसे ॥१०॥
हरिप्रसाद घेऊन जाण ॥ यावरी राजा करी भोजन ॥ तंव त्याचें पोटीं कन्यारत्न ॥ निजभक्तिनिधान अवतरली ॥११॥
द्वादश दिवस लोटतां पाहीं ॥ नांव ठेविलें मिराबाई ॥ मायेनें उचलोनि लवलाहीं ॥ श्रीकृष्णापायीं धातली ॥१२॥
रूपलावण्य अति सुंदर ॥ देखोनि संतोषे नृपवर ॥ दिवसेंदिवस होतां थोर ॥ मायबाप चित्तीं संतोषती ॥१३॥
सवें घेऊनि निजात्मजा ॥ ठाकुरद्वारासी जाय राजा ॥ षोडशोपचारें गरुडध्वजा ॥ पूजीतसे सद्भक्तीं ॥१४॥
श्रीकृष्णमूर्ती अति सुंदर ॥ त्यावरी भूषणें अलंकार ॥ अमूल्यरत्न मुक्ताहार ॥ लेववी नृपवर निजप्रीतीं ॥१५॥
दिव्य मुकुट सुंदर मेखळा ॥ कांसें पीतांबर शोभे पिंवळा ॥ गळां वैजयंती माळा ॥ घनसांवळा शोभत ॥१६॥
जडित कुंडलें मकराकार ॥ कंठीं कौस्तुभ अति सुंदर ॥ श्रीमुख साजिरें सुकुमार ॥ दिसे उदार हास्यवदन ॥१७॥
ऐसें रूप नित्य देखोन ॥ मिराबाईचें वेधलें मन ॥ म्हणे भ्रतार देवावांचून ॥ नाहीं करणें मजलागीं ॥१८॥
ऐसा निश्चय करूनि चित्तीं ॥ राजकन्येनें धरिली प्रीती ॥ तंव कोणे एके दिवशी येऊन नृपती ॥ कांटेप्रति बोलत ॥१९॥
राणीसी म्हणे नृपवर ॥ मिराबाई दिसती थोर ॥ आतां पाहूनि उत्तम वर ॥ लग्न सत्वर करावें ॥२०॥
पित्याचें वचन ऐकोनि कानीं ॥ उत्तर देत मंजुळवचनीं ॥ म्हणे म्यां भ्रतार आपणांलागूनी ॥ ठेविला पाहोनि निजताता ॥२१॥
तो म्हणसील जरी कोण ॥ तरी तेही तुजला सांगतें खूण ॥ तुम्ही नित्य करितां ज्याचें पूजन ॥ तो श्रीकृष्ण मज आवडे ॥२२॥
तुम्ही वडील मातापिता ॥ विचार करूनि उभयतां ॥ मज अर्पावें श्रीकृष्णनाथा ॥ अनुमान चित्ता न करितां ॥२३॥
राजा म्हणे कन्येप्रती ॥ ते निर्जीव आहे पाषाणमूर्ती ॥ तुज लेंकूरपणें नेणवे चित्तीं ॥ म्हणोनि प्रीति जडलीसे ॥२४॥
कलियुगीं बौद्धरूप धरूनी ॥ निवांत राहिला चक्रपाणी ॥ आतां साक्षात रूप नयनीं ॥ मनुष्यांलागोनि दिसेना ॥२५॥
हें तुज नेणवे बाळमती ॥ आणि वरूं पाहतेसी गोपाळमूर्ती ॥ हा छंद टाकूनि निश्चितीं ॥ वरीं भूपति नामांकित ॥२६॥
मिराबाई देत उत्तर ॥ हा देवाधिदेवा रुक्मिणीवर ॥ यावरिष्ठ आणिक सुरवर ॥ धुंडितां साचार असेना ॥२७॥
हा विधीचा निजजनिता ॥ सर्व करूनियां अकर्ता ॥ शिव निवाला नाम जपतां ॥ तुजलागीं ताता नेणवे ॥२८॥
सुर नर अथवा भूपती ॥ यावरिष्ठ नसे त्रिजगतीं ॥ म्हणोनि अत्यंत माझी प्रीती ॥ जडली निश्चितीं त्यापासी ॥२९॥
म्हणतोसी निर्जीव पाषाण आहे ॥ तरी ऐसें कदा बोलूं नये ॥ प्रल्हादें विश्वास धरितां पाहें ॥ काष्ठींच देव प्रकटला ॥३०॥
म्हणसील या पुरातन गोष्टी ॥ म्हणोनि विकल्प येईल पोटीं ॥ तरी कलियुगीं द्वारकेहूनि जगजेठी ॥ डाकुरीं चालत आले कीं ॥३१॥
मथुरेची पुरातन मूर्ती ॥ हरिद्वारासी गेली एके रात्रीं ॥ नामयाची विशेष देखोनि भक्ती ॥ जेविला श्रीपती त्यासवें ॥३२॥
निजभक्तांचा शुद्ध भाव ॥ तोचि साक्षात जाणिजे देव ॥ कीर्तनीं सप्रेम गातां नांव ॥ वसे माधव त्या ठाया ॥३३॥
जैसी कमलिनीची लागतां प्रीती ॥ मिलिंद भोंवते गुंजारव देती ॥ तेवीं कीर्तनापासीं रुक्मिणीपती ॥ सत्वरगती येतसे ॥३४॥
कलियुगामाजी जगज्जीवन ॥ अभक्तांसींच धरी मौन ॥ निजभक्त प्रेमळ भाविकजन ॥ तयांप्रती वचन बोलतसे ॥३५॥
म्हणोनि विकल्प न धरोनि चित्तीं ॥ वचन ऐकावें भूपती ॥ मजल अर्पूनि गोपाळमूर्तीप्रती ॥ भजनीं प्रीति लागों दे ॥३६॥
ऐकोनि कन्येचें उत्तर ॥ आश्चर्य करी नृपवर ॥ म्हणे हिचें जन्मांतर ॥ कळलें साचार मजलागीं ॥३७॥
बाळक लेंकरूं अज्ञानपण ॥ केलें नसतां पुराणश्रवण ॥ कोठूनि अद्भुत जाहलें ज्ञान ॥ आम्हांलागून कळेना ॥३८॥
मग कन्येसी म्हणे नृपनाथ ॥ गोपाळमूर्ति दिधली तूतें ॥ आपुलें मंदिरीं नेऊनि त्वरित ॥ पूजीं कृष्णनाथ निजप्रीतीं ॥३९॥
पितयाचें वचन ऐकोनि पाहीं ॥ चित्तीं हर्षली मिराबाइ ॥ गोपाळमूर्ति लवलाहीं ॥ घेऊनि गेली निजमंदिरा ॥४०॥
तेथें स्थापूनि गरुडध्वजा ॥ षोडशोपचारें करी पूजा ॥ सकळ साहित्य पुरवी राजा ॥ सज्ञान आत्मजा म्हणोनि ॥४१॥
प्रातःकाळीं करूनि स्नान ॥ नित्यनेम नामस्मरण ॥ मग हातीं वीणा घेऊन ॥ करी गायन निजप्रीतीं ॥४२॥
त्यावरी पय दधि आणि घृत ॥ मधु शर्करा गुडसंयुत ॥ ऐसें घालोनि पंचामृत ॥ क्षालन करीत शुद्ध उदकें ॥४४॥
अंगवस्त्रें पुसोनि सत्वर ॥ प्रावरण नेसवी पीतांबर ॥ मुकुट घालोनि मस्तकावर ॥ दिव्य अलंकार लेववी ॥४५॥
ऊर्ध्वत्रिपुंड्र द्वादश टिळे ॥ तेणें शोभायमान दिसे घननीळ ॥ दिव्य कुंडलें अति सोज्ज्वळ ॥ शोभे माळ वैजयंती ॥४६॥
कौस्तुभ लेववी वेल्हाळी ॥ त्यावरी शोभे एकावळी ॥ कटिसूत्र आणि राधावळी ॥ तेणें वनमाळी शोभत ॥४७॥
हातीं पोहोंच्या वीरकंकण ॥ जडित मुद्रिका शोभायमान ॥ पायीं नेपुरें वाळे भूषण ॥ अति प्रीतीनें लेववीतसे ॥४८॥
गळां कोमळ तुळसीमाळा ॥ त्यावरी सुगंध बुका उधळिला ॥ तेणें शोभे घनसांवळा ॥ सगुण साकार दिसतसे ॥४९॥
दशांगधूप एकारती ॥ पक्वान्न नैवेद्य दाखवूनि प्रीतीं ॥ मग उजळूनि मंगळारती ॥ दंडवत प्रीतीं घालितसे ॥५०॥
म्हणे पतितपावना गरुडध्वजा ॥ भक्तभूषणा अघोक्षजा ॥ आर्षभावार्थ असे माझा ॥ राजाधिराजा श्रीकृष्णा ॥५१॥
ऐशा रीतीं करूनि नमन ॥ मग वैष्णवभक्त बोलावून ॥ त्यांचें सद्भवें करूनि पूजन ॥ करीत नमन निजप्रीतीं ॥५२॥
हरिप्रसाद उरलें अन्न ॥ तें अ अपण करीतसे भोजन ॥ त्यावरी भागवतपुराणश्रवण ॥ तृतीय प्रहरीं करीतसे ॥५३॥
ऐकावया श्रीहरिचरित्रासी ॥ विष्णुभक्त येती मंदिरासी ॥ जे अध्यात्मज्ञानी सद्गुणराशी ॥ वैराग्य मानसीं सर्वदा ॥५४॥
जे निराश संतुष्ट सर्व काळ ॥ सगुण भक्ति अति प्रेमळ ॥ ज्यांचे स्पर्शें तीर्थ निर्मळ ॥ ते दिनदयाळ कृपाळु मानसीं सर्वदा ॥५५॥
जे रायासमान मानिती रंक ॥ शेण सोनें ज्यांसी सारिखें ॥ उर्वशी आणि अस्वली देख ॥ भाव सारिखा तयांवरी ॥५६॥
ऐसे जे कां वैराग्यभरित ॥ ते श्रवणासी येती साधुसंत ॥ रात्रीं कीर्तन प्रेमयुक्त ॥ गुण वर्णित हरीचे ॥५७॥
नानापरींचे प्रबंध कवित ॥ मिराबाई रचूनि त्वरित ॥ श्रीकृष्णभजनीं लावूनि प्रीत ॥ गुण वर्णित सप्रेम ॥५८॥
नगरांत कुटिल होते दुर्जन ॥ ते निंदा करिती रात्रंदिन ॥ म्हणती राजयाचें नामाभिधान ॥ निजकन्येनें बुडविलें ॥५९॥
बैरागी भोंवते मिळवूनी ॥ कीर्तनीं नाचे निर्लज्ज होउनी ॥ स्वरूप सुंदर लावण्यखाणी ॥ कलंक सद्गुणीं लाविला ॥६०॥
आडमार्गें चालतां आणिकासी ॥ राजा दंड करी निश्चयेंसी ॥ परी घरचें अकर्म नेणवे त्यासी ॥ मदांध मानसीं सर्वदा ॥६२॥
हांसोनि निंदक टाळ्या पिटी ॥ केरसुणी उपजली मोळापोटीं ॥ अंतरीं धरूनि पापदृष्टी ॥ बोलती गोष्टी परस्परें ॥६३॥
तरूवरी बैसोनि काग पक्षी ॥ ढोरें चरतां क्षतचि लक्षी ॥ तेवीं निंदकासी न येतां साक्षी ॥ अवगुण भक्षी स्वभावें ॥६४॥
ऐसें परस्परें बोलतां जन ॥ रायासी कळलें वर्तमान ॥ मग निजकांतेसी क्रोधायमान ॥ एकांतीं नेऊन बोलत ॥६५॥
म्हणे अजून तुज वृत्तांत न कळे ॥ आपुल्या कुळासी लागला बोल ॥ मिराबाई भक्त प्रेमळ ॥ निंदिती खळ तिजलागीं ॥६६॥
म्हणती मिळवूनी वैष्णवजन ॥ निर्लज्ज होऊनि करी गायन ॥ ऐसें परस्परें बोलती जन ॥ हें कुलक्षण कुलवंते ॥६७॥
आतां तूं जाऊनि सत्वरीं ॥ कन्येसी सांगावें झडकरी ॥ कीं बालपण होतें आजवरी ॥ तुज निर्धारीं कळेना ॥६८॥
आतां तुजला पाहूनि वर ॥ लग्न करिताहे नृपवर ॥ ऐसें पुसोनि सत्वर ॥ येईं झडकर सांगावया ॥६९॥
ऐकोनि पतीचें वचनासी ॥ जाऊनि बोधी निजकन्येसी ॥ जन अनिवार निंदिती तुजसी ॥ लग्न न करिसी म्हणूनि ॥७०॥
बाळपण होतें आजवर ॥ आतां विवाह करितो नृपवर ॥ तुजला पुसावया साचार ॥ मजला सत्वर पाठविलें ॥७१॥
ऐकोनि म्हणे निजात्मजा ॥ पित्यासी निरोप सांगावा माझा ॥ श्रीकृष्णाविण पुरुष दुजा ॥ नृप राजा तुजसमान ॥७२॥
ऐसा माझा निश्चय असतां ॥ वारंवार कां पुसतां वृथा ॥ जननिंदेचा अभिशाप माथां ॥ परी माझिया चित्ता भय नाहीं ॥७३॥
किराणा तोलूनि न पाहतां पाहें ॥ महाग सर्वथा म्हणूं नये ॥ तेवीं माझें अंतर नेणतां माये ॥ शब्द कायसा ठेवितां ॥७४॥
टाळ मृदंग लावूनि जाण ॥ वैष्णवमेळीं करितें कीर्तन ॥ ग्रामवासी ऐकूनि जन ॥ निंदिती जाण यासाठीं ॥७५॥
कोणी सज्ञान जे भाविक ॥ ते म्हणती कुळीं लाविला दीपक ॥ कोणी अभक्त जे निंदक ॥ ते जोडिला नरक म्हणताती ॥७६॥
एक म्हणती भजनीं लागली गोडी ॥ एक म्हणती मिराबाई जाहली वेडी ॥ परी माझी आत्मबुद्धि चोखडी ॥ नेणती बापुडीं अज्ञानी ॥७७॥
ज्ञानशस्त्र घेऊनि हातीं ॥ बळेंचि निघालें भक्तिपंथीं ॥ यासी शब्द ठेवूनि कुमती ॥ धुवट करिती मोलेंविण ॥७८॥
मी रामनामीं जाहलें रत ॥ पित्यासी निरोप सांगें त्वरित ॥ ऐसी कन्येची ऐकूनि मात ॥ माता त्वरित चालिली ॥७९॥
एकांतीं येतां नृपवरासी ॥ सकळ वृत्तांत सांगितला त्यासी ॥ म्हणे उदंड नीति बोलिलें तयेसी ॥ परी आत्मजेसी न मानेची ॥८०॥
मग सक्रोध होऊनि नृपवर ॥ कांतेप्रती बोले उत्तर ॥  आतां विष दारुण देतों सत्वर ॥ तें कन्येसी निजकरें पाजीं कं ॥८१॥
मेली अथवा नांदती सदनीं ॥ कन्या ऐसीचि ऐकिजे कानीं ॥ ऐसा आहाणा प्रसिद्ध जनीं ॥ विचार मनीं करावा ॥८२॥
ऐसें बोलूनि कांतेप्रती ॥ तत्काळ विष आणवी नृपती ॥ प्याल्यांत घालोनि सत्वरगती ॥ कांतेहातीं पाठविलें ॥८३॥
भ्रतारवचन न ये मोडितां ॥ परी परम दुःख वाटालें चित्ता ॥ रुदन करीत चालिली माता ॥ पोटीं ममता अनिवार ॥८४॥
ठाकुरद्वारासी मग येऊन ॥ मिराबाईसी बोलिली वचन ॥ रायें विष तुजकारण ॥ अति दारुण पाठविलें ॥८५॥
ऐसें बोलतां ते वेळे ॥ अश्रुपातें भरले डोळे ॥ म्हणे सुंदर सुकुमार माझे बाळे ॥ सन्निध काळ तुज आला ॥८६॥
मातेचा मोह देखूनि फार ॥ मिराबाई देत उत्तर ॥ मानवदेह अति नश्वर ॥ अंतीं जाणार निश्चयें ॥८७॥
हें कृष्णभजनानिमित्त जातां ॥ माते कां शोक करिसी वृथा ॥ मृगजळाचा पूर आटतां ॥ कासया चिंता करावी ॥८८॥
वंध्यासुताचें मोडितां लग्न ॥ तेथें शोकासी काय कारण ॥ अमावस्येचें रात्रीं लोपलें चांदण ॥ हा शब्द जाण लटिकाचि ॥८९॥
आकाशसुमनें गेलीं गळोनी ॥ म्हणोनि भ्रमर उद्विग्न मनीं ॥ तेवीं आजि तूं वृथा जननी ॥ शोक निजमनीं करितेसी ॥९०॥
देंठापासून फळ निजजलें पाहीं ॥ तें सुटोन पडिलें आणिके ठायीं ॥ तेवीं मी जडलें श्रीकृष्णपायीं ॥ आतां संबंध कांहीं असेना ॥९१॥
कीं मुक्ताफळ निपजलें जळांत ॥ त्याचें भूषण करिती श्रीमंत ॥ तेवीं मी तुमचे पोटी उपजोनि त्वरित ॥ श्रीकृष्णीं रत झाले कीं ॥९२॥
नातरी अलंकार करावया चोख ॥ रत्न कोंदणीं बैसविती लोक ॥ तेवीं माझा अंगीकार देख ॥ यदुनायकें केला कीं ॥९३॥
आतां लटिकी प्रपंचमाया ॥ टाकोनि शोक न करीं वायां ॥ ऐसें मातेसी सांगोनियां ॥ श्रीकृष्णपायां लागली ॥९४॥
मस्तक ठेवूनि चरणकमळीं ॥ देवासी बोले तये वेंई ॥ पित्यानें विष ये काळीं ॥ मज वनमाळी पाठविलें ॥९५॥
आतां तुझे कृपेंकरूनि जाण ॥ मी पावेन वैकुंठभुवन ॥ पुढें तुझें कोण करील अर्चन ॥ चिंता दारुण मज वाटे ॥९६॥
निंदक लोक ऐसें बोलती ॥ मिराबाईनें केली भक्ती ॥ तिजला विषप्रलय अंतीं ॥ केला निश्चितीं नृपनाथें ॥९७॥
आतां ऐसें बोलती अभक्तजन ॥ मग ते न करितील तुझें पूजन ॥ हे देवाधिदेवा मजकारण ॥ चिंता दारुण वाटतसे ॥९८॥
वस्त्रें भूषणें अलंकार ॥ नानापुष्पांचे गुंफोनि हार ॥ तुज कोण लेववील सत्वर ॥ चिंता अपार मज वाटे ॥९९॥
राजा करीत होता अर्चन ॥ तोही झाला क्रोधायमान ॥ मजवरी तेणें निमित्त ठेवून ॥ तुझें सेवन वर्जिलें ॥१००॥
तूं सुकुमार सांवळा राजीवनयन ॥ भलताच दुर्जन ठेवितील दूषण ॥ म्हणतील मिराबाईचा प्राण ॥ याजनिमित्त पैं गेला ॥१॥
बरें आतां रुक्मिणीकांता ॥ मीं कासया वृथा करावी चिंता ॥ भूतभविष्याचा कर्ता ॥ तुजविण सर्वथा असेना ॥२॥
लाक्षागृहीं पंडुसुत ॥ जळतां राखिले त्वां त्वरित ॥ तूं कृपासागर अनाथनाथ ॥ न कळे अंट श्रुतिशास्त्रां ॥३॥
विष पाजितां प्रल्हादासी ॥ तयासी रक्षिलें त्वां हृषीकेशी ॥ तुझें नाम असतां वाचेसी ॥ कळिकाळ तयासी बाधेना ॥४॥
शिवें घेतलें जें हालाहल ॥ तें तुझिया नामें झालें शीतळ ॥ आणि मी वृथा कासया करूं तळमळ ॥ तूं दीनदयाळ असतां पैं ॥५॥
मग विषप्याला सत्वर घेऊन ॥ नैवेद्य दाखवी देवाकारण ॥ भोक्ता श्रीहरि म्हणून ॥ केलें प्राशन तेधवां ॥६॥
तों अद्भुत नवल वर्तलें जाण ॥ तें परिसा श्रोते भाविक जन ॥ मिराबाईस विषप्राशन ॥ अमृतासमान तें जाहलें ॥७॥
परी गंडकीशिळेची मूर्ति अभंग ॥ तिचा तत्काळ पालटला रंग ॥ हिरवें झाले सर्वांग ॥ पाहती सकळ दृष्टीसी ॥८॥
कांतेचा विश्वास नव्हता पोटीं ॥ म्हणोनि राजा पातला उठाउठीं ॥ त्याणें देखतां प्रत्यक्ष दृष्टीं ॥ झाला कंठीं सद्गदित ॥९॥
म्हणे मी पतित अति दुर्जन ॥ देवासी करविलें विषप्राशन ॥ ऐसा अनुताप चित्तीं आणून ॥ धरिले चरण कन्येचे ॥११०॥
येरी मस्तक उचलोन ॥ पित्यासी करी साष्टांग नमन ॥ म्हणे बा तुझ्या योगेंकरून ॥ मजला श्रीकृष्ण जोडला ॥११॥
मिराबाईस म्हणे पिता ॥ तुजला विषप्राशन करवितां ॥ मूर्तीचा रंग पालटला आतां ॥ म्हणूनि चिंता मज वाटे ॥१२॥
तरी आतां प्रार्थूनि रुक्मिणीपती ॥ पहिल्याऐसी करावी मूर्ती ॥ तेणें संतोष होईल चित्तीं ॥ जनीं कीर्ति होईल ॥१३॥
मिराबाई जोडोनि हात ॥ श्रीकृष्णमूर्तीस काय बोलत ॥ विष प्राशन करितां किंचित ॥ तुझें रूप त्वरित पालटलै ॥१४॥
कृष्णावतारीं यमुनाजीवनीं ॥ निजांगें टाकिला कालिया मर्दूनी ॥ आणि किंचित विष आजिचे दिनीं ॥ चढलें कैसें तुजलागीं ॥१५॥
तुझें नाम निजभक्त जपत ॥ त्यांसी विषाचें होय अमृत ॥ ऐसी पुराणी बोलिली मात ॥ आली प्रचीत मज आतां ॥१६॥
तुझें नाम जपतां धूर्जटी ॥ तो तत्काळ जाहला शीतळ पोटीं ॥ आणि निजांगें घेतांचि जगजेठी ॥ जाहलासी कष्टी दिसताहे ॥१७॥
समुद्राच्या भयेंकरून ॥ अगस्त्य टाकील अनुष्ठान ॥ तरीचि देवा तुजकारण ॥ विषबाधन होईल ॥१८॥
धडाडीत पेटला वैश्वानर ॥ जरी तृणासी कांपेल थरथर ॥ तरीचि विष रुक्मिणीवर ॥ तुजकारणें बाधेल ॥१९॥
कीं रामनाम जपतां अहर्निशीं ॥ दुरितें बाधती निजभक्तांसी ॥ तरीचि विषाची बाधा तुजसी ॥ निश्चयेंसी होईल ॥१२०॥
नातरी सुधारस प्राशितां गोविंदा ॥ प्राणियांसी होईल रोगबाधा ॥ तरीचि तुजला स्वानंदकंदा ॥ अपाय मुकुंदा होईल ॥२१॥
कौतुक दाखवावया जनासी ॥ नानाचरित्रें तूं करितोसी ॥ आतां पहिल्यासारिखा त्वरेंसीं ॥ हृषीकेशी होईं कां ॥२२॥
मिराबाईचें ऐसें उत्तर ॥ ऐकोनि आनंदले शारंगधर ॥ पहिल्यासारिखे रुक्मिणीवर ॥ झाले सत्वर तेधवां ॥२३॥
पुढें साक्ष पाहे जग ॥ म्हणोनि ठेविला कंठींचा रंग ॥ निजदासाची कीर्ति अभंग ॥ करी भवभंग कृपाळु ॥२४॥
राजा उठोनि सत्वर ॥ देवासी घाली नमस्कार ॥ मग मिराबाईसी बोले उत्तर ॥ त्वां केला उद्धार वंशाचा ॥२५॥
ऐकूनि नृपवराची बोली ॥ सकळ निंदक पाहाती खालीं ॥ म्हणती निजभक्ताची छळणा ॥ केली ॥ तेणें अपकीर्ति झाली जनांत ॥२६॥
जयजयकारें पिटोनि टाळी ॥ आनंदली भक्तमंडळी ॥ म्हणती मिराबाईसी ये काळीं ॥ प्रसन्न वनमाळी जाहला कीं ॥२७॥
मिराबाई संतुष्टमन ॥ करिती झाली श्रीकृष्णभजन ॥ भक्तमहिमा प्रकट करून ॥ आत्मज्ञान पावली ॥२८॥
ते देशांत अद्यापवरी ॥ राणेराजियांचे घरीं ॥ श्रीकृष्णमूर्ति अतिसाजिरी ॥ तयांचें मंदिरीं राहिली ॥२९॥
पुढिलें अध्यायीं कथा सुंदर ॥ कान्होपात्रा भक्त थोर ॥ तें रसाळ चरित्र अति प्रियकर ॥ परिसा सादर भाविक हो ॥१३०॥
जो आदिमायेचा नियंता ॥ तो विधीचाही निजजनिता ॥ तो हृदयीं वसोनि स्वभावता ॥ वदवी कथा निरुपम ॥३१॥
ऐसा निश्चय धरी मन ॥ वक्ता वदविता रुक्मिणीरमण ॥ महीपति तयाचें कृपादान ॥ प्रसादवचन बोलत ॥३२॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ अष्टत्रिंशाध्याय रसाळ हा ॥१३३॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥    ॥ शुभं भवतु ॥    ॥ श्रीरस्तु ॥